सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (16:38 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 200 ते 210

nivruttinath maharaj
अनंत ब्रह्मांडें अनंत रचना । शून्य दे वासना तेथें झाली ॥ १ ॥
मन गेलें शून्यीं ध्यान तें उन्मनी । चित्त नारायणीं दृढ माझें ॥ २ ॥
तेथें नाहीं ठावो वेदासि आश्रयो । लोपले चंद्र सूर्य नाहीं सृष्टीं ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा । नेतसे वैकुठा गुरुनामें ॥ ४ ॥
 
सप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि । काया माया छाया विवर्जित दिसे तो आहे दुरी ना जवळी गे बाईये ॥ १ ॥
प्रत्यक्ष हरितो दाविपा डोळां । ऐसा सद्‍गुरु कीजे पाहोनि । तनु मन धन त्यासि देऊनी । वस्तु ते घ्यावी मागोनि गे बाईये ॥ २ ॥
पावाडां पाव आणि करी परवस्तुसि भेटी । ऐसा तोचि तो । सद्‍गुरुविण मूढासि दर्शन कैचें । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ३ ॥
एक मंत्र एक उपदेशिती गुरु । ते जाणावे भूमिभारु । निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षित्वें दावी । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ४ ॥
 
बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ॥ १ ॥
नाही काळ वेळ नाहीं तो नियम । सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥ २ ॥
हरिरूप सर्व गयनि प्रसादे । सर्व हा गोविन्द आम्हां दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति सफळ गयनि वोळला । सर्वकाळ जाहला हरिरूप ॥ ४ ॥
 
व्योमामाजि तारा असंख्य लोपति । तैसे लक्ष्मीपती माजी विरो ॥ १ ॥
धन्य दिवस नित्य सेवूं श्रीरामास । जनवनसमरस पूर्णबोधें ॥ २ ॥
तारा ग्रह दि त्या माजि उन्मन । प्रपंचाचें भान दुरी ठेलें ॥ ३ ॥
निवृत्ति निमग्न नाम सेविताहे । ब्रह्मपण होय सदोदीत ॥ ४ ॥
 
खुंटलें तें मन तोडियेली गति । वेळु तो पुढती मोडियला ॥ १ ॥
जाहालें उन्मन विरालें तें मन । श्रीरामचरण पुरे आम्हां ॥ २ ॥
गेलें मन रामीं निष्काम कल्पना । बुडाली वासना तिये डोही ॥ ३ ॥
धन्य ते चरण नित्यता स्मरण । अखंडसंपन्न प्रेम देतु ॥ ४ ॥
अमृत कुपिका अमृताचा झरा । पटु येकसरा वाहातुसे ॥ ५ ॥
निवृत्तीची वृत्ति प्रेमेंचि डुल्लत । नमनेम निश्चित रामपायीं ॥ ६ ॥
 
सौजन्य समाधान सर्व जनार्दन । आम्हां रूपेंधन इतुके पुरें ॥ १ ॥
गोपाळ माधव कृष्णरूपें सर्व । ब्रह्मपद देव सकळ आम्हां ॥ २ ॥
द्वैतभाव भावो अद्वैत उपावो । सर्व ब्रह्म देवो एक ध्यावो ॥ ३ ॥
निवृत्तीचा भावो सर्व आत्मा रावो । हरि हा अनुभवो वेदमतें ॥ ४ ॥
 
मातेचें बाळक पित्याचें जनक । गोत हें सम्यक हरि आम्हां ॥ १ ॥
मुकुंद केशव हाचि नित्य भाव । हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥ २ ॥
पूर्वज परंपरा तें धन अपारा । दिनाचा सोयिरा केशिराज ॥ ३ ॥
निवृत्तीचे गोत कृष्ण नामें तृप्त । आनंदाचें चित्त कृष्णनामें ॥ ४ ॥
 
विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम । जप हा परम आत्मलिंगीं ॥ १ ॥
निवृत्ति घन दाट कृष्णरूपें आम्हा । अखंड पूर्णिमा नंदाघरीं ॥ २ ॥
निवृत्तिचित्ताची गेली लगबग । केला अनुराग कृष्णरूपीं ॥ ३ ॥
निवृत्ति धारणा कृष्णनाम सार । सर्वत्र आचार हरिहरि ॥ ४ ॥
 
तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित । त्यामाजि त्वरित जन्म माझा ॥ १ ॥
सर्व पुण्य चोख आचरलों आम्हीं । तरिच ये जन्मीं भक्ति आम्हां ॥ २ ॥
शांति क्षमा दया निवृत्ति माउली । अखंड साउली कांसवदृष्टि ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तेंचि गा जीवन मोल । भिवरा विठ्ठल दैवत आम्हां ॥ ४ ॥
 
चातकाचें ध्यान मेघाचें जीवन । आम्हां नारायण तैसा सखा ॥ १ ॥
चकोरा अमृत चंद्र जिववितें । भक्तांसि दुभतें हरि आम्हां ॥ २ ॥
विश्रांतीसी स्थळ वैकुंठ सफळ । दुभतें गोपाळ कामधेनु ॥ ३ ॥
आशापाश नाहीं कर्तव्या कांही । चिंतामणि डोहीं एकविध ॥ ४ ॥
समिरासगट गति पावली विश्रांति । नामरूप जाति भेदशून्य ॥ ५ ॥
नामाची हे धणी तेचि हो पर्वणी । तृप्तातृप्त कृष्णीं होतु आम्हां ॥ ६ ॥
सांडिले पैं द्वैत दिधलें पै अद्वैत । हरीविण रितें न दिसे आम्हां ॥ ७ ॥
निवृत्ति परिवार मुक्तलाग अरुवार । रत्नांचा सागर नामें वोळे ॥ ८ ॥