सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By Author स्नेहल प्रकाश|
Last Modified: रविवार, 5 जुलै 2020 (21:07 IST)

गुरु:साक्षात परब्रह्म

आपल्याला जीवनाच्या वाटेवर अनेक गुरु भेटतात. ते कोणत्याही रूपाने येवून आपली वाट सुकर करतात. निसर्ग, नद्या, सृष्टी, आपल्या सम्पर्कात येणाऱ्या अनेक लहान मोठे, ओळखी अनोळखी व्यक्ति यांच्याकडून अनेकदा बोध मिळतो. ते सगळेच गुरु मानावेत. तसेच अनेकविध कलांचे ज्ञान देणारे देखील गुरु असतात. आज उद्भवलेल्या संकटकाळातही भगवंतावरच्या श्रद्धेमुळे मानसिक आपल्यासारख्या सामान्य जनांना मानसिक बळ मिळते आहे. आपले प्रथम गुरु माता आणि पिता असतात.
 
आषाढी पौर्णिमा मुख्यत्वे सद्गुरु प्रति समर्पित होण्यासाठी अनन्यसाधारण महत्वाची मानली जाते. 
गुरु तोच देव, देव तोच गुरु.गुरु गोविंद दोनों खड़े, किसको करू प्रणाम !
रामदास स्वामी म्हणतात,
आपली माता आणि पिता ते हि गुरूची तत्वता 
परि पैलपार पाववितो तो सद्गुरू वेगळा !
निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव महाराज हे सद्गुरु आणि सद्शिष्यांचे उदात्त आणि भव्यदिव्य प्रतिक आहे. ज्ञानदेव माऊली म्हणते माझी किती जन्मांची पुण्याई असेल की ज्यामुळे मला निवृत्तीनाथांसारखे गुरु लाभले.
गुरु अनेक प्रकारे शिष्याला  तावून सूलाखून घेतात. त्याची खरी भक्ति जाणून  घेतात आणि एकदा आपला म्हंटल्यावर त्याचा पूर्ण भार आपल्या शिरावर घेतात.
 
एकदा वाचनात आले. एक प्रौढ महिला आहेत त्यांनी ग्रंथराज दासबोधाला लहानपणापासून आपल गुरु मानले. लिहिता वाचता येत नव्हते तरी नुसती त्यावर बोटे फिरवून डोळे फिरवत असत. एकोणिसाव्या वर्षीच वैधव्य आले पदरात दोन मुले होती. निष्ठा फक्त दासबोध ह्या ग्रंथावर ठेवली. घरच्यांनी इस्टेटीच्या कागदपत्रांवर अंगठा मारायला सांगितला ह्यांनी दासबोधाचे मनोमन चिंतन केले आणि अंगठा मारू नकोस असा कौल त्यांना मिळाला आणि पुढे पंचवीस वर्षे सही केली नाही. तेवढ्या वर्षात थोडेफार लिहायला वाचायला शिकल्यामुळे नंतर योग्य ती इस्टेट मिळाली.
 
अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या मनात कदाचित अनेक प्रश्न निर्माण होतील पण खऱ्या भक्तीने अनेकांची नाव तीरावर सुखरूप पोहोचते.
ऐसे परम सख्य धरीता, देवास लागे भक्ताची चिंता 
पांडव लाखाजोहरी जळता विवरद्वारी काढीले ! 
!तस्मै श्री गुरवे नमः!