रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (08:41 IST)

श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत महाराष्‍ट्रात अनेक विख्यात संत झाले आहे. श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज त्यापैकी एक. ह्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) रोजी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलांवर आहे. श्री महाराजांचे मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे आहे. संपूर्ण घराणे सदाचारी व लौकिकवान होते. घरात विठ्ठलभक्ती, पंढरीची वारी असायची. अध्यात्माची ओढ असल्याने नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह गणू यांनी गुरुशोधार्थ घरातून पलायन केले. प्रवासाची विलक्षण आवड असल्याने वयाच्या १२ वर्षापासून ४५ वर्षापर्यंत केलेल्या प्रवासाने त्यांना समाजजीवन उत्तम रीतीने पहाण्यास मिळाले.
 
१९६८ मध्ये आध्यात्मिक गुरू ब्रह्मचैतन्य यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची स्थापना केली होती. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ पर्वती येथील मित्रमंडळ चौकात आहे. 
 
येथे केंद्रस्थानी श्री महाराजांचे समाधी स्थळ असून परिसर विकसत केले गेले आहे. येथे दर्शनासाठी लांबलांबून भाविक येतात तसेच दरवर्षी उत्सवास सहभागी होण्यासाठी भाविकांचे प्रमाण वाढतच आहे. येथे सभागृह, भक्तांसाठी प्रसाद, पाणी, स्वच्छतागृह इतर गरजा व त्या त्या प्रमाणात सोयी करण्यात आल्या आहेत.
 
समाधि मंदिर सभागृहात भिंतींवर संगमरवरी दगड चढवलेले आहेत. तर समाधि मंदिरावर गोपाळ कृष्णाचे मंदिर, समाधि मंदिर, तीर्थ मंडप आहे. मंदिराच्या दारा आणि खिडक्यांवरील कोरीव काम आकर्षित करतं. श्रींची समाधी अगदी त्यांच्या आवडीप्रमाणे साधेपण घेतलेली आहे. समाधीवर कोणताही दागिना नाही.
 
आईसाहेबांनी १९१८ साली देह त्यागल्यावर समाधिमंदिराच्या जवळच त्यांचे छोटेसे मंदिर बांधण्यात आले. त्यासमोरील अंगणात ब्रह्मानंद सभामंडप आहे. येथे तीन प्रसादमंडप व भव्य स्वयंपाकघर असून येथे दररोज दोन ते अडीच हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. 
 
येथील निवासासाठी जवळपास अडीचशे खोल्या आहेत. भक्त निवासासाठी श्रीराम, चैतन्य, आनंदसागर, डॉ. कुर्तकोटी, चिंतामणी, रामानन्द निवास या इमारती उभ्या केल्या गेल्या आहेत. तसेच गर्दीच्या वेळी विविध हॉल मध्ये भक्तांची सोय करण्यात येते.
 
येथे सकाळी काकड आरतीचे वेळी व संध्याकाळी गोमातेची आरती करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत पूर्वीप्रमाणे अजूनही सुरु आहे. येथे सर्व मिळून ५०च्या वर गायी आणि बैल आहेत.
 
श्री पांडुरंग महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या स्मरणार्थ येथे एक मजली इमारत बांधण्यात आली आहे ज्यात खाली एक छोटे सभागृह असून येथे साधकांना जप करण्याची सोय आहे. तर वरच्या मजल्यावर ग्रंथ विभाग आहे जिथे श्री महाराजांविषयी व संस्थान विषयी प्रकाशित झालेले विविध अंक, स्मरणिका, पुस्तके याचा संग्रह आहे. 
 
कसे पोहचाल?
गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ किमी वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे. 
पुण्याहून १५३ किमी व मुंबईहून ३२० किमी दूर स्थित या जागी येण्यासाठी एसटी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे. 
राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद -फलटण- दहिवडी मार्गेही गोंदवले येथे येऊ शकतात. 
राज्यातील सर्व प्रमुख शहरांपासून बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने गोंदवल्यास येऊ इच्छित पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून बसमार्गे येथे येऊ शकतात.