गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय दुसरा

॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥
अध्याय दुसरा
समास पहिला

महाराष्ट्रिं या माणगंगातिरातें । असे पुण्य गोंदावलें क्षेत्र तेथें ॥
यजुर्वेदि विप्रगृहीं जन्म घेती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ २ ॥
 
जयजय श्रीज्ञानसूर्या । सच्चिदानंदा गुरुराया ।
अवस्था भेदोनि तुर्या । सहजस्थितिनिवासा ॥ १ ॥
तुझिय कृपाप्रकाशें । वस्तुजात तितुकी दिसे ।
स्पष्टपणें उमजत असे । नित्यानित्य ॥ २ ॥
उदय होतां गभस्ती । डोळस क्रिया चालती ।
अज्ञानाची निवृत्ति । होत असे ॥ ३ ॥
तैसा सद्गुनरु दिनकर । दवडी अज्ञान अंधकार ।
भाविकांसी पैलपार । ज्ञानतेजे पाववी ॥ ४ ॥
जे अज्ञानरजनी निजेले । स्वस्वरूप विसरले ।
जन्ममरणस्वप्नीं भ्रमले । सदोदित ॥ ५ ॥
कोणी अहंकारे उन्मत्त होती । घरघरां घोरों लागती ॥
तस्कर हिरावोनि घेती । अर्थ ज्यांचे ॥ ६ ॥
कित्येक अंधारी फिरती । सर्प विंचू दंश करिती ।
दुःखें तळमळोनि पडती । अधोभागीं ॥ ७ ॥
लोभमोहाचेनि नेटें । स्वप्नवैभव खरें वाटे ।
सवेंचि जातां भ्रष्टे । वृत्ति जयांची ॥ ८ ॥
कित्येक नृप थोर थोर । स्वप्नीं भिक्षा दारोदार ।
मागोनि भरती उदर । हारपले स्वसत्ते ॥ ९ ॥
मुमुक्षु अत्यंत बिहाले । जन्ममृत्युपिशाच्च देखिलें ।
चातकापरी पाहों लागले । वाट उदयाची ॥ १० ॥
विषयपरागाचेनि संगें । कमलसुमनीं गुंतले भुंगे ।
उदय होतांचे वेगें । मुक्त होती ॥ ११ ॥
दक्षाचियें पोटीं । उद्यमाची आवडी मोठी ।
परि अंधाराची मिठी । कांही न चाले ॥ १२ ॥
तैसे बद्ध मुमुक्षु अंध । झाले असती सखेद ।
जंव ज्ञानसूर्य गुरुपद । उदय न पावे ॥ १३ ॥
तमीं दाटलें चित्त । मोहानें भ्रमोनि बरळत ।
तयां सद्गुंरु अभय देत । ज्ञानज्योती उजळोनि ॥ १४ ॥
कैसें नवल उदयाचें । नाशिले विकार त्रिगुणांचे ।
तुर्यातीत अवस्थेचें । ज्ञान होय ॥ १५ ॥
तम म्हाणजे अंधकार । दीपतेज रजोविकार ।
सत्त्व चांदणे निर्धार । लया गेलें ॥ १६ ॥
सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था । येतसे साधकांचे हातां ।
भवसिंधु तरूनि जातां । सुलभ होय ॥ १७ ॥
अरुणोदयाचे संधी । अनुतापें जैं चित्तशुद्धी ।
तैं ज्ञानोदय कृपानिधी । सद्गुुरुनाथ ॥ १८ ॥
मग वासना निमाली । मना उन्मनता आली ।
ज्ञानदृष्टी पैसावली । भूतीं देखे भगवंत ॥ १९ ॥
तैसी भक्ति घर रिघे । वैराग्य रोमरंध्रीं जागे ।
ज्ञानरूप होवोनि अंगें । सहजानंदी निमग्न ॥ २० ॥
ऐसा ज्ञानसूर्य गुरुवर । मुमुक्षुचातकां आधार ।
निजसखा हाचि निर्धार । इतर सर्व मायिक ॥ २१ ॥
रविहूनि तेजाळ । परि उष्ण ना शीतळ ।
विकाररहित निर्मळ । सहज समाधी ॥ २२ ॥
उदयास्त पावे भास्कर । सद्गु रु नित्य निरंतर ।
आदिमध्यान्तविकार । नाहीं तेथें ॥ २३ ॥
उदय होतां गभस्ती । सत्यासत्य क्रिया चालती ।
होतां सद्गुभरुप्राप्ती । विमलमार्गी पवाडे ॥ २४ ॥
उदय पावले सद्गु्रु । लीला तयांची आदरूं ।
साष्टांगी वंदन करूं । प्रेमळ भावें ॥ २५ ॥
मागां श्रोतीं जे पुसिलें । गुरुलीला विशद बोलें ।
सप्रेम वंदोनि पाउलें । निरूपिजेल ॥ २६ ॥
येरवीं सांग गुरुकथा । गुरुवांचोनि दुजा न वक्ता ।
परि व्हावया समाधान चित्ता । आला प्रसाद अंगीकारूं ॥ २७ ॥
अनंतकोटि ब्रह्मांड । माजीं पृथ्वी नवखंड ।
त्यांतील जें भ्रतखंड । पुण्यभूमी ॥ २८ ॥
जें धनधान्यादिकें समृद्ध । सुवर्णभूमी नामें प्रसिद्ध ।
जेथें मूर्तिमंत वेद । नांदतसे ॥ २९ ॥
जें विद्येचे माहेत । ज्ञानाचें असे कोठार ।
सत्त्वगुणें केलें घर । पुण्यक्षेत्र म्हणोनि ॥ ३० ॥
हरिहरादिक मूर्ति । नित्य नूतन अवतार घेती ।
दुष्टां छेदोनि सुखी करिती । सर्व जन ॥ ३१ ॥
कृषीवल नांगरी शेत । हरळी कुंदा काढीत ।
उत्तम पिकें होय युक्त । भूमिका जेवीं ॥ ३२ ॥
तैसीं हरिहरादिक भले । वेळोवेळां काढिती किडाळें ।
श्रेष्ठ पुरुष सत्त्वागळे । प्राप्त होती ॥ ३३ ॥
भगीरथें गंगा आणिली । सदाशिवें वसति केली ।
पुंडलिकें विटे माउली । भक्तजनां आधार ॥ ३४ ॥
कोणी सूर्यातें झांकिती । देवशत्रु विदारिती ।
कोणी समुद्र प्राशिती । तपोबळें ॥ ३५ ॥
कित्येक देवांशीं झुंजती । त्रिलोकीं सत्ता स्थापिती ।
कोणी धैर्याची मेरुमूर्ति । होऊनि गेले ॥ ३६ ॥
विश्ववायु निरोधी कोणी । प्रतिसृष्टि निर्मिती ज्ञानी ।
कित्येक स्वस्वरूपा पावोनि । निश्चल झाले ॥ ३७ ॥
कोणी निर्जीवा चालवी । पशुमुखें वेद बोलवी ।
स्वर्गींचे पितर जेववी । प्रत्यक्ष येथें ॥ ३८ ॥
देहाच्या करी पुष्पें तुलसी । देहासहित वैकुंठवासी ।
पाषाणमुखीं ग्रासासी । घाली कोणी ॥ ३९ ॥
ऐसा जो कां पुण्यदेश । भक्तिभावें पावन विशेष ।
नाना तीर्थांचे प्रदेश । जया ठायीं ॥ ४० ॥
तयाचे दक्षिणदिग्भागीं । कृष्णा गोदा चालिल्या वेगीं ।
पावन करित भेटीलागीं । सरित्पतीच्या ॥ ४१ ॥
महाराष्ट्र नामें देश । दोन्ही नद्या मध्यप्रदेश ।
माणगंगातटाक विशेष । माण नामें प्रसिद्ध ॥ ४२ ॥
ऐशिया माणदेशीं । गोंदावलें नाम ग्रामासी ।
बुद्रुक संज्ञा जयासी । तें सद्गुरूंचें जन्मस्थान ॥ ४३ ॥
पूर्वदिशे पंढरपूर । सहा योजनें असे दूर ।
मार्गीं जो कां सिद्धेश्वर । म्हसवडीं नांदे प्रसिद्ध ॥ ४४ ॥
दक्षिणेसी शुकस्थान । दुजें कुरोली सिद्ध जाण ।
सिंहनाद होतो गहन । परम पावन क्षेत्र जें ॥ ४५ ॥
पश्चिमे वेरळातीरासी । नागनाथ क्षेत्र परियेसीं ।
उत्तरे शिखर शिंगणापुरासी । कैलासपती नांदतसे ॥ ४६ ॥
माणगंगातीरासी । ज्ञानवापी संगमासी ।
पुण्यक्षेत्रीं गोंदावलीशीं । भीमाशंकर स्थान असे ॥ ४७ ॥
असो ऐशिया क्षेत्रांत । विप्रकुटुंब नांदत ।
'घुगरदरे' उपनाम विख्यात । पूर्वीं होतें प्रसिद्ध ॥ ४८ ॥
अंगिकारिली जैं वृत्ती । कुलकर्णी ऐसें बाहती ।
इनाम मिळविली शेती । इनामदार कोणी म्हणे ॥ ४९ ॥
देशस्थ यजुर्वेदी बाह्मण । शाखा असे माध्यंदिन ।
वसिष्ठ गोत्र असे जाण । सुप्रसिद्ध तें ॥ ५० ॥
उदरनिर्वाहापुरती । लेखनवृत्ती आदरिती ।
गृहस्थाश्रमीं वर्तती । नीतिन्यायें ॥ ५१ ॥
जयांचे कुळीं दैवत । मुख्यत्वें असे पंढरीनाथ ।
शुद्ध एकादशी नेमस्त । वारी जयांची ॥ ५२ ॥
नित्य होत हरिभजन । आवडी नामसंकीर्तन ।
मुद्रा माळा हें भूषण । असे जयांचें ॥ ५३ ॥
वंशवृक्ष विस्तारला । फलपुष्पभारें शोभला ।
लिंगोपंत नामें भला । पुरुष झाला विख्यात ॥ ५४ ॥
संपत्ति जयाची आगळी । उत्तरोत्तर वाढली ।
धान्यादिकें समृद्धी झाली । बहुप्रकारें ॥ ५५ ॥
सुंदर गाई वांसरें । महिषी वृषभ जनावरें ।
शेळ्या आणि कोंकरें । कितीएक ॥ ५६ ॥
दासदासी कुलवाडे । शेती चालली धडाडे ।
धनधान्याचा ढीग पडे । भाग्यवंत ॥ ५७ ॥
ग्रामाधिकार यथान्याय । चालवी, न करी अन्याय ।
अधिकारीवर्ग गुण गाय । बहुप्रकारें ॥ ५८ ॥
संपत्ति घरीं पाणी भरी । आणि परमार्थी आवडी भारी ।
दोन्ही नांदती एकसरी । ऐसें स्थळ दुर्मिळ ॥ ५९ ॥
लक्षीमदें नर धुंद होती । लक्ष्मीनायका विसरती ।
न कळे धर्माधर्म नीति । विषयभोगीं अतृप्त ॥ ६० ॥
स्वेच्छाचारे वर्तती । सुज्ञासी धर्मवेडा म्हणती ।
आयुष्य जाईल विलयाप्रती । ऐसें स्वप्नीं न ये कदा ॥ ६१ ॥
जेथें श्री आणि श्रीधर । उभय कार्य चाललें थोर ।
तो भगवदंश निर्धार । सत्य सत्य जाणावा ॥ ६२ ॥
लिंगोपंत अत्यंत सात्त्विक । गृहधर्म पाळी अशेख ।
अतिथिसेवा निःशंक । अत्यादरें करितसे ॥ ६३ ॥
पंढरीकुलधर्म घरीं । नित्य नेमें वारी करी ।
भजन कळाकुसरीं । टाळ वीणा मृदंग ॥ ६४ ॥
प्रातःकाळी करूनि स्नान । ब्रह्मकर्म देवतार्चन ।
भगवद्गीता करी पठण । अतिप्रीतीं ॥ ६५ ॥
नित्य हरिपाथ वाची । आल्या अतिथा अन्न वेचीं ।
आवडी अध्यात्मश्रवणाची । जयालागीं ॥ ६६ ॥
रात्रौ हरिभजनीं सादर । वाणी जयाची मधुर ।
प्रेमें वाहे नयनीं नीर । नाचतसे प्रेमभरें ॥ ६७ ॥
भगवच्चरणी अढळ लक्ष । प्रपंची उद्यमी अति दक्ष ।
दीनाचा घेऊनी पक्ष । युक्तिप्रयुक्तीं सांभाळी ॥ ६८ ॥
भार्या राधा पतिव्रता । पतिवांचूनि देवता ।
न मानी जी तत्त्वतां । एकनिष्ठ सेवा करी ॥ ६९ ॥
गृहीं गृहिणी शोभली । बाह्य कीर्ति पैसावली ।
तया भाग्याची साउली । इच्छिती जन ॥ ७० ॥
संसार थोर चालला । संतती-संपत्तीनें भरला ।
रावजी नामें पुत्र झाला । स्थिरबुद्धी ॥ ७१ ॥
विद्या वृत्ति-व्यवहार । शिकवोनि केला थोर ।
मग विवाहाचा विचार । करों लागले ॥ ७२ ॥
वर पहावया अनेक । गांवोगांवचे येती लोक ।
विद्या वैभव वागणूक । वररूप पाहती ॥ ७३ ॥
कोणी वैभव वांछिती । कोणी वयसीमा पाहती ।
कोणी शरीरसंपत्ति । आणि स्वरूप ॥ ७४ ॥
कोणी म्हणती पाहिजे वर केवळ । नको सासूसासर्यांचा छळ ।
नणंदा-जावांचा जोंजाळ । असूंच नये ॥ ७५ ॥
म्हणती वर विद्वान् असावा । कोणी म्हणे उद्यमी असावा ।
धारिष्टें असावा बरवा । सकलां ठायीं ॥ ७६ ॥
कोणी म्हणे भलतें झालिया । स्थावर असावें खाया ।
हिस्सेरशीनें जांवया । काय येईल ॥ ७७ ॥
कित्येक जे बिडालबुद्धी । विक्रये खाती द्रव्यनिधी ।
असेल जें जें प्रारब्धीं । तैसें कन्येचें होईल ॥ ७८ ॥
न पाहती वयसीमा । कुल विद्या आणि आरामा ।
कन्याविक्रयी अधमाधमा । अधोगती होतसे ॥ ७९ ॥
कित्येक धनानें भुलले । अधर्माचे पाये घातले ।
कुलवंत सात्त्विक भले । विरळा शोधी ॥ ८० ॥
असो ऐसी लोकस्थिती । नोवर्या सांगोन येती ।
लिंगोपंत विचारी चित्तीं । वधू कैसी योजावी ॥ ८१ ॥
मातुलगृहींचे आचार । संतती करिते अंगीकार ।
जाणोनि हा आधार । सूक्ष्मदृष्टीं न्याहाळी ॥ ८२ ॥
कुलवंत बुद्धिवंत । आचारशील दयावंत ।
विवेकी आणि भगवद्भक्त । असतां भली ॥ ८३ ॥
अधर्में धन मेळविती । धार्मिकाचा आव आणिती ।
धना पाहुनी भुलती । कितीएक ॥ ८४ ॥
अथवा धनाचे मदभारें । वागती नाना कुविचारें ।
म्हणोनि सूक्ष्मविचारें । निरीक्षण करी ॥ ८५ ॥
दैवयोगें दारिद्र्य आले । नीतीनें पाहिजे भोगिलें ।
कुनीतीकरितां गेलें । श्रेष्ठत्व कुळाचें ॥ ८६ ॥
पूर्वजांची महाव्याधी । क्वचित् संततीसी बाधी ।
यास्तव तो सूक्ष्मबुद्धी । शोधीतसे ॥ ८७ ॥
वाघमारे कलढोणकर । सात्विक सज्जन इनामदार ।
नारायणकन्या उपवर । निश्चित केली ॥ ८८ ॥
विवाहसमारंभ केला । वधूप्रवेश गृहीं झाला ।
गीतानामें पाचारिती जिला । उभयकुलोद्धारक ती ॥ ८९ ॥
लिंगोपंत वृद्ध झाले । प्रपंच करोनि थकले ।
रावजीहातीं काज दिलें । नीतिन्यायें सांभाळीं ॥ ९० ॥
मज आले वृद्धपण । हरिचिंतनावांचूनि जाण ।
आतां काज नसे अन्य । उचित बापा ॥ ९१ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय दुसरा
समास दुसरा
 
संसारगाडा चालला नीट । लिंगोपंत झाले जरठ ।
वारी करितां बहु कष्ट । होऊं लागले ॥ १ ॥
परि एकनिष्ठ वैष्णव । विठ्ठलचरणीं दृढभाव ।
देहाची ज्या नसे कींव । वारीपुढें ॥ २ ॥
ऐसा काळ बहुत गेला । विठ्ठला कळवळा आला ।
भक्तिप्रेमे पाझरला । धांव घेई ॥ ३ ॥
देव भक्तांची माउली । भक्तचिंता त्यास लागली ।
वृत्ति पाहिजे विश्वासली । परि तेंचि कथिण ॥ ४ ॥
स्वप्नीं येवोनि सांगत । तुझी भक्ति दृढ बहुत ।
देज्खोनि प्रसन्न मी पंढरीनाथ । झालो आजीं ॥ ५ ॥
तव देह जीर्ण झाला । परि भक्तिभाव वाढला ।
वारी करितां भागला । बहु दिससी ॥ ६ ॥
तरी आतां ऐसें न सोसावें । तूं कष्टतां मी दुखवे ।
आज्ञापितो तें ऐकावें । एकचित्तें ॥ ७ ॥
तुझिया भक्ति भुलोनि । आलों असें तव सदनीं ।
विठ्ठलरखुमाई मूर्ति दोन्ही । विहिरीमाजीं असती ॥ ८ ॥
काढोनियां मूर्तींप्रती । स्थापन कराव्या वेदोक्तीं ।
नित्य पूजा पंचारती । अतिआदरें करावी ॥ ९ ॥
तयांचे घेतां दर्शन । वारी होईल परिपूर्ण ।
येविषयीं संशयी मन । करों नये ॥ १० ॥
ऐसा दृष्टांत होतां पाहीं । मूर्ति काढल्या लवलाही ।
यथाविधी स्थपिल्या गृहीं । अत्यानंदें ॥ ११ ॥
नित्यपूजा नैवेद्यासी । जमीन दिधली देवासी ।
सेवा करिती अहर्निशी । निरालम्यें ॥ १२ ॥
कुळीं जयांच्या भगवंत । प्रत्यक्ष असे नांदत ।
तयांची थोरवी वर्णूं येथ । किती म्हणोनि ॥ १३ ॥
सुकृतें जयांचीं आगळीं । ते नर जन्मती या कुळीं ।
उत्तरोत्तर भक्ति जिव्हाळीं । वाढों लागे ॥ १४ ॥
नदी उगमीं सूक्ष्म वाहत । पुढतपुढती प्रवाह वाढत ।
समुद्रमिळणीं न लागे अंत- । पार जियेचा ॥ १५ ॥
संगमी समरस होये । वेगळेपणें काढितां नये ।
सागर होवोनि राहे । भेदरहित ॥ १६ ॥
सूक्ष्म प्रवह ओहोळ नाले । सरळी सरोवर निघाले ।
मिळणी मिळतां एकचि झाले । संगतीं तारिले असंख्य ॥ १७ ॥
तैसी ही कुलनदी । ब्रह्मरसीं मीनली अनादि ।
तारिली असंख्य शिष्यमांदी । बोधामृत पाजूनिया ॥ १८ ॥
लिंगोपंतांची भक्ती ऐसी । रावजी स्वयें उदासी ।
परि पित्राज्ञा मानोनि आदरेंसी । प्रपंचगाडा चालवी ॥ १९ ॥
घेतला प्रपंचभार भाथां । चालवीतसे कार्यापुरता ।
येरवीं प्रिय ज्याचे चित्ता । एकांतवास ॥ २० ॥
सदा विठ्ठलचिंतन । परपीडेचे दुःख जाण ।
शेतीं कष्टोनि आपण । धान्य मेळवी ॥ २१ ॥
स्वयें पाणी आणावें । अन्नही स्वतः शिजवावें ।
खावोनिसुखी असावें कष्ट न देई कोणासी ॥ २२ ॥
जरी गृहीं अर्धांगी । वचनसीमा नुल्लंघी ।
तरी नियमा न त्यागी । आदरिलें ज्या ॥ २३ ॥
येतां नदीस्नान करोनि । स्पर्श करिती उपहासोनि ।
पुनरपि जाई स्नानालागोनि । परि क्रोध शिवेना ॥ २४ ॥
अप्पा पाटील ग्रामस्थ । यांनी केला केला बंदोबस्त ।
परि रावजी भरे न भरित । सात्त्विक धर्ममूर्ती ॥ २५ ॥
ऐसी ठेवोनि वृत्ती । स्वधर्मकर्मी रत होती ।
प्रपंची न जडे आसक्ती । कार्याकारण ॥ २६ ॥
गृहीं दुर्लक्ष झालें । वैभवावरोनि मन उडालें ।
विर्वाहापुरतें राहिलें । स्वल्प कांहीं ॥ २७ ॥
जितुका करावा व्याप । तितुका होतसे संताप ।
साधनीं येई विक्षेप । क्षणोक्षणीं ॥ २८ ॥
विषय लोभ नाही मनीं । वैराग्य वारिलें जयांनीं ।
ऐसे रावजी अंतर्ज्ञानी । जरी लोकीं दिसती साधारण ॥ २९ ॥
विषयीं मानिला वीट । परमार्थीं लागली चट ।
उपासना एकनिष्ठ । निरालस्यें चालवी ॥ ३० ॥
गीताबाई सगुणखाणी । पतिव्रताशिरोमणि ।
सदा तत्पर पतिवचनीं ऽत्यादरें ॥ ३१ ॥
गृहकाजीं दक्ष सदा । वृद्धांसि देई आनंदा ।
सेवेसी नसे मर्यादा । हास्य मुखी ॥ ३२ ॥
अरुणोदयापूर्वीं । उठोनि गृह सारवी ।
रांगोळी घाली बरवी । चित्रविचित्र ॥ ३३ ॥
वेणीफणी सुंदर । कुंकुमादि अलंकार ।
लक्ष्मीपरी साचार । दर्शनें आनंदची ॥ ३४ ॥
देवकाजीं अति सादर । उपकरणीं निर्मळ सुंदर ।
रंगवल्यादि मनोहर । देवगृहा सुशोभवी ॥ ३५ ॥
पुष्पमाळा तुळसीमाळा । गुंफोनि देत वेल्हाळा ।
कामाचा नसे कंटाळा । तियेलागीं ॥ ३६ ॥
गरजेआधी साहित्य पुरवी । मधुरवचनी तोषवी ।
सत्कार्यालागीं झिजवी । देह आपुला ॥ ३७ ॥
नव्हे अंगचोर खादाड । झोळू कुटिल आणि द्वाड ।
ओंगळ तोंडाळ तुसड । कुतर्की हटवादी ॥ ३८ ॥
नव्हे भ्याड ना अति धीट । गृहकार्यें चालवी नीट ।
सासूनणंदांसी बोभाट । कराया ठाव नाहीं ॥ ३९ ॥
पति सासू आणि श्वशूर । तुळसी विठ्ठल रखुमाईवर ।
इतुक्यांची सेवा चतुर । नेमस्तपणें चालवी ॥ ४० ॥
वाटे दुजी अनुसूया । अथवा सती जनकतनया ।
पावली भाव पाहूनिया । जगन्माता जगदंबा ॥ ४१ ॥
देवब्घक्तांचे दर्शन । घ्यावया उल्हसित मन ।
उभयतां धरिती चरण । सद्भक्तांचे ॥ ४२ ॥
संभाजी साधु दर्यांत । तेथें उभयतां दर्शना जात ।
चरणीं मस्तक ठेवित । करद्वय जोडोनि ॥ ४३ ॥
त्या साधूंची ऐशी स्थिति । कोणासी स्पर्श करूं न देती ।
लोकीं केली विनंती । यांसीच स्पर्श किंनिमित्त ॥ ४४ ॥
साधु बोलती तयांसी । धन्य असे यांची कुशी ।
उदरीं अवतार देवासी । येणें असे । ४५ ॥
यांचे भाग्य असे थोर । पूर्वसंचित अपरंपार ।
उदरीं होईल अवतार । सगुण ब्रह्म ॥ ४६ ॥
परिसोनि विस्मय करिती । धन्यवाद मुखीं गाती ।
तैसाच रावजीप्रती । दृष्टांत होय एकदिनीं ॥ ४७ ॥
स्वप्नीं येत पंढरीनाथ । कौस्तुभ-श्रीवत्सांकित ।
कंठीं वनमाला शोभत । शंखचक्रधारी ॥ ४८ ॥
कांसे पीतांबर कशिला । मयूरपिच्छें मुगुट शोभला ।
रावजीसन्मुख उभा ठाकला । हास्यमुखें बोलतसे ॥ ४९ ॥
तुझी भक्ती फळा आली । सुकृतें असंख्य जोडलीं ।
भार्या पतिव्रता लाभली । धन्य कुशी तियेची ॥ ५० ॥
तुम्हांसि होईल सुत । महावैष्णव भगवद्भक्त ।
कीर्ति करील दिगंत । सिद्ध पुरुष ॥ ५१ ॥
असंख्य तारील नर । होईल कारणिक अवतार ।
तुमचें भाग्य असे थोर । सद्गतीस पावाल ॥ ५२ ॥
ऐसा दृष्टांत झाला । भार्येसी निवेदन केला ।
उभयतां आनंद झाला । पोटीं न समाये ॥ ५३ ॥
भाग्य आमुचें उदेले । अहा देवा धन्य केलें ।
दीनांसी हातीं धरियेलें । काय भक्ति पाहिली ॥ ५४ ॥
भक्तकाजकल्पद्रुम । म्हणती तुज आत्माराम ।
भक्तांचे हरिसी श्रम । नमन असो आमुचें ॥ ५५ ॥
बहुतां परीनें स्तुती । केली उभयतांनीं चित्तीं ।
कालांतरें गर्भाप्रती । धारण करी गीताई ॥ ५६ ॥
एक मांस होता पूर्ण । पाळी चुकली बाणली खूण ।
आनंदी-आनंदलें मन । सर्वत्रांचें ॥ ५७ ॥
तिजे मासाचे अवसरीं । शिंक्याखालीं बसविती नारी ।
चोरओटी भरोनि सत्वरीं । वायनें देवविती ॥ ५८ ॥
हळूंहळूं डोहाळे लागती । शांति आदरिली चित्तीं ।
प्राकृताऐसे नव्हेती । साधारण वा कष्टमय ॥ ५९ ॥
जैसे लागती डोहाळे । तैसीं निपजती बाळें ।
माता करिती चाळे । त्या त्या परी ॥ ६० ॥
गीताबाईची स्थिति । पहा झाली कैशा रीती ।
जेणें श्रवण तृप्त होती । कथन करूं ॥ ६१ ॥
एकंती जावोनि बैसे । रामनाम घेई हर्षें ।
सात्त्विक आहार करितसे । आवडीनें ॥ ६२ ॥
पतीनें एकांती पुसिलें । काय इच्छा असे बोलें ।
सती वदे इच्छें भ्रमले । तोह्र थोर ॥ ६३ ॥
निर्हेतुक रामभक्ति । करावी वाटते चित्तीं ।
सहजानंदीं वृत्ति । लय करावी ॥ ६४ ॥
सद्गुंरुचरण सेवावे । ऐसें वाटतें जीवेंभावें ।
भविष्य जाणोनि बरवें । रावजी राहे तटस्थ ॥ ६५ ॥
समवयी मैत्रिणी मिळाल्या । कौतुकें भेटों आल्या ।
उपदेशामृतें बोधिल्या । नानापरी ॥ ६६ ॥
कैंचा पुत्र कैंचे घर । कैसे डोहाळे संसार ।
हें सर्वही असार । सार तें वेगळेंचि ॥ ६७ ॥
भगवद्भजन हेंचि सार । नामाचा करा हो गजर ।
परिसोनि विस्मय थोर । वाटे उदरीं सिद्धपुरुष ॥ ६८ ॥
वैभव मानाल सत्य । तरी अऽन्तीं होईल घात ।
मीन गळातें गिळित । आमिषातें भुलोनि ॥ ६९ ॥
तरी ऐसे ं न करावें । सन्मार्ग हृदयीं धरावें ।
सद्गुरूसी शरण जावें । अहंभाव संडोनि ॥ ७० ॥
पतिसेवा निरंतर । करावीं निर्मत्सर ।
जन्मा आलियाचें कीर । सार्थक करावें ॥ ७१ ॥
मैत्रिणींसी उपदेशी । रामनाम अहर्निशी ।
गाई अत्यानंदेंसी । पतिव्रता माऊली ॥ ७२ ॥
ओटीं नारळ घालिती । समारंभ बहु करिती ।
मनींची हौस पुरविती । अतिकौतुकें ॥ ७३ ॥
कोंवळें ऊन्ह चांदणें । काळोखे रात्री जेवणें ।
नानापरींची पक्वान्नें । मधुर आणि धमधमित ॥ ७४ ॥
वनभोजन वांवळीभोजन । तुळशीभोजन केळीभोजन ।
सुवासिनी कुमारिका जमवून । ओटीभरण करिताती ॥ ७५ ॥
याचकांसी दिधलें धन । सुवासिनींसी वायन ।
महाफळें आणि खण । धान्य देऊन बोळविती ॥ ७६ ॥
उत्तरोत्तर वाढे गर्भ । तेज फांकलें स्वयंभ ।
होईल म्हणती पुत्रलाभ । कुलदीप चालवील ॥ ७७ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय दुसरा
समास तिसरा
 
श्रीगणाधीशा तुज नमोन । करितो श्रीगुरूंचे जन्मकथन ।
मज दीनावरी कृपा करून । अवधान दीजे ॥ १ ॥
हळूं हळूं दिवस भरले । नवमास पूर्ण झाले ।
सोहळे सर्वही केले । शास्त्ररूढी ॥ २ ॥
प्रसूतीसाहित्य जमा केलें । कुशल सुइणीसी निमंत्रिलें ।
प्रसूतीगृह रंगविलें । शोभायमान ॥ ३ ॥
जन्मसमय प्राप्त झाला । कोणी करूं नका गलबला ।
मुखानें राम राम बोला । सुटका होईल त्वरित ॥ ४ ॥
शके सतराशें साहसष्टांत । माघ शुद्ध द्वादशीप्रत ।
बुधे पंचघटी प्रभात । मीन लग्नीं रवि आला ॥ ५ ॥
शुभदिन शुभमुहुर्त । उच्च ग्रह असती जेथ ।
तया लग्नीं बाल जन्मत । आनंदा सुकाळ जाहला ॥ ६ ॥
इकडे भजनाचा गजर । रावजी करितसे मनोहर ।
पुत्रवार्ता सांगाया चतुर । नारी टपोनि बैसल्या ॥ ७ ॥
उदरीं प्रसूतिवेदना आली । गीताबाई प्रसूत जाहली ।
पूर्वपुण्यें सुपुत्र लाधली । सिद्धपुरुष ॥ ८ ॥
चतुर नारी धांवत गेली । पुत्रवार्ता निवेदिली ।
द्रव्य देऊनि सुखी केली । लिंगोपंत - रावजींनी ॥ ९ ॥
पुत्र होय रावजीप्रती । घरोघरें शर्करा वांटिती ।
नरनारी पाहों येती । बालकासी कौतुकें ॥ १० ॥
ज्योतिष्यासी बोलाविलें । सूक्ष्मवेळेसी कथिलें ।
भविष्य पाहिजे वर्तविले । गणित करोनी ॥ ११ ॥
वेदमूर्ती पाचारिल्या । दक्षिणा देऊनि सुखी केल्या ।
याचकमांदी धांविन्नल्या । रावजीगृहीं ॥ १२ ॥
कोणा वस्त्र कोणा भूषण । कोणा धान्य कोणा अन्न ।
देऊनि तोषविती मन । सकळिकांचें ॥ १३ ॥
आंधळ्या पांगळ्या व्यंगांसी । भोजन घालिती हर्षेंसी ।
तृप्त होविनि सुखेंसी । आशीर्वचनें बोलती ॥ १४ ॥
खण नारळ सुवासिनी । हळद कुंकू लेववोनी ।
ओट्या भरिती धान्यांनी । बहुतां परींच्या ॥ १५ ॥
गांवोगांवी धाडिलें पत्र । ईशकृपें लाधलों पुत्र ।
सुखी असती सर्वत्र । चिंता चित्तीं नसावी ॥ १६ ॥
तुझे कृपें जाहला पुत्र । म्हणोनि करिती स्तोत्र ।
पांडुरंगा तूंचि मित्र । पाठिराखा आमुचा ॥ १७ ॥
मातुलगृही पाठविती । शर्करा दूताहातीं ।
पत्र देवोनि कथिती । आनंदवार्ता ॥ १८ ॥
वेदोक्त कर्में शांत्यादिक । यथाविधि करिती सकौतुक ।
पुत्रस्नेह उन्नत देख । दिवसेंदिवस होतसे ॥ १९ ॥
न्हाणीपूजन पांचवीपूजन । नाना ग्रहांचे पूजन ।
लोकाचारें करिती जाण । अंतरीं ध्यान पांडुरंग ॥ २० ॥
दश दिन समाप्त झाले । सूतिकागृह शुद्ध केले ।
घरोघरी वाटले । विडे आणि सुंठवडे ॥ २१ ॥
त्रयोदश दिन प्राप्त झाला । समारंभ आरंभिला ।
करूं म्हणती नामकरणाला । अतिप्रीतीं ॥ २२ ॥
पाहुणेमंडळी जमली । गृहीं अत्यंत दाटी झाली ।
बालकांची गट्टी जमली । करिती सारा गोंगाट ॥ २३ ॥
पक्वान्नें केलीं षड्रस । विप्र सुवासिनी विशेष ।
कुमार कुमारी आणि दास । जेवूं घालिती अनेकां ॥ २४ ॥
बाळ आणि बाळंतिणी । सुगंधिक तैलें उटणीं ।
न्हाऊं घालिती मर्दोनी । शीघ्रत्वेंसी ॥ २५ ॥
दृष्ट होईल म्हणती । मीठमोहर्या ओंवाळिती ।
मिरच्या पावकीं घालिती । कितीएक ॥ २६ ॥
नेत्री घालिती काजळा । तीट लाविती कपाळा ।
वारा लागों न देती बाळा । शीत होईल म्हणोनि ॥ २७ ॥
अन्न वांटिती गरिबांसी । लुगडें चोळी सुईणीसी ।
देती अतिहर्षेंसी । कार्यभाग चालिला ॥ २८ ॥
रावजी मनीं विचारी । स्वप्नीं बोलिले श्रीहरी ।
सिद्धपुरुष हा निर्धारीं । धन्य भाग्य आमुचें ॥ २९ ॥
अनंत जन्मींची सुकृतें । फळली आजिं आम्हांतें ।
उद्धार करील कुळातें । निश्चयेंसी ॥ ३० ॥
सत्कर्मी पुत्र होय जरी । पितरा नरकापासोनि तारी ।
आत्मज्ञानी झालियावरी । सुकृतातें न गणवे ॥ ३१ ॥
कुकर्मी झालिया पुत्र । नरकीं घालील सर्वत्र ।
म्हणोनि सुज्ञ सुपुत्र । वांछिती सद्गतीसी ॥ ३२ ॥
कोणी घेतील आशंका । कर्म एकाचे एका ।
फळतें कैसें सांगाना कां । आम्हांप्रती ॥ ३३ ॥
वाटसरू वृक्षछायेंसी । क्षण एक आले वस्तीसी ।
सवेंचि चालिले दशदेशीं । येरयेरां काय प्राप्त ॥ ३४ ॥
येचि दृष्टांतीं विवेचन । करूं व्हावें सावधान ।
एकाचें कर्म एकालागून । भोंवतें कीं नाहीं ॥ ३५ ॥
कोणे एके धर्मशाळे । पांथिक समुदाय जमले ।
संगतिपरिणाम लाधले । कैसे पहा ॥ ३६ ॥
कोणाचा कर्ण फुटला । दुर्गंधवायु कोंदला ।
कोणी करी वमनाला । चिळस आली ॥ ३७ ॥
कोणी ढेंकूण आणिती । वस्त्रांतून उवा निघती ।
ढांसढांसोनि जागविती । समस्तांसी कितीएक ॥ ३८ ॥
पीडिती ऐसे अधम । आतां पाहूं ते उत्तम ।
ज्यांची संगती आराम । इतरां देई ॥ ३९ ॥
कोणी हरिभजन करिती । श्रवणीं पीयुष सिंचिती ।
कोणी मधुर गायन करिती । आनंदविती सकळांसी ॥ ४० ॥
अत्तरें माखिती कोणी । दीप ठेविती लावोनी ।
देशोदेशींचें ज्ञान कथुनी । चित्तरंजन करिताती ॥ ४१ ॥
असो ऐसे बहुत जन । गुंतले पाहोनि आश्रयस्थान ।
सुखदुःख भोगिती जाण । संगतीसारिखें ॥ ४२ ॥
तैसे कुळाभिमानी गुंतले । पुत्रस्नेहें जे भ्रमले ।
त्यांसी पाहिजे भोगिले । पुत्रकर्म ॥ ४३ ॥
पुत्रावांचोनि नाही गति । ऐसें सर्वत्र बोलती ।
स्वर्गद्वारीं न घेती । निपुत्रिकासी ॥ ४४ ॥
आणि पितृऋणांतुनी । सुत होतां मुक्त प्राणी ।
पितरोद्देशें देई पाणी । आत्मा मूर्तिमंत दुसरा ॥ ४५ ॥
करोनि बहु विचार । रावजी आनंदले थोर ।
आठविती देवाचे उपकार । स्तविती पुन्हा पुन्हा ॥ ४६ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय दुसरा
समास चवथा
 
जयजय श्रीबालकृष्णा । तुझिये कृपें निरसे तृष्णा ।
शरण जाणूनि करिं करुणा । विनंती माझी ॥ १ ॥
बालरूप गुरुवर । दिवसेंदिवस होती थोर ।
कराया पतितांचा उद्धार । नररूप धरियेलें ॥ २ ॥
आला बारशाचा दिवस । आनंदले बहुवस ।
पाचारिलें सोनारास । कानीं मुद्या घालिती ॥ ३ ॥
ताशा मरफा आणि सूर । ढोल सनई सुस्वर ।
शिंगें वाजविती चतुर । वाजंत्री अनेक ॥ ४ ॥
बाळासि भूषणें घालिती । पंचधातूंचे वाळे करिती ।
वाघनखें सुवर्णीं गुंफिती । गाठलें घालिती पुतळ्यांचें ॥ ५ ॥
कंठी सुवर्णसांखळी । बिंदली मनगटी हसोळी ।
आंगठ्या घालिती । करांगुलीं । रणजोडवें पायांत ॥ ६ ॥
उर्णावस्त्राचें अंगडें । गजनीचें करिती टोपडें ।
जरीकुंचीसी गोंडें । कनकपुष्पें लाविती ॥ ७ ॥
सुवासिनी बहुत जमल्या । खण नारळ कुंच्या आणिल्या ।
कोणी वाळे कोणी बिंदल्या । आणिती यथाशक्ती ॥ ८ ॥
पाळणा सुंदर रंगविला । खेळणीं लाविलीं जयाला ।
घालिती मऊ शय्येला । दुपटीं रंगीत चिटांची ॥ ९ ॥
बाळासी पोटकुळीं धरिती । पाळण्याखालूनि देती ।
गोविंद गोपाळ घ्याहो म्हणती । हर्षभरें ॥ १० ॥
दर्शन उद्वेग चिंता हरी । वाटे दुजा सिंदुरारी ।
गणेश नाम ठेविती नारी । सद्गुरूंचें ॥ ११ ॥
सुंठवडा वांटला सत्वर । घुगर्या पेढे साखर ।
गणेश नामाचा गजर । नरनारी करिताती ॥ १२ ॥
हळद कुंकू ओटी । परस्परें करिती दाटीं ।
वायनें दानें दिधलीं मोठीं । अपूर्व सोहळा जाहला ॥ १३ ॥
गणपतीचें मुख पाहती । सुहास्यवदन गंभीरवृत्ती ।
दर्शनें आनंद चित्तीं । न समाये ॥ १४ ॥
पहा हो सोज्ज्वळ बाळ । नसे श्लेष्म आणि लाळ ।
न करी रडोनि गोंधळ । योगियापरी स्थिरदृष्टी ॥ १५ ॥
ब्रह्मरंध्री वायु खेळे । दशमद्वार तें मोकळें ।
सहजानंदाचे सोहळे । नित्य भोगी ॥ १६ ॥
नवल वाटलें सकळांसी । अवतरले ज्ञानराशी ।
धन्य धन्य तुमची कुशी । धन्य तुमचें दर्शन ॥ १७ ॥
हर्षें कोंदलें गगन । सोहळा झाला पूर्ण ।
ज्योतिषी तेथें येवोन । जातकातें वर्तविती ॥ १८ ॥
मीनलग्नीं जन्म यासी । कुंडली परिसावी कैसी ।
स्वगृहीं तनुस्थानासी । बृहस्पति देवगुरु ॥ १९ ॥
वृषभे केतु सहजांत । कर्के स्वगृही निशिनाथ ।
वृश्चिके शोभे धरणीसुत । राहु संगें घेवोनी ॥ २० ॥
नक्रे बुध शुक्र शनि । अत्युत्तम एकादशस्थानी ।
कुंभे द्वादशीं तरणि । शुभदायक सर्व ग्रह ॥ २१ ॥
होईल हा भगवद्भक्त । भगवद्भजनी आसक्त ।
तुम्हांसी न कामा येत । प्रपंचाच्या ॥ २२ ॥
घराचें करील देऊळ । मिळवील बालगोपाळ ।
नांदवील सज्जन आणि खळ । एके ठायीं ॥ २३ ॥
लक्ष्मी नांदेल याचे घरीं । परि हा नित्य भिकारी ।
दीनजनांचा कैवारी । होईल सदा ॥ २४ ॥
विद्या पाहतां अगणित । गणितें न गणवे नेमस्त ।
ब्रह्मज्ञानी होईल सत्य । ऐसें आम्हां वाटतें ॥ २५ ॥
भार्या पुत्र आणि धन । यांवरी नसे आसक्त मन ।
स्वस्वरूपीं अनुसंधान । ठेवील निश्चयेंसी ॥ २६ ॥
शमवील अंतःशत्रूसी । बाह्य शत्रु नसे यासी ।
सदा प्रेमळ वाग्विलासी । अनंत शरण येतील ॥ २७ ॥
उभय कुळें उद्धरील । अनन्यांसी तारील ।
कीर्ति डंका वाजवील । त्रिभुवनीं ॥ २८ ॥
उपाध्ये जातक वर्तविती । तयां दक्षिणा देऊनि बोळविती ।
अंगारे धुपारे करिती । दृष्ट होईल म्हणोनी ॥ २९ ॥
पाळण्या बाळ निजवोनि । पाळणे गाई जो जो म्हणोनि ।
दोरी हलवी गुरुजननी । मुख चुंबी क्षणाक्षणा ॥ ३० ॥
पुत्रप्रेम न वर्णवे । माय होवोनि जाणावें ।
येरीं शब्दें वर्णावें । स्वल्प कांही ॥ ३१ ॥
पुत्र जरी असला काळा । रोगग्रस्त अंधळा पांगळा ।
तरी मायेचा जिव्हाळा । वेगळाचि ॥ ३२ ॥
त्यावरी असला सद्गुणीं । सशक्त गोंडस गौरवर्णी ।
मग तें प्रेम कोण वानी । माउलीचें ॥ ३३ ॥
दिवसेंदिवस बाळलीला । पाहूनि प्रेमाचा उमाळा ।
आठविती घनसांवळा । तव कृपें लाधलों ॥ ३४ ॥
आज बाळ उपडें वळलें । मान सावरूं लागलें ।
माणूस न्याहाळी वहिलें । स्थिरदृष्टी ॥ ३५ ॥
पाहा हो रांगत गेला । टिकों नेदी वस्तूला ।
कोणी आवरावें याला । चपळ भारी ॥ ३६ ॥
आजोबांची अति प्रीति । कडिये घेवोनि फिरती ।
नाना वस्तूंसी दाविती । हास्य करी विनोदें ॥ ३७ ॥
प्रसंगें रडों लागला जरी । म्हणतां रामकृष्ण विठ्ठल हरी ।
उगा राहोनि श्रवण करी । अत्यंत आवडी भजनाची ॥ ३८ ॥
सर्वांपाशी जात आहे । म्हणती जगमित्र दिसताहे ।
तुसडा आपमतलबी नोहे । जनप्रियत्व करील ॥ ३९ ॥
करांगुली घाली मुखांत । गाई पाळील हा बहुत ।
देउळीं सदा खेळत । देवभक्त होईल ॥ ४० ॥
बालका सन्निध राहती । क्षण एक न विसंबती ।
संगतीसुखासी मिती । नाहीं नाहीं ॥ ४१ ॥
पिता पाहतां विरक्त । परि पुत्रदर्शनीं आसक्त ।
म्हणे शांत होतें चित्त । दर्शनें याच्या ॥ ४२ ॥
आधीं बालस्नेह परम । त्याहीवरी सत्समागम ।
संगतीसुख निरुपम । वाटे सकळांसी ॥ ४३ ॥
गणपती बोबडें बोले । सकळां कौतुक वाटलें ।
आपणही तैसे चाळे । करिती त्यासवें ॥ ४४ ॥
जमले गुरुभक्त गुरुलीलाश्रोते । जे बोधामृताचे भोक्ते ।
कथन केलें व्यवहारातें । म्हणतील जरी ॥ ४५ ॥
गुरुलीला बोधयुक्त । कथन करावी त्वरित ।
जेणें श्रवण होती पुनीत । श्रोतयांचे ॥ ४६ ॥
वक्ता बोले जी प्रमाण । प्रसंगें वर्तलें जें जाण ।
केलें पाहिजे कथन । यथारीती ॥ ४७ ॥
राजभेटीची आवडी । परि दूत आडवी देवडीं ।
तिष्ठावें लागतें घडिघडी । हां जी हां जी म्हणोनी ॥ ४८ ॥
मधुर भोजनाचे भोक्ते । परि मिठावांचूनि अडतें ।
म्हणती असावें रायतें । चवीलागीं ॥ ४९ ॥
श्रवणीं बैसले सज्जन । गुरुलीला परम गहन ।
यथाशक्ति विवरण । केलेंचि करूं ॥ ५० ॥
रंगीबेरंगी खेळणी देती । टाळी घंटा वाजविती ।
बागुल आला कोणी म्हणती । भिती दाविती ज्ञानिया ॥ ५१ ॥
माहेरीं गीताईसी । नेती, पाहती बाळासी ।
आजा आजी संतुष्ट मानसीं । आत्यंतिक जाहलीं ॥ ५२ ॥
उष्टावणाचा सोहळा । करी आनंदें मावळा ।
अलंकार घालिती बाळा । पुरविती हौस ॥ ५३ ॥
बाळ उभा राहिला । त्यासी पांगुळगाडा केला ।
अडखळत चालूं लागला । धांवे गुरांसन्निध ॥ ५४ ॥
इकडे लिंगोपंत रावजीसी । न गमे अहर्निशीं ।
दूताहातें गीताईसी । आणविलें त्वरित ॥ ५५ ॥
असो ऐसी गुरुमाउली । दीनजनांची साउली ।
भक्तांलागीं पावली । मनुष्यरूपें ॥ ५६ ॥
रावजी वैराग्यें उदासी । वाटे शिव श्मशानवासी ।
गीता ज्ञानी सद्गुणेंसी । उमा प्रत्यक्ष वाटत ॥ ५७ ॥
कलिमलासुर मातला । बद्धमुमुक्षां अजिंक्य जाहला ।
म्हणोनि अवतार घेतला । गणपतीनें ॥ ५८ ॥
भवरोगें जन व्यापिले । कृतांतमुखीं चालले ।
चतुर वैद्य पाठविले । श्रीरामरायें ॥ ५९ ॥
परमार्थधामीं निघाले । मार्गीं चोरटे भेटले ।
विपरीत कथोनि भ्रमविले । भलतीकडे ॥ ६० ॥
तैं आले रामदूत । ठकां पिटाळूनि लावित ।
शुद्धमार्गें चालवीत । मार्गस्थांसी ॥ ६१ ॥
माणदेशींचे लोक । भोळे वदती बहुतेक ।
परि सद्गुरूंनी निःशंक । योग्यतेसी दाविलें ॥ ६२ ॥
धन्य कुळ धन्य ग्राम । धन्य देश पावन परम ।
धन्य भक्त पुरुषोत्तम । सद्गु रुभेटी लाधले ॥ ६३ ॥
ज्ञानसूर्य उगवला । हळूं हळूं प्रकाश फांकला ।
साधकां आधार मिळाला । आदर्शभूत ॥ ६४ ॥
पुढील चरित्राची गोडी । चाखावी अति आवडी ।
मनाची मोडोनियां उडी । श्रवणीं सादर बैसवावें ॥ ६५ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥