मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (12:35 IST)

Chaitra Gauri 2024 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

chaitra gauri
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीये पासून चैत्रगौर बसवतात. देवीला झोपाळ्यात बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय तृतीया) पर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात. चैत्र महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. तर या दरम्यान गौरीचे स्वागत कसे करावे आणि कसा साजरा करावा हा सोहळा हे जाणून घ्या
 
गौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते. स्त्रिया आपापल्याघरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्याश्या पाळण्यात गौर (अन्नपूर्णा) स्थापित करतात. महिन्याभरातील कुठल्याही एका शुभ दिवशी सुवासिनींना जेवायला बोलवतात. भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. संध्याकाळी हळदी-कुंकूवाचा थाट करतात. या दिवशी गौरीच्या ओवती-भोवती साज सज्जा करतात. पानाफुलांनी सजावट करुन श्रृंगारलेल्या झोपाळ्यावर गौरीला बसवतात. भोवती फराळाचे पदार्थ आणि इतर सजावटीचे सामान वापरुन आरास केली जाते. सुवासिनींना फराळ म्हणून कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ आणि करंजी तसेच कलिंगडाच्या फोडी दिल्या जातात. बत्तासे आणि खिरापतीचा प्रसाद दिला जातो. यानंतर सवाष्णींची हरभर्‍याने ओटी भरली जाते. तिला सुवासिक फुलांचा गजरा किंवा फुले दिली जातात. सर्व मिळवून "गौरीचे माहेर" गाणे गातात.
 
या दिवसात गौरीचे हळदी-कुंकू करताना गौरी पुढे सुंदर अशी आरास मांडली जाते. या महिन्यात गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे. कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीचे पन्हे, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीस अर्पण केला जातो. 
या महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत. तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय. चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र, इ. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात. यामध्ये प्रत्येक महिन्यात साज-या होणा-या विविध सण व व्रतांचे अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र, राधाकृष्ण, तुळशी अशी चित्रे चैत्रांगणात काढली जातात.
सर्व कौतुक होत असताना अखरे अक्षयतृतीयेला गौर पुन्हा सासरी जायाला निघते तेव्हा तिला खीर-कानोला, दहीभात, आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो. कौमार्य अवस्थेत माहेरी आलेली गौरी अक्षय तृतीयेला यौवन अवस्थेत सासरी जाते अशी समजूत आहे. हे एकाप्रकारे सृष्टीच्या बदलत्या स्वरुपाचे प्रतीक मानले जाते. कारण यानंतर सृष्टीस बहार येते.
 
चैत्र गौरी गीत
गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्‍यायाला
 
घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
 
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी
 
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी
 
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी
 
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
 
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला