गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: सोलापूर , मंगळवार, 24 मार्च 2020 (16:43 IST)

कोरोनामुक्त भारतासाठी यंदा गुढी : मोहन दाते

यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूला पराभूत करण्याचा संकल्प करणे अत्यावश्यक आहे. कोरोनामुक्त भारतासाठी यंदा गुढी उभारू या. आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि देशवासियांच्या आरोग्य रक्षणासाठी अत्यंत साधेपणाने नववर्षाला सुरुवात करू या, असे प्रतिपादन पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले. नेहमीप्रमाणे सकाळी अभ्यंगस्नान करावे. देवांच्या पूजेप्रमाणे अगदी साधेपणाने गुढीपूजन करावे. घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
 
फुले, कडुलिंब, बत्ताशाची माळ आणता आली नाही, तरी आपण गुढीपूजन करू शकतो. आपल्या शास्त्रांमध्ये सर्वोपचारांसाठी अक्षता वापरण्याची सोय आहे. त्यामुळे घरातील तांदळाच्या अक्षता तयार करून घ्याव्यात. गुढीपूजनाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये या अक्षतांचा वापर करून नेहमीच्या पद्धतीने पूजन संपन्न करावे. अगदी खूप काही गोडाधोडाचे करता आले नाही, तर गूळ-तूप, दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. आप्तेष्टांना, मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी घराबाहेर न पडता सोशल मीडियाचा वापर नक्कीच करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
 
संवत्सर (संवत) हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो. यास ‘चांद्र वर्ष' असेही म्हटले जाते. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते. यंदाच्या वर्षी 25 मार्च 2020 रोजी चैत्र प्रतिपदा आहे. यावर्षीचे संवत्सरनाम शार्वरी असून, शालिवाहन शके 1942 प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
 
हिंदू नववर्ष म्हणजेच चैत्र महिन्याचा आरंभ होत आहे. मंगळवार, 24 मार्च रोजी दुपारी आमावास्य समाप्ती होत असून, चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होत आहे. मात्र, आपल्याकडे  सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे बुधवार, 25 मार्च रोजी गुढीपाडवचा मुहूर्त आहे. हिंदू संस्कृतीनुसार, गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार हिंदू नववर्षारंभ करण्याची परंपरा आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो.
 
नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. इंग्रजी कालनिर्णयानुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरू होत असले, तरी जगभरात विविध दिवशी नववर्ष साजरे केले जातात. जाणून घेऊ या जगभरातील विविध नववर्ष आणि तिथी...
1 जानेवारी हा सर्वसाधारण वर्षारंभाचा पहिला दिवस मानला जातो. मात्र, जगातील विविध देश व धर्म यांच्या हिशेब केल्यास 365 दिवसांमध्ये प्रत्यक्षात  80 नववर्षारंभ दिन येतात. पैकी कित्येक दिनांक सारख्या असले, तरी वर्षभरातील एकूण 12 महिन्यांत 58 दिवस असे आहेत की, त्या दिवशी नवीन वर्षारंभ होत असतो. त्याचप्रमाणे ही नववर्षे विविध संवत्सरनामांनी सुरू होतात.
 
हिंदू नववर्षाच चैत्राची चाहूल आता सर्वांनाच लागली आहे. सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरण या दिवशी असते. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सरनाम घेऊन येते. संवत्सर म्हणजे काय; संवत्सराचे प्रकार किती आहेत; कोणकोणती संवत्सरे भारतीय संस्कृतीत अवलंबली जातात.
 
संवत्सर म्हणजे साठ वर्षांचे कालचक्र असून, ही एक कालापन पद्धती आहे. शालिवाहन शकाखेरीज अन्य अनेक संवत्सरे आहेत. 60 वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा 1/12 काळ म्हणजे एक संवत्सर होय. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास सुमारे 12 वर्षे लागतात. म्हणजे 1 संवत्सर होय. 86 संवत्सरांमध्ये 85 वर्षे पूर्ण होतात. काही फरकांमुळे एका वर्षाचा लोप होतो. संवत्सर हा महाकालाचा एक भाग मनला जातो.
 
यंदा गणपतीनंतर महिन्याभराने नवरात्र
यंदाचे वर्ष 13 मराठी महिन्यांचे असून 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या काळात अधिक आश्विन महिना असणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर अधिक महिना सुरू होईल व नवरात्र तब्बल महिनाभराच्या अंतराने सुरू होईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.