गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (12:19 IST)

रामायणात मंथरा कोण होती ?

वाल्मीकींच्या रामायणात मंथरा महत्त्वाची भूमिका बजावते. तिच्यामुळेच प्रभू श्रीरामांना 14 वर्ष वनवास भोगावे लागले. मंथरा आणि राणी कैकेयी ह्या कैकय देशातील होत्या. कैकेयी सर्वांनाच ठाऊक असे. चला तर मग आपण या मंथरेविषयी जाणून घेऊया...
 
कैकयच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेयी राजा दशरथांची तिसरी बायको होती. ती खूपच देखणी आणि साहसी देखील होती. कदाचित या कारणामुळेच राजा दशरथांचे  तिच्यावर जास्त प्रेम होते. 
 
अशी आख्यायिका आहे की लग्नानंतर पाठराखीण म्हणून कैकेयीची ही दासी तिच्यासोबतच आली होती. कैकेयी देशाचे राजा अश्वपती यांचा एक भाऊ होता. ज्याचे नाव वृहदश्व असे. त्याला मोठ्या डोळ्यांची मुलगी असे जिचे नाव रेखा असे. ती लहानपणापासूनच कैकेयीची मैत्रीण होती. ती राजकन्या तर होतीच त्याच बरोबर बुद्धिमती सुद्धा होती. लहान वयातच तिला एक आजार झाला. या आजारात तिचे सर्वांग घामाने चिंब व्हायचे, त्यामुळे तिला खूप तहान लागायची. 
 
एके दिवशी तहानलेली असताना तिने वेलची, खडीसाखर आणि चंदन यापासून बनवलेले सरबत पिऊन घेतले. ते पिताच तिच्या सर्व अंगांनी काम करणे बंद केले. त्याचक्षणी तिला तिचे वडील प्रख्यात वैद्यांकडे घेऊन गेले आणि तिच्यावर औषधोपचार करविले. वैद्यकीय उपचाराने तिचे प्राण तर वाचले पण तिचा पाठीचा कणा कायमचा वाकून गेला. या कारणामुळे तिचे नाव मंथरा पडले. तिच्या या अवस्थेमुळे ती आजीवन अविवाहित राहिली. कैकेयीचे लग्न झाल्यावर आपल्या वडिलांची परवानगी घेऊन ती कैकेयीची अंगरक्षिका बनून कैकेयी सोबत तिच्या राजमहालात येऊन राहू लागली. 
 
पौराणिक कथेनुसार मंथराही पूर्वजन्मी दुन्दुभ नावाची गंधर्व कन्या असे. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ऋषी लोमशच्यानुसार मंथरा पूर्व जन्मी प्रह्लाद पुत्र विरोचन यांची कन्या होती. वाल्मीकींच्या रामायणात श्रीरामाला वनवासाची शिक्षा देण्यासाठी इंद्राने पाठवलेली अप्सरा असल्याचे मानले जाते. 
 
मंथरा कथा : महाराजा दशरथ चैत्राच्या महिन्यात आपल्या थोरल्या पुत्र श्रीरामाचे राज्याभिषेक करणार आहे ही बातमी कळताच लगेच या कुबड्या मंथरेने कैकेयीला सांगितली. यावर कैकेयीला आनंद झाला आनंदाच्या या बातमीचा मोबदला म्हणून तिने मंथरेला रत्नजडित दागिने दिले. 
 
मंथरेने तो दागिना फेकून कैकेयीला बरेच काही सुनावले आणि समजविण्याचा प्रयत्न करू लागली. पण कैकेयी  तिला ही आमच्या कुळाची रीत असल्याचे सांगते की थोरला मुलगाच राज्याच्या कारभार सांभाळतो. तर मग मी माझ्या मुलाचा विचार कसा काय करू ? आणि तसं पण राम तर सर्वांचाच लाडका आहे. 
 
मग मंथराच्या सांगण्यावरून तिला तिच्या दोन वरांची आठवण झाली. जे तिने राजा दशरथांकडून घेतले असे. त्याच क्षणी तिच्या मनात कपट येतं. 
 
एकदा राजा दशरथाने देवराज इंद्राच्या सांगण्यावरून देवासूर संग्रामात भाग घेतला असताना या युद्धात त्याच्या पत्नीने कैकेयीनेच त्यांना पाठिंबा दिला होता. या युद्धात राजा दशरथ बेशुद्ध झाले असताना कैकेयीने त्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना रणांगणातून बाहेर सुखरूप आणून त्यांचे प्राण वाचवले होते. हे बघून राजा दशरथांनी प्रसन्न होऊन तिला 2 वर मागण्यास सांगितले होते. त्यावर कैकेयी राजाला म्हटले होते की मी हे वर योग्य वेळ आल्यावर मागेन. 
 
नंतर मंथरा तिचे कान भरते आणि मंथराच्या सांगण्यावरून कोप भवनात जाऊन कैकेयी आपल्या त्या 2 वरांची आठवण करून देते. राजा दशरथ कैकेयीला वर मागण्यास सांगतात त्यावर ती आपल्या मुला भरताला राज्य मिळावे आणि राम वनवासात जावे अशी मागणी करते. हे ऐकून राजा दशरथांना फार दुःख होतं. 
 
ज्यावेळी शत्रुध्नला हे कळते की या मंथरेमुळेच आपल्या भावाला श्रीरामाला वनवास मिळाले आहे. तेव्हा त्याने चिडून मंथरेच्या कुबडला लाथ मारली होती.