मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (15:55 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 171 ते 180

nivruttinath maharaj
चेतवि चेतवि सावधान जिवीं । प्रकृति मांडवी लग्न वोजा ॥ १ ॥
मातृका मायानिवेदन हरि । प्रपंचबोहरि रामनामें ॥ २ ॥
निवृत्तिदेवीं अद्वैत परणिली शक्ति । निरंतर मुक्ति हरि नामें ॥ ३ ॥
 
हरि आत्मा होय परात्पर आलें । नाम हें क्षरलें वेदमतें ॥ १ ॥
वेदांतसिद्धांत नाहीं आनुहेत । सर्वभूतीं हेत हरि आहे ॥ २ ॥
हरिवि न दिसे गुरु सांगतसे । हरि हा प्रकाशे सर्व रुपीं ॥ ३ ॥
निवृत्तिनें कोंदले सद्‌गुरूंनीं दिधलें । हरिधन भलें आम्हां माजी ॥ ४ ॥
 
सुमनाची लता वृक्षीं उपजली । ते कोणे घातली भोगावया ॥ १ ॥
तैसा हा पसारा जगडंबर खरा । माजि येरझारा शून्यखेपा ॥ २ ॥
नाहीं त्यासि छाया नाहीं त्यासी माया । हा वृक्ष छेदावया विंदान करी ॥ ३ ॥
निवृत्तिराज म्हणे गुरुविण न तुटे । प्रपंच सपाटे ब्रह्मीं नेम ॥ ४ ॥
 
छेदियेला वृक्ष तुटलें तें मूळ । प्रपंच समूळ उडोनि गेला ॥ १ ॥
गेलें तें सुमन गेला फुलहेतु । अखंडित रतु गोपाळीं रया ॥ २ ॥
सांडिला आकारु धरिला विकारु । सर्व हरिहरु एकरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति निधान वोळले गयनी । अमृताची धणी आम्हां भक्ता ॥ ४ ॥
 
परम समाधान परमवर्धन । नाम जनार्दन क्षरलें असे ॥ १ ॥
अक्षर अनंत क्षर हा संकेत । मागुतें भरत आपण्यामाजी ॥ २ ॥
आपण क्षरला आपण उरला । वैकुंठी वसिन्नला चतुर्भुज ॥ ३ ॥
निवृत्तिगुरुगयनी सांगितलें हरि । नाम चराचरीं विस्तारलें ॥ ४ ॥
 
विस्तार हरिचा चराचर जालें । त्या माजी सानुलें गुरु दैवत ॥ १ ॥
गुरुविण व्यर्थ विज्ञान न संपडे । ज्ञान हेतुकडे हिंडनें व्यर्थ ॥ २ ॥
गुरु परब्रह्म गुरु मात पिता । गुरूविण दैवत नाहीं दुजें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज गुरु बोध दिठी । भक्ति नाम पेटी उघडिली ॥ ४ ॥
 
तुटलें पडळ भेटलें केवळ । सर्व हा गोपाळ गुरुमुखें ॥ १ ॥
न देखों बंधन सर्व जनार्दन । व्यासदिकीं खूण सांगितली ॥ २ ॥
ब्रह्मांडविवरण हरिचा हा खेळ । त्यांतील हा वेळ तोडियेला ॥ ३ ॥
निवृत्ति बोधला गुरुखुणा बोध । मनाचा उद्बोध हरिचरणीं ॥ ४ ॥
 
मारुनि कल्पना निवडिलें सार । टाकीलें असार फलकट ॥ १ ॥
धरिला वो हरि गोविलेंसे सर्व । विषयाची माव सांडीयेली ॥ २ ॥
पहाते दुभतें कासवी भरितें । नेत्रानें करितें तृप्त सदा ॥ ३ ॥
निवृत्ति अमृत गुरुकृपातुषार । सर्व ही विचार हरि केला ॥ ४ ॥
 
आमचा साचार आमचा विचार । सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश । सर्व ह्रषीकेश दावियेला ॥ २ ॥
हरिवीण दुजे नेणें तो सहजे । तया गुरुराजें अर्पियेलें ॥ ३ ॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा । हरिचिया पंथा मनोभाव ॥ ४ ॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप । एक्या जन्में खेप हरिली माझी ॥ ५ ॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी । आपुला शरीरीं हरि केला ॥ ६ ॥
 
सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ १ ॥
विरालें ते ध्येय ध्यान गेलें मनीं । मनाची उन्मनि एक जाली ॥ २ ॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भाव नाहीं आम्हां ॥ ३ ॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादें । सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥ ४ ॥