सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:07 IST)

पादुकांना नमस्कार कसा करावा ?

पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असतात अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.
 
'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय. पादुकांच्या अंगठयातून (पादुकांच्या खूंट्या) आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो, त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात), तेथे टेकवावे.
 
श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्रीगुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.
 
अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सर्व दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.
 
गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत.
 
विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच 'मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥' असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.