शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (12:15 IST)

श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी

समाजामध्ये अनेक रूढी-परंपरा आपण आपल्या परीने जपत असतो. माणसाने नेहमीच श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी. सणाच्या निमित्ताने दान-धर्म, उपवास केले जातात. दानधर्म केला जातो. खरं तर अशा पद्धती जरूर जपाव. महत्त्व देताना मात्र त्या व्यक्तीला खरंच तुमच्या देण्याची गरज आहे का हे पाहावे. आता हेच बघा ना! आपण ज्याच्याकडे खूप काही असते, त्यालाच द्यायला उत्सुक असतो. पण ज्याच्याकडे नाही त्याच्या विचारही डोक्यात घेत नाही. कामाला असणारी मावशीच काय पण आपल्या आसपास असे खूप जण असतात, ज्यांना आपल्या मदतीची खरंच गरज असते, पण होते मात्र उलटेच. आपण ज्या परंपरा जपतो त्यांचा योग्य उपयोग होतो का हेही पाहिलेच पाहिजे. कोणीतरी सांगतो म्हणून करायचे. यापेक्षा तुमच्या मनाला पटणार्‍याच गोष्टी करा. माणसाने श्रद्धा ठेवली तर त्याचा त्रास होत नाही. पण अंधश्रद्धेने मात्र बरीच कामे बिघडतात.
 
आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनातही बरेच जण त्या परंपरांना व्यवस्थित जपतात. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे त्यांना स्वत:ला त्रास होत नाही ना याचीही त्यांनी स्वत:च काळजी घ्यायला हवी. उपवास केल्याने आजारी व्यक्तींना त्रास होतो हे त्यांना डॉक्टरांनी, घरच्यांनी सांगितलेले असते.
 
पण इतके दिवस केले अन् आता सोडले तर.. तर प्रकृती बिघडवणे योग्य आहे का? सोनारानेच कान टोचावे ही एक म्हण आपल्याकडे रूढ आहे, पण इथे तर डॉक्टरांचेही ऐकलं जात नाही. तसं तर स्त्रिांना, घरात बसणार्‍या असो किंवा कामाला जाणार्‍या असो त्यांना काम भरपूर असते. घरची काय कमी म्हणून बाहेरच्याही बर्‍याच जबाबदार्‍या त्यांच्यावर सोपवलेल्या असतात. मग या सार्‍या ताण-तणावात त्या स्वत:चे आरोग्य जपायचे विसरूनच जातात. स्वत:चे महत्त्व स्वत:च विसरतात ज्या स्त्रीला कामासाठी नेहमी सज्ज राहायचे असते तिने तर आपली प्रकृती, मन:स्थिती अन् सभोवतालचे वातावरण याची काळजी घेतलीच पाहिजे.
 
फक्त हजारो वर्षापासून सार्‍यांनी हे केलं म्हणून मी हे करायचं. यापेक्षा मला हे योग्य वाटते म्हणून मी ते करते हा निश्चय ठाम असायला हवा. तरच स्त्रीशक्तीचा खर्‍या अर्थाने जागर होईल. घरामध्ये सर्वाबरोबर स्वत:लाही महत्त्व द्यायला हवे. तसेच नको त्या गोष्टीचा ताण मनावर घ्यायला नको. अट्टहास  केल्याने नेहमीच चांगले होते असे नाही तर बर्‍याच वेळेला स्वत:बरोबर सार्‍यांनाच त्रास होतो.
 
घरामध्ये आपल्यासह आणखी ज्या स्त्रिया आहेत, आपल्या घरकामासाठी म्हणा किंवा जिथे तुम्ही नोकरी करता तेथेसुद्धा स्त्रिांना या रूढी-परंपरा जपताना स्वत:ला जपण्याचे महत्त्व सांगा. तरच स्वत:बरोबर इतरांचे आरोग्य जपले जाईल.
 
आशा पाटील