शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (15:35 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 71 ते 80

nivruttinath maharaj
गगनाचिये खोपे कडवसा लोपे । क्षरोनियां दीपें दृश्यद्रष्टा ॥ १ ॥
तें वोळलें गोकुळीं वसुदेवकुळीं । पूर्णता गोपाळीं गोपीरंगी ॥ २ ॥
जिवशिवसीमा नाहीं जेथें उपमा । हारपे निरोपमा तया माजी ॥ ३ ॥
निवृत्ति तत्पर वेदांचा ॐकार । ॐतत्सदाकार कृष्णरूपें ॥ ४ ॥
 
गगनीं उन्मनी वेदासी पडे मौनी । श्रुतीची काहणी अरुती ठाके ॥ १ ॥
तें ब्रह्म साबडे नंदाचिये घरीं । वनी गाई चारी गोपवेषें ॥ २ ॥
न पाहातां होय ब्रह्मांड पीठिका । ते युग क्षणिका हारपे रया ॥ ३ ॥
निवृत्तिदैवत कृष्ण परिपूर्ण । सर्वत्र जीवन सर्वीं वसे ॥ ४ ॥
 
गगनीं वोळलें येतें तें देखिलें । दर्पणीं पाहिलें बिंबलेपण ॥ १ ॥
तें रूप सुरूप सुरूपाचा विलास । नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥ २ ॥
सांडुनी धिटिंव जालासे राजीव । सर्वत्र अवेव ब्रह्मपणें ॥ ३ ॥
निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला । दर्पण विराला आत्मबोधीं ॥ ४ ॥
 
क्षीराचा क्षीराब्धि क्षरोनियां लोटे । वैकुंठ सपाटे पाटु वाहे ॥ १ ॥
तें माथे हरिरूप कृष्णरूप माझें । नेणिजे तें दुजें इये सृष्टीं ॥ २ ॥
सांडुनी उपमा गोकुळीं प्रगट । चतुर्भुजपीठ यमुनेतटी ॥ ३ ॥
निवृत्ति निकरा वेणु वाहे धरा । यमुने स्थिरस्थिरा नामध्वनी ॥ ४ ॥
 
निरशून्य गगनीं अंकुरलें एक । ब्रह्मांड कवतुक लीळातनु ॥ १ ॥
तें माये वो हरि गोपिका भोगिती । शुखचक्राकृति कृष्ण मूर्ति ॥ २ ॥
निराभास आस निःसंदेह पाश । तोचि ह्रशीकेश नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ति प्रकार ध्यानाचा विचार । सर्वत्र श्रीधर यशोदेचा ॥ ४ ॥
 
निरोपम गगनीं विस्तारलें एक । अनंत हे ठक गणना नाहीं ॥ १ ॥
तो माय सांवळा यमुनेचे तटीं । कृष्ण तो जगजेठी यशोदेचा ॥ २ ॥
निराकृति आकार अंकुर गोमटे । तो गोपिकांसी भेटे भाग्ययोगें ॥ ३ ॥
निवृत्ति संपन्न कृष्णरूप ध्यान । गयनी तल्लीन नाम घेतां ॥ ४ ॥
 
निराळ निरसी जीवशीवरसीं । सर्व ब्रह्म समरसीं वर्तें एक ॥ १ ॥
तें रूप परिकर कृष्णमूर्ति ठसा । गोपिकाकुंवासा नंदाघरीं ॥ २ ॥
संसाराचें तारूं ठाणमाण दिसे । शाम प्रभावसे तये ब्रह्मीं ॥ ३ ॥
निवृत्ति घनदाट कृष्ण घनःश्याम । योगी जनाध्यान नित्यरूपें ॥ ४ ॥
 
निरासि निर्गुण नुमटे प्रपंच । विषयसुक साच नाहीं नाहीं ॥ १ ॥
तें रूप गोजिरें कृष्णमूर्ति ठसा । तो गोपाळ समरसा माजि खेळे ॥ २ ॥
चित्ताची राहाविते आपणचि द्रष्टें । नेतसे वैकुंठा नाम घेतां ॥ ३ ॥
निवृतिसी ध्यान सर्व जनार्दन । वैकुंठ आपण गोपीसंगें ॥ ४ ॥
 
निरालंब देव निराकार शून्य । मनाचेंही मौन हारपलें ॥ १ ॥
तें रूप साबडें शंखचक्रांकित । यशोदा तें गात कृष्णनाम ॥ २ ॥
मौनपणें लाठें द्वैत हें न साहे । तें नंदाघरीं आहें खेळेमेळें ॥ ३ ॥
निवृत्ति आकार ब्रह्म परिवार । गोकुळीं साकारमूर्ति ब्रह्म ॥ ४ ॥
 
दुजेपणा मिठी आपणचि उठी । कल्पना हे सृष्टि गाळूं पाहे ॥ १ ॥
तें कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढें । दूध लाडेंकोडें मागतसे ॥ २ ॥
सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु । ब्रह्मींच उपवडू उघडा दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति उघड ब्रह्मांडामाजि लोळे । नंदाघरीं खेळे गोपवेष ॥ ४ ॥