सामाजिक बांधिलकी जपण्याचा सण 'अक्षय तृतीया'
अक्षय तृतीया... आखाजी... पितृ देवोत्सव, दोलोत्सव, वसंतोत्सव, चंदनयात्रा, आखिती, आख्यातरी, अखतारी अशा अनेक नावाने हा सण संपूर्ण देशात साजरा होतो. विशेषत: खानदेशात या सणाला खूप वेगळं महत्त्व आहे. अहिराणी भाषेतील गाणी झोक्यावर बसून माहेरी आलेल्या महिल्या म्हणतात.
आथानी कैरी, तथानी कैरी
कैरी झोका खाय बो। वडाच्या गर्द छायेखाली बांधलेला झोका आणि त्यावर बसून मस्त रंगलेला खेळ, गाणी हे दृश्य आता जवळपास दुर्मिळच! भारतीय पंचांगामध्ये दसरा दिवाळीप्रमाणेच अक्षयतृतीया महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात आजही या दिवशी वर्षभराचे सर्व शेती कामाचे करार खेड्यात करण्याची प्रथा आहे. सालदार, शेतगडी, गहाणखत याच दिवशी खेड्यात केले जाते. अनेक घरात तर केवळ अक्षय तृतीयेपासूनच आंबे खायला सुरुवात होते. तत्पूर्वी पितरांना नैवेद्य दाखविले जाते. शेतीमध्ये काम करायची सुरुवात देखील याच दिवसापासून केली जाते. जमिनीची भाजणी, ढेकळे फोडून वाफे तयार करणे, राख गोबर मातीत एकरूप करून ठेवणे, शेताभोवती कुंपण किंवा बांध घालण्याची प्रथा याच दिवसापासून पाळली जाते.
पुराणातील काही संदर्भानुसार सत्य, कृत आणि त्रेता युगाचा प्रारंभ दिन अक्षय तृतीयेपासूनच केला जातो. भगवान परशुरामचा जन्मदिन याच दिवशी झाल्याने मंगल कर्म करण्याची प्रथा आहे. विशेषत: ग्रामीण भागात या दिवसात असणारी पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणी बचतीचा संदेशही या निमित्ताने दिला जातो. अक्षय तृतीया हा सण केवळ सण म्हणून न पहाता त्यातील तात्कालिक संदर्भ म्हणून पाहिला पाहिजे. चैत्र महिन्यात हळदी कुंकु करण्याची महिलांची प्रथा आहे. यात महिला विविध पदार्थ खाऊ घालतात. सुरुवातील म्हटल्याप्रमाणे अक्षयतृतीया लक्षात राहते ती यासाठी की, उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद संपून या दिवसापासून लहान मुलांना अक्षरज्ञान देण्याची प्रथा आजही काही खेड्यात पाळली जाते. पूरातन संदर्भ काहीही असले तरी अक्षय तृतीयेचा नवा संदर्भ लक्षात घेवून सण साजरा केला पाहिजे.