रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 20 जुलै 2023 (08:07 IST)

गजानन महाराज दुर्वांकुर Gajanan Maharaj Durvankur

gajanan maharaj
श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र -
 
शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न ।
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥
येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती ।
उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२॥
उन्हा तहानेची नसे त्यास खंत । दावियलें सत्य असेचि संत ।
पाहूनी त्या चकित बंकटलाल झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥३॥
घेऊनी गेला आपुल्या गृहासी । मनोभावे तो करी पूजनासी ।
कृपाप्रसादे बहु लाभ झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥४॥
मरणोन्मुखीं तो असे जानराव । तयांच्या मुळे लाभला त्यास जीव ।
पदतीर्थ घेता पूनर्जन्म झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥५॥
पहा शुष्कवापी भरली जलाने । चिलिम पेटविली तये अग्निविणें ।
चिंचवणें नाशिले करीं अमृताला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥६॥
ब्रह्म गिरीला असे गर्व मोठा । करि तो प्रचारा अर्थ लावूनि खोटा ।
क्षणार्धा त्याचा परिहार केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥७॥
बागेतली जाती खाण्यास कणसं । धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश ।
योगबळे काढिलें कंटकाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥८॥
भक्ताप्रती प्रिती असे अपार । धावुनी जाती तया देती धीर ।
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥९॥
बुडताच नौका नर्मदेच्या जलांत । धावा करिती तुमचाचि भक्त ।
स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१०॥
संसार त्यागियला बायजाने । गजानना सन्निध वाही जिणे ।
सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥११॥
पितांबरा करी भरी उदकांत तुंबा । पाणि नसे भरविण्यास नाल्यास तुंबा ।
गुरुकृपेने तो तुंबा बुडाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१२॥
हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा । पितांबराची घेत गुरु परीक्षा ।
गुरुकृपा लाभली पितांबराला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१३॥
चिलीम पाजावी म्हणून श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी ।
हेतू तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१४॥
बाळकृष्न घरी त्या बालापुरासी । समर्थरुपे दिले दर्शनासी ।
सज्जनगडाहूनी धावुनी आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१५॥
नैवेद्य पक्वान्न बहु आणियेले । कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले ।
कंवरासी पाहुनी आनंद झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१६॥
गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गार्डप्रति दावियेली हो लिला ।
शरणांगती घेऊनी तोही आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१७॥
जाति धर्म नाही तुम्ही पाळियेला । फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला ।
दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१८॥
अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ति । अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती ।
सांगता क्षणीं तो पहा मानिएला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१९॥
करंजपुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दु:ख ।
दु:खातुनी तो पहा मुक्त झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२०॥
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्काररुपी श्रीगजाननास ।
सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२१॥