॥ श्रीसद्गुरुलीलामृत ॥
अध्याय पहिला
समास पहिला
महारुद्र जे मारुती रामदास । कलीमाजिं ते जाहले रामदास ॥
जनां उद्धराया पुन्हां प्राप्त होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १ ॥
जयजयाजी एकदंता । विघ्नांतका सिद्धिदाता ।
नमन करूं तुज आतां । ग्रंथ सिद्धीतें पाववीं ॥ १ ॥
सकल गणांचा अधिपति । म्हणूनि नामें गणपति ।
तव प्रसादें मंदमति । वाचस्पति होय ॥ २ ॥
सकल मंगलामाजीं एक । प्रथम पूजावा विनायक ।
श्रुतिस्मृति बोलती कौतुक । निर्विघ्न करी कार्यसिद्धि ॥ ३ ॥
पाशांकुश वरदहस्त । एके करीं मोदक शोभत ।
मूषकावरी अति प्रीत । सर्वांगीं सिंदूर चर्चिला ॥ ४ ॥
तुझिये कृपाकटाक्षें । अलक्ष्य वस्तु तेही लक्षे ।
अज्ञानी पाविजे कक्षे । सिद्धाचिया ॥ ५ ॥
असतां सुवर्ण हातीं । कांही कार्यें साध्य होती ।
तुझी कृपा जे संपादिती । तयांसी सकल सिद्धि ॥ ६ ॥
चौदा विद्या चौसष्ट कला । ह्या तंव तुझिया सहजलीला ।
पदीं नमवी शिरकमला । तया प्राप्ति सहजचि ॥ ७ ॥
आदिमाया आणि ईश्वर । तयांचा अंकुर सुंदर ।
रूप तरी लंबोदर । अनंत ब्रह्मांडे सांठवी ॥ ८ ॥
सिंदुरासुर मातला । त्रैलोक्या अजिंक्य जाहला ।
ब्रह्मादिकीं तुज स्तविला । नानास्तोत्रीं ॥ ९ ॥
मर्दोनिया तो असुर । भक्तचिंता केली दूर ।
शिवलिंग रावण वीर । नेऊं पाहे स्वस्थानीं ॥ १० ॥
त्वां बालरूप घेऊन । घेतलें तें हिरावून ।
मृत्युलोकीं स्थापून । गोकर्ण क्षेत्र निर्मिलें ॥ ११ ॥
आतां हीच विनंति । दीनासी धरूनि हातीं ।
ग्रंथसिद्धीची आयती । पुरवावी तुवां ॥ १२ ॥
जयजय श्रीशारदामाय । सप्रेम वंदोनि तव पाय ।
तुज तुझें शब्दप्रमेय । समर्पूं आतां ॥ १३ ॥
ॐकाराची जननी । ब्रह्मांडाची मुळापासोनी ।
घडामोडी स्वेच्छेंकरोनी । क्षणामाजीं करितसे ॥ १४ ॥
परेहूनि जी पर । तुर्यास्वरूप निरंतर ।
न कळे जियेचा पार । अगाध लीला ॥ १५ ॥
जिचे गायनाचा विलास । मधुरध्वनि नवरस ।
भुलवी नादें जनांस । जगद्वंद्य ॥ १६ ॥
काश्मीरदेशीं अधिष्ठान । सुंदर मयूर वाहन ।
परेसी जिचेनि स्फुरण । विद्यादेवी ॥ १७ ॥
सुंदरांमाजीं सुंदर । चतुरांमाजीं चतुर ।
भक्तांलागीं अभयकर । ज्ञानजोति ॥ १८ ॥
शुद्ध द्वितीयेचा चंद्रमा । पहावया पल्लवसीमा ।
करोनि दाविती व्योमा । जन जैसें ॥ १९ ॥
तैसें पहावया निजस्थान । शब्द ब्रह्मसीमा जाण ।
ज्ञानेंकरोनि विज्ञान । दाविती सिद्ध ॥ २० ॥
धनावरी असे बैसला । परि नेणिवेनें वायां गेला ।
तैसें तव स्वरूपाला । न जाणता व्यर्थ ॥ २१ ॥
जाणीव नेणीव क्रिया दोनी । चिच्छक्ति चारी वाणी ।
दशेंद्रियां चाळवणी । तुझेनि योगें ॥ २२ ॥
मीपणाची जी स्फूर्ति । ती ही तुझीच शक्ति ।
शक्ति करितां मति । कुंठित होय ॥ २३ ॥
परि आम्हां भाविकांसी । सगुणोपासना निश्चयेंसी ।
म्हणूनि तव चरणांसी । वंदूं आतां ॥ २४ ॥
ग्रंथलेखनाची स्फूर्ति । उपजविली जैशी चित्तीं ।
सांग करीं समाप्ति । चिंता मजसी कासया ॥ २५ ॥
आतां वंदूं सद्गुरुमाय । जें देवांचेंही आदिध्येय ।
सद्भावें वंदितां पाय । द्वैतभाव मावळे ॥ २६ ॥
जयाचें करितां स्तवन । ज्ञानियां पडे मौन ।
मी अज्ञानी मतिहीन । विनवावें कवणेपरी ॥ २७ ॥
जयाचें जाणतां स्वरूप । जाणता होय तद्रूप ।
ध्येय ध्याता ध्यान अल्प । वेगळें उरेना ॥ २८ ॥
तुमची करूं जातां स्तुति । न पुरे शब्द-व्युत्पत्ति ।
परि आवडी उठली चित्ती । मानूनि घ्यावी ॥२९ ॥
जैसी लेकुरें मातेप्रती । लटिकेंचि जेवूं घालिती ।
उदर न भरे परि तृप्ती । माय दावी ॥ ३० ॥
तैसा निर्विकल्प अरूप । भक्तांकारणें धरिलें रूप ।
म्हणूनि स्तवनाचा संकल्प । कौतुक पुरवी ॥ ३१ ॥
वत्स देखोनि पान्हा घाली । तैशी सद्गुरु माउली ।
सच्छिष्यांतें पावली । ज्ञानबोधें ॥ ३२ ॥
यास्तव श्रीगुरु आधार । साधक पावे पैलपार ।
दुजें तारूं नसे थोर । भवसिंधु तरावया ॥ ३३ ॥
गुरुवांचोनि तरला । ऐसा देखिला ना ऐकिला ।
महिमा न वचे वर्णिला । निरुपमेय ॥ ३४ ॥
गुरु तोचि सदाशिव । गुरु तोचि ब्रह्मदेव ।
गुरु नारायण स्वयमेव । चिद्वस्तु ॥ ३५ ॥
गुरूचे घरीं पाणी भरी । अथवा सडासंमार्जन करी ।
ऋद्धिसिद्धि तयाचे द्वारीं । सदा तिष्ठती ॥ ३६ ॥
गुरुकृपेचा महिमा । बोलावया नाहीं सीमा ।
अनुभवी अनुभवे आरामा । धन्य साधु ॥ ३७ ॥
परत्यक्त दुरितें मळती । तीं तीर्थें पुनीत व्हाया येती ।
गुरुसेवापरायण असती । तयांपाशी ॥ ३८ ॥
न करितां वेदाध्ययन । षट्शास्त्रादि पठण ।
सद्भावें सद्गुरुचरण । सेवितां ज्ञान होय ॥ ३९ ॥
गुरुक्षेत्र काशीपुरी । अथवा जाणावी पंढरी ।
देवांचा देव वास करी । काय वानूं ॥ ४० ॥
सद्गुरूचें चरणतीर्थ । सकल तीर्थांहूनि पुनीत ।
स्नानापान घडतां नित्य । अनंत पातकी उद्धरती ॥ ४१ ॥
सद्गुरूचे सन्निध वास । तोचि केवळ ब्रह्मरस ।
आर्त पीडित जनांस । धन्य तारूं ॥ ४२ ॥
सच्छिष्य उत्तम क्षेत्र । अनुतापें खणिलें पवित्र ।
भक्तिरस भरोनि पात्र । सिंचिलें तयावरी ॥ ४३ ॥
गुरुवाक्य निर्मळ बीज । पेरिते झाले सहज ।
अंकुराचें पाहती चोज । कूर्मदृष्टीं ॥ ४४ ॥
ऐसा तूं सद्गुरुराणा । वर्णूं न शकेंचि निर्गुणा ।
गुरुभक्तीच्या खुणा । गुरुभक्त जाणती ॥ ४५ ॥
कल्पतरू म्हणों जातां । न पाही तो अहिता-हिता ।
इच्छिलें पुरवी तत्त्वतां । आन नेणे ॥ ४६ ॥
तैशी नव्हे गुरुमूर्ति । हित अनहित पाहती ।
हितकर वस्तूच हातीं । देती साधकांच्या ॥ ४७ ॥
जरी म्हणावें परीस । देई केवळ सुवर्णास ।
सद्गुरु स्वस्वरूपास । देत असे ॥ ४८ ॥
सुवर्ण तें नाशवंत । स्वरूप जाणावें शाश्वत ।
अशाश्वत शाश्वतासी एकमत । होईल कैसें ॥ ४९ ॥
परिस न देई आपुलेपण । लोहासि करी सुवर्ण ।
परि सुवर्णाअंगीं परिसपण । येत नसे ॥ ५० ॥
तैसा नव्हे कीं गुरुवर । शिष्या दे स्वाधिकार ।
तयाकरवीं असंख्य नर । तारितसे ॥ ५१ ॥
कामधेनू म्हणों जातां । काममूळ जी अहंता ।
खणोनि काढी तत्त्वतां । काय मागावें ॥ ५२ ॥
गुरूसि म्हणावें मातापिता । तरी न होय साम्यता ।
मातापित्यांची ममता । एकदेशी ॥ ५३ ॥
बालक सुखी असावें । ऐसें इच्छिती मनोभावें ।
केवळ इहलोक साधावें । म्हणोनि एकदेशी ॥ ५४ ॥
परत्रसुखातें नेणती । जाणतां द्यावया नसे शक्ति ।
मायामोहें गुंते वृत्ति । बहुतेकांची ॥ ५५ ॥
तैशी नव्हे तुमची लीला । इहपर स्वानंदसोहळा ।
भोगवितां शिष्यबाळा । जीवन्मुक्ती ॥ ५६ ॥
मुक्या मुखें बोलविसी । लुल्या करवी काम घेसी ।
पांगुळ्यासही चालविसी । सहजचि ॥ ५७ ॥
अंधासि देसी लोचन । भवरोगासी भेषज जाण ।
मुमुक्षुचातका जीवन । मुक्तिरस वर्षतसे ॥ ५८ ॥
तूं वैराग्याचें मंदिर । शांतिसुखाचें माहेर ।
शमदमादि वळण सुंदर । तुझिये ठायीं ॥ ५९ ॥
साधनचतुष्टयाची वाट । भक्तिज्ञानाची पेठ ।
मोल शुद्धभाव श्रेष्ठ । असे येथींचा ॥ ६० ॥
ऐसा सद्गुरुराव । चरणीं राहो शुद्ध भाव ।
हृदयस्थ स्वयमेव । बोलवीं बोल ॥ ६१ ॥
तुझे कृपाप्रसादें चित्तीं । चरित्र वदविण्याची स्फूर्ति ।
कृपाकटाक्षें करीं तृप्ति । बाळलीला ॥ ६२ ॥
सद्गुरूची थोर करणी । नवचे वदली वाणी ।
मी तंव असें अज्ञानी । केवीं बोलूं ॥ ६३ ॥
माउली सन्निध असतां । तीस बालकाची चिंता ।
क्रीडेमाजीं पडतां । वेळोवेळां सांवरी ॥ ६४ ॥
गुरुमाउलीचेनि बळे । बोलूं बोल हे आगळे ।
भक्तिरसाचे सोहळे । पुरवूं आजीं ।।६५॥
चरित्रांमाजीं चरित्र । संतचरित्र परम पवित्र ।
श्रवणें पाविजे परत्र । सार्थकता ॥ ६६ ॥
संतचरित्राचा कित्ता । सतत पुढें ठेवितां ।
मोक्ष येईल हातां । साधकांच्या ॥ ६७ ॥
ऐसे हे संतजन । वर्षती स्वानंदजीवन ।
तयांसि करूं नमन । साष्टांग भावें ॥ ६८ ॥
तयांचा वाग्विलास । नवविधा भक्तिरस ।
सेवूनि पावती तृप्तीस । भाविक जन ॥ ६९ ॥
साधकासी आदर्शभूत । न्यून पूर्ण प्रत्ययें दावित ।
आपणामाजीं मेळवित । परोपकारी ॥ ७० ॥
जयांचें घडतां दर्शन । चित्त होय उदासीन ।
ना तरी उत्तम नरदेह पावून । व्यर्थ आयुष्य दवडिलें ॥ ७१ ॥
यांचे चालीनें चालावें । यांचे बोलीनें बोलावें ।
यांच्या सन्निध असावें । सर्वकाळ ॥ ७२ ॥
यांची स्थिती अनुभवावी । तरीच देहसार्थकता बरवी ।
आतां हानि न करावी । आयुष्याची ॥ ७३ ॥
ऐशी उपरति होय मना । क्षणएक घडतां दर्शना ।
विषयांपासोन वासना । फिरे मागें ॥ ७४ ॥
मग होय समाधान । आनंदाश्रूंनी लोचन ।
भरती, रोमांच परिपूर्ण । सर्वांगीं थरारती ॥ ७५ ॥
कंठ होय सद्गदित । भक्तिप्रेमें उचंबळत ।
मुखीं हरिनाम रसभरित । नाचतसे आनंदें ॥ ७६ ॥
कन्येस माहेर मूळ । येतां आनंदकल्लोळ ।
तैसा संतभेटीचा काळ । आनंदा आनंदवी ॥ ७७ ॥
कीं ह्या परमार्थमार्गींच्या ज्योती । लखलखीत तेजोमय दीप्ति ।
वळसे खळगे दाविती । ज्ञानोदयापर्यंत ॥ ७८ ॥
ऐसी संतकृपा राणीव । भूतीं भगवंत ही जाणीव ।
सुष्ट-दुष्ट एकभाव । प्रेमपान्हा पाजविती ॥ ७९ ॥
संतामाजीं वरिष्ठ । तिहीं अध्यात्मग्रंथ केले स्पष्ट ।
भवसिंधूवरूनि वाट । करणी जयांची ॥ ८० ॥
प्राचीन अर्वाचीन दोन्ही । भूतभविष्यवर्तमानीं ।
उपयुक्त ज्यांची करणीं । वंदूं तया ॥ ८१ ॥
आतां नमूं कुलदैवता । विष्णुपंचायतना समस्ता ।
हरिहर गणेश सविता । जगन्माता जगदंबा ॥ ८२ ॥
वेळोवेळीं रक्षिलें । हातीं धरोनि सांभाळिलें ।
नित्य पाहिजेत स्मरण केले । उपकार ज्यांचे ॥ ८३ ॥
गोत्र दैवत अत्रिऋषि । भार्या पतिव्रता जयासी ।
लाधली, दत्तरूपें कुशी । ब्रह्माहरिहर अवतरले ॥ ८४ ॥
जे सकळांचे गुरुवर । केला बहुत जगदुद्धार ।
करिती, पुढें करणार । नमन असो तयांसी ॥ ८५ ॥
तया कृपेचेनि योगें । सद्गुरुभेटीं होय वेगें ।
नाहींतरी फिरतां भागे । न मिळे मोक्षदाता ॥ ८६ ॥
वंदूं माता आणि पिता । जयांची देहावरी सत्ता ।
देहयोगें कर्तव्यता । घडे सर्व ॥ ८७ ॥
माउलीचा उपकार भला । नवमास भार वाहिला ।
सेवेचा योग नाहीं घडला । बाळपणीं निवर्तली ॥ ८८ ॥
दिधली असे कामधेनू । मिळवावया नारायणु ।
तया उपकारातें वानूं । कोण्या मुखें ॥ ८९ ॥
परदेशी पाळिला पोर । निःस्वार्थ केला थोर ।
तिये वंदितां नीर । नयनीं लोटे ॥ ९० ॥
कुलदैवत गोत्रदैवत । जननी जनक पाळितें दैवत ।
इतुक्यांचा ऋणाइत । देह थोर वाढविला ॥ ९१ ॥
याचें सार्थक करितां कांही । तरीच ऋण फिटेल लवलाही ।
नाहीं तरी भवडोहीं । बुडावें लागे ॥ ९२ ॥
असो आतां श्रोतेजन । श्रवणीं बैसले सज्जन ।
तयांचे वंदोनि चरण । ग्रंथारंभ करितसें ॥ ९३ ॥
श्रवणीं बैसलें सादर । न्यूनाधिकीं ना अनादर ।
जाणोनि अजाणत्याचें कीर । पुरविती जे ॥ ९४ ॥
जैसा नाट्यलेखक । नटबोल ऐके सकौतुक ।
तैसे लिहविले लेख । श्रवण कीजे ॥ ९५ ॥
इति श्रीसद्गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
अध्याय पहिला
समास दुसरा
करावें सावध चित्त । तरी कळे येथील मात ।
गुरुलीला अगम्य अद्भुत । जड देहा न कळेचि ॥ १ ॥
ब्रह्मीं अष्टधा प्रकृति । तिचे कर्दमें ब्रह्मांड उत्पत्ति ।
ती मूळ माया निश्चितीं । जाणावी तुवां ॥ २ ॥
प्रकृति जड अचेतन । पुरुषसंयोगें सचेतन ।
पुरुष म्हणजे जाणीव ज्ञान । प्रकृतीमध्यें बिंबलें ॥ ३ ॥
ऐसा संसार वाढला । उत्पत्ति-स्थिति-प्रळयला ।
शास्ता त्रिगुणरूपें झाला । परमात्मा जो ॥ ४ ॥
ब्रह्मा करी उत्पन्न । विष्णु प्रतिपाळी जाण ।
रुद्र संहारी आपण । कार्यभाग चालिला ॥ ५ ॥
चौऱ्यांशी लक्ष जीवयोनि । उभारिले लोक तिन्ही ।
जाणीव दिधली वांटोनी । सकलां ठायीं ॥ ६ ॥
विशेष जाणिवेचें स्थान । तो हा नरदेह जाण ।
येथींचे उत्तम जन । पावती मूळरूपा ॥ ७ ॥
अखंड प्रकृतीचेनि संगें । जाणीवही भंगों लागे ।
जाणिवेसी करावया जागे । सिद्ध पुरुष ॥ ८ ।
जाणीव स्थिर रहावया । वेदें ज्या दाविल्या क्रिया ।
आचरितां मार्गें तया । विमल ज्ञान होतसे ॥ ९ ॥
हरिहर अवतरती । अथवा अंशरूपें अवतार घेती ।
जाणीवेसी जागविती । वेळोवेळां ॥ १० ॥
तैसे माझे सद्गुरुराव । हनुमदंश स्वयमेव ।
जगदुद्धाराचें लाघव । करूनि दाविती ॥ ११ ॥
एकादश रुद्र हनुमंत । सदाशिव अंश निश्चित ।
वेळोवेळां स्थापित । भक्ति ज्ञान उपासना ॥ १२ ॥
ऐसे अवतार किती होती । कोणा न करवे गणती ।
कथानुरोधें उपपत्ति । करूं कांहीं ॥ १३ ॥
त्रेतायुगीं अवनीवरी । दैत्य मातले अहंकारी ।
विपरीतज्ञानें अघोरी । क्रिया करूं लागले ॥ १४ ॥
वर्णाश्रमातें बुडविती । यज्ञसाधनें तुडविती ।
दीन अनाथां रडविती । छळछळोनी ॥ १५ ॥
गाई ब्राह्मण स्त्रियादिकां । छळिती भ्रष्टविती जे कां ।
आचरिती नित्य पातकां । दुष्टबुद्धी ॥ १६ ॥
कृषिकर्में मंदावलीं । यज्ञकृत्यें थांबलीं ।
रणें माजों लागलीं । नानाप्रकारें ॥ १७ ॥
भूलोकीं केली पीडा । देवलोकांचा चुराडा ।
मदमत्सर वाढला गाढा । देव बंदी घातले ॥ १८ ॥
रावणकुंभकर्णादि वीर । वरप्रदानें मातले फार ।
कोणासही सुविचार । सुचों न देती ॥ १९ ॥
लेकुरें दुःखी देखोनि भारी । धरित्री होय घाबरी ।
गोरूपें सत्यलोकामाझारीं । मुनिगणांसह पातली ॥ २० ॥
करिती बहु स्तुतिस्तोत्रा । विनविती ते चतुर्वक्त्रा ।
झांकोनि बैसला नेत्रां । ऐसी करुणा भाकिती ॥ २१ ॥
"सत्क्रिया राहिली । असत्क्रिया बळावली ।
सैराटवृत्ती चालिली । शास्ता नाहीं ॥ २२ ॥
अज्ञान हें पैसावलें । विपरीतज्ञानें वेडें केलें ।
पाप अत्यंत वाढलें । तमोबुद्धी ॥ २३ ॥
दुष्कर्में करिती गहन । सात्त्विकांचे करिती हनन ।
आतां होईना सहन । अति दुःख होतसे ॥ २४ ॥
याचा करावा विचार । भक्तांसि द्यावा आधार ।
मर्दोनि ते असुर । जग सुस्थिर करावें" ॥ २५ ॥
ब्रह्मा विचारीं मानसीं । वरप्रसादें रावणासी ।
वैभव बल अतिशयेंसी । चढले असे ॥ २६ ॥
याचा प्रतिकार करावया । विनवूं अच्युता लवलाह्यां ।
क्षीराब्धिनिकटीं जाऊंनिया । प्रार्थूनिया करुणस्वरें ॥ २७ ॥
ऐसे वदोनि सत्वरीं । सकलांसमवेत क्षीरसागरीं ।
पातले ते अवसरीं । प्रेमभरें गर्जती ॥ २८ ॥
जयजय माधवा मधुसूदना । केशवा गोविंदा नारायणा ।
महाविष्णु मुरमर्दना । कमलनयना रमापते ॥ २९ ॥
श्रीवत्सकौस्तुभधारी । शेषशायी अघहारी ।
विश्वव्यापका श्रीहरी । जगन्नाथा जनार्दना ॥ ३० ॥
भक्तकाजकल्पद्रुमा । भक्ताधीन आत्मारामा ।
भक्तहृदयीं पुरुषोत्तमा । वास तुझा ॥ ३१ ॥
गरुडवाहना गरुडध्वजा । असुरांतका अधोक्षजा ।
पंचानन तूं भवगजा । विदारक ॥ ३२ ॥
लक्ष्मी तव चरणांची दासी । नारदतुंबर सुस्वरेंसी ।
गायन करिती अतिहर्षीं । सदोदित ॥ ३३ ॥
कंठीं शोभे वैजयंती । सहस्ररश्मीपरी दीप्ती ।
नीलवर्ण सुंदर कांती । सदा शांती नांदतसे ॥ ३४ ॥
पहोनिया खिन्न वदन । बोलतसे जगज्जीवन ।
कवण काजा आगमन । सांगावें सविस्तर ॥ ३५ ॥
कमलोद्भव बोले वचन । त्रैलोक्या गांजितसे रावण ।
पराभवोनि देवगण । बंदीमाजीं टाकिले ॥ ३६ ॥
अभय देत वैकुंठासी । भविष्य जाणोनि मानसीं ।
सूर्यवंशीं दशरथकुशीं । घेऊं लीला अवतार ॥ ३७ ॥
नामाभिधान श्रीराम । सकलां होईल आराम ।
देव पावतील स्वधाम । चिंता कांहीं न करावी ॥ ३८ ॥
सकल देवीं आपुलिया अंशें । भूमंडळीं कपिवेषें ।
साह्यार्थ मजसरिसें । अवतारावें ॥ ३९ ॥
आज्ञा वंदोनि शिरीं । हर्षभरित होती अंतरीं ।
निघाले देव सत्वरीं । स्वस्थाना पातले ॥ ४० ॥
तेव्हां किष्किंधा नगरींत । देव पातले समस्त ।
महारुद्र हनुमंत । अंजनीउदरीं राहिले ॥ ४१ ॥
जन्मतांचि बुभुःकार । नादें दुमदुमिलें अंबर ।
गिळावयासी भास्कर । उडी घेतली ॥ ४२ ॥
झुंजतां तेथें राहूसवें । हनुमंत ऐसें नाम पावे ।
बळें आगळा स्वभावें । बलभीम जो ॥ ४३ ॥
पुच्छें घाली ब्रह्मांडा वेढा । पर्वत उचली धडाडा ।
राक्षसांचा चुराडा । क्षणामाजीं करितसे ॥ ४४ ॥
रावणवधार्थ रघुनंदन । अयोध्येहूनि निघोन ।
मारोनियां खरदूषण । ऋष्यमुकीं पावले ॥ ४५ ॥
तंव तेथें अकस्मात । भेटते झाले वायुसुत ।
चरणीं लोटांगण घालित । दास्यत्वासी आदरिलें ॥ ४६ ॥
रामसेवेवांचूनि कांहीं । दुजी आवड जया नाहीं ।
ऐसा मारुती वज्रदेही । रामनामें गर्जतसे ॥ ४७ ॥
शतयोजन जलनिधी । उल्लंघोनि, राक्षसमांदी ।
असंख्य वधोनि दुष्टबुद्धी । सीताशुद्धी केलीसे । ४८ ॥
रामकार्या अति तत्पर । रामभजनी अति सादर ।
भक्तांमाजीं अग्रेसर । वैषववीर म्हणवीतसे ॥ ४९ ॥
समूळ राक्षसां वधोनी । वनवासव्रत सारोनी ।
राम बैसले सिंहासनीं । जयजयकारें ॥ ५० ॥
याचकां दिधली दानें । भक्तांलागी वस्त्रें भूषणें ।
कामायोग्य गजवाहनें । दिधली अनेक ॥ ५१ ॥
समस्तांसी बोळविले । वस्त्रालंकारीं सुखी केलें ।
त।व सीतामाईनें पाहिलें । हनुमंतासी ॥ ५२ ॥
विचार करीतसे चित्तीं । परमभक्त हा मारुति ।
सेवा करितां देहस्मृति । न ठेवी हा ॥ ५३ ॥
ऐसा हा निष्ठावंत । प्रभूचा प्राणसखा भक्त ।
पारितोषक या न देत । कवणनिमित्तें कळेना ॥ ५४ ॥
कंठींचा हार काढिला । कपीचे गळां घातला ।
वंदन करोनि चढला । वृक्षाग्रभागीं ॥ ५५ ॥
विचार करित निजमानसीं । रत्नें दिसती तेजोराशी ।
अंतरीं आहेत कैशीं । फोडोनि पाहूं ॥ ५६ ॥
वरी सुंदर दिसतें खासें । अंतरीं राम जरी नसे ।
तरी नाशिवंत ऐसें । ज्ञानी हातीं न धरिती ॥ ५७ ॥
वरिवरी शृंगारिले । अंतरीं कुबुद्धीनें भरले ।
ते जन नव्हेत चांगले । दुरी धरावे ॥ ५८ ॥
अंतर्बाह्य परीक्षी । तोच चतुर अंतरसाक्षी ।
नातरी उभयपक्षीं । हानीच होय ॥ ५९ ॥
हातीं धरोनियां रत्न । मुखीं घालोनि केलें चूर्ण ।
आंत न दिसे ठाण । श्रीरघुपतीचें ॥ ६० ॥
राम न दिसे तो दगड । फेंकून देई भक्त जाड ।
याची आम्हां नसे चाड । व्यर्थ भार कोण वाही ॥ ६१ ॥
चूर्ण करोनि फेंकित । तंव जानकी दुरोनि देखत ।
मनीं खेद मानीं बहुत । मर्कटा रत्नें व्यर्थ दिलीं ॥ ६२ ॥
दीर्घस्वरें पाचारिला । वृत्त जाणोनि प्रश्न केला ।
तुझे देही घनसांवळा । न दिसे कीं ॥ ६३ ॥
परिसोनियां वचनासी । कपि विदारी हृदयासी ।
तंव तेथें दृष्टीसी । रघुनंदन दिसतसे ॥ ६४ ॥
वामांकी जनकदुहिता । दक्षिणभागीं लक्ष्मणभ्राता ।
भरत शत्रुघ्न हनुमंता - । हृदयामाजीं देखिलें ॥ ६५ ॥
कंठ सद्गदित झाला । प्रेमपूर नयनीं आला ।
धन्य भक्त भला भला । शिरोमणि ॥ ६६ ॥
प्रभूसी कळली मात । पाचारिलें राजसभेत ।
धावोंनि मिठी घालीत । सिंहासन सोडोनी ॥ ६७॥
देव-भक्तांचें ऐक्य झालें । देहभान हरपलें ।
आनंदें डोलों लागले । सभाजन तटस्थ ॥ ६८ ॥
अंजनीमाय धन्य धन्य । पिता वायु परम धन्य ।
यासम भक्त नसे अन्य । त्रिभुवनीं ॥ ६९ ॥
ऐसी बहुतांपरी बहु स्तुती । करूं लागले यथामती ।
नाम आनंदें गर्जती । रघुपतीचें ॥ ७० ॥
आनंद कल्होळा परिसोनी । रामरायें मिठी सोडोनी ।
सभाजनांसी स्थिरावोनी । सिंहासनीं बैसले ॥ ७१ ॥
मग बोले सीतापती । यासी द्यावया त्रिजगतीं ।
वस्तु न मिळे कार्यसम ती । अनन्य भक्त प्राणसखा ॥ ७२ ॥
आवडी असे तुज भारी । रामकथामृतपान करीं ।
जंव कथा पृथ्वीवरी । तंव श्रवण करावी ॥ ७३ ॥
कठिणकाळीं साह्य व्हावें । सद्धर्मासी प्रतिपाळावें ।
रामभक्तीसी लावावे । असंख्य जन ॥ ७४ ॥
दुष्ट पातकी दुराचारी । भक्तां छळिती नानापरी ।
तयांसी तूं निवारीं । तपोबळें ॥ ७५ ॥
प्रभूनें ठेविला हनुमंत । अंशरूपें तो अवतार घेत ।
आज्ञा मनीं वागवित । स्थापितसे रामभक्ति ॥ ७६ ॥
द्वापारयुगामाझारीं । बैसोनि अर्जुनस्यंदनावरी ।
धर्मरक्षणा साह्य करी । बहु प्रकारीं ॥ ७७ ॥
गरुडगर्व हरण केला । भीमगर्व परिहारिला ।
धनंजयासी दाखविला । भक्तिप्रताप ॥ ७८ ॥
इति श्रीसद्गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
अध्याय पहिला
समास तिसरा
कलियुग प्राप्त झाले । जाणिवेसी विसरले ।
आपत्तीनें व्यापिले । सर्व जन ॥ १ ॥
अल्पायुषी झाले प्रथम । तेजोबलहीन परम ।
बुद्धीस पडला भ्रम । सत्यासत्य कळेना ॥ २ ॥
स्वात्मसुखा नेणती । देहसुखा वाढविती ।
मार्ग चुकला ऐसें चित्तीं । नाणिती कदा ॥ ३ ॥
देहा चाळवी चैतन्य । तया ओळखितां अनन्य ।
चित्सौख्य लाभे पूर्ण । सर्वभावें ॥ ४ ॥
आत्मज्ञान विसरले । साधनांसी अव्हेरिलें ।
बाष्कळपणें बोलूं लागले । अन्योन्यासी ॥ ५ ॥
बहुतेकीं धर्म सोडिला । भरतभूमीं कांहीं राहिला ।
सत्पुरुषीं रक्षिला । वेळोवेळां म्हणोनिया ॥ ६ ॥
कलियुगाचे अंती । अधर्में ग्रासेल जगती ।
बीज रहावया निश्चितीं । अवतार होय ॥ ७ ॥
आपत्काळीं कृषिवल । बीजरक्षणीं दक्ष केवळ ।
तोचि सुज्ञ सुशील । स्थिरबुद्धी ॥ ८ ॥
भरतभूमी पुण्यदेश । सात्विकां सहाय विशेष ।
आत्मोन्नति व्हावयास । अनुकूल असे ॥ ९ ॥
अगणित पिकें धरणीं । नाना तीर्थें उत्तम पाणी ।
म्हणोनिया भगवंतांनीं । धर्म येथेंचि रक्षिला ॥ १० ॥
जैसे जैसे दिवस गेले । तैसें अधर्में ग्रासिलें ।
म्लेंच्छ उदंड वाढले । हिंसाधर्मी ॥ ११ ॥
तीर्थें क्षेत्रें भ्रष्टविलीं । देवालयें उद्ध्वस्त केलीं ।
गोवधाची झाली । परमसीमा ॥ १२ ॥
धार्मिकांसी भ्रष्टविती । सद्धर्मासी निंदिती ।
बहुत प्रकारें छळिती । भाविकांसी ॥ १३ ॥
सत्यधर्म सनातन । याचें करावया रक्षण ।
गोदातीरीं हनुमान । अंशरूपें अवतरले ॥ १४ ॥
रामदास नामें भले । भक्ति ज्ञानें चकित केलें ।
रामें स्वयें येवोनि उपदेशिलें । वायुनंदन साह्य करी ॥ १५ ॥
विवाहकालीं 'सावधान' । म्हणतां तोडिलें गृहबंधन ।
केलें बहुत अनुष्ठान । श्रीरामा तोषविलें ॥ १६ ॥
कुरवाळोनि भक्तासी । आज्ञा देती 'दक्षिणदेशीं ।
जावोनि शिवरायासी । साह्य करावें ॥ १७ ॥
शिव स्थापील राजसत्ता । त्वां वाढवावें भक्तिपंथा ।
सद्धर्मा लावावें समस्तां । मलिन झाले' ॥ १८ ॥
आज्ञा वंदोनिया शिरीं । पावले स्वामी कृष्णातीरीं ।
महाराष्ट्रदेशाभीतरीं । वास केला ॥ १९ ॥
स्वतेजें प्रकाशती । नाना चमत्कारांतें दाविती ।
उपासना दुमदुमविती । समुदाय थोर मेळविला ॥ २० ॥
रामनामाच्या घडघडाटें । महाराष्ट्रदेशीं अंबर फाटे ।
'रघुवीर समर्थ' म्हणोनि नेटें । भक्तजन गर्जती ॥ २१ ॥
शिवरायास कळली मात । सद्गुरु रामदास समर्थ ।
पावले अधर्मछेदनार्थ । दक्षिणदेशीं ॥ २२ ॥
स्वामीदर्शनाचे आशें । धुंडाळी वनें प्रदेशें ।
संतभेटी अनायासें । होईल कैसी ॥ २३ ॥
तळमळ लागली मोठी । अनुताप उपजला पोटीं ।
मग समर्थचरणीं मिठी । दृढ केली ॥ २४ ॥
उभयतांसि संतोष झाला । शिवाजीरूपें शिव आला ।
उपदेशवचनें बोधिला । धन्य धन्य म्हणोनि ॥ २५ ॥
सेवेच्छा दावी नृपति । स्वामी बोलती तयाप्रती ।
तुज सेवा ही निश्चितीं । धर्मरक्षणाची ॥ २६ ॥
राजधर्म केला कथन । दुर्जनीं गांजिले जन ।
स्त्रिया गाई ब्राह्मण । रक्षण करीं ॥ २७ ॥
श्रीकृपेवांचोनि खटपट । ती पोंचट आणि लटपट ।
रामउपासनेची लगट । करित असावी ॥ २८ ॥
भगवत्कृपा होतां पाहीं । जगीं दुर्मिळ नसे कांहीं ।
यास्तव रामभक्ति लवलाहीं । केली पाहिजे ॥ २९ ॥
विरक्त होऊनि शिवराज । स्वामीचरणीं अर्पितां राज्य ।
स्वामी म्हणती आम्हां गरज । नसे याची ॥ ३० ॥
'जोहार' मोडोनी 'रामराम' करवीं । मारुती स्थापीं गांवोगांवी ।
भगवा झेंडा जगीं मिरवी । हिंदुत्वाचा ॥ ३१ ॥
दासबोध वीस दशक । केला ग्रंथ आध्यात्मिक ।
विवरतां इहपर सुख । प्राप्त होय ॥ ३२ ॥
'मनाचीं शतें' आदिकरोनि । कविता लिहिली अमोल वाणी ।
कीं ही ब्रह्मरसाची खाणी । शब्दरूपें दाविली ॥ ३३ ॥
काष्ठाच्या खडावा पायांत । कुबडी स्मरणी हातांत ।
कौपीन मेखला भगवी शोभत । खांद्यावरी ॥ ३४ ॥
भृकुटीं आवाळूं वागविती । जटाभार दिव्य कांती ।
द्वादश मुद्रा शोभती । गिरिकंदरीं नित्य वास ॥ ३५ ॥
शिष्यसंप्रदाय वाढला । शिवबा निजधामा गेला ।
स्वामींनीही निरोप घेतला । ज्योतीस ज्योत मिळाली ॥ ३६ ॥
सज्जनगड समाधिस्थान । स्थापिलें श्रीरामाचें ठाण ।
नित्य पूजन अन्नदान । होत असे ॥ ३७ ॥
ऐसा काळ बहुत गेला । कांहीं कार्यभाग चालला ।
दिवसेंदिवस कलि वाढला । अधर्में जाळें पसरिलें ॥ ३८ ॥
जैसा जैसा कलि वाढे । तैसें धर्मा क्षीणत्व जडे ।
शहाणेंही होती वेडे । कलिप्रतापें ॥ ३९ ॥
म्लेंच्छसत्ता उडाली । मराठेशाही चालली ।
पुढें आंग्लसत्ता आली । कालक्रमें ॥ ४० ॥
म्लेंच्छीं छळोनि भ्रष्टविलें । मध्यें कांहींसे रक्षिले ।
परधर्मापाठीं लागले । अजाणपणें ॥ ४१ ॥
सनातनधर्मीं लोकां । अध्यात्मविद्या मुख्य जे कां ।
तदनुरोधें आचारादिका । नियमन केलें ॥ ४२ ॥
उत्तम क्वचित् लाभतें । मिळवाया कष्टावें लागतें ।
तनुमनधन वेंचावें तें । तरीच जोडे श्लाघ्यता ॥ ४३ ॥
आधीं कष्टानें मिळतें । विषमकाळीं दुर्लभ होतें ।
चित्ता मलिनता येते । विवेका ठाव नाहीं ॥ ४४ ॥
वडिलीं शुद्धज्ञानाचा धडा । शिकाया घातला आचार गाढा ।
परि निष्कळ वाटे मूढां । सांडिली साधनें ॥ ४५ ॥
क्षण एक वाटतें चित्तीं । शुद्ध बीज मिळवावें हातीं ।
प्रयत्ना सांडिलें वृत्ती । विषयालस्यें ॥ ४६ ॥
आंबट म्हणूनि फळें टाकिलीं । जंबुकशी वृत्ती झाली ।
जनता सैराट धांवली । प्रवृत्तिज्ञान शोधाया ॥ ४७ ॥
ज्ञानामाजीं दोन भेद । प्रवृत्ति निवृत्ति विशद ।
निवृत्तिज्ञानें सकल साध्य । होत असे ॥ ४८ ॥
प्रवृत्तिज्ञान भेदयुक्त । देहसुखातें वाढवित ।
संपत्ति बलातें देत । सुखसोयी ॥ ४९ ॥
जें नाशिवंत गणले । वेदासवें गुप्त झालें ।
सत्य कांहीसें राहिलें । निवृत्तिज्ञान ॥ ५० ॥
सत्य राहे शाश्वत । दृश्य तें तें अशाश्वत ।
चौदा-चौसष्टींची मात । बुडत गेली ॥ ५१ ॥
कांहीसा वेद राहिला । स्तुति-नीतिरूपें उरला ।
निवृत्तिमार्ग बुडाला सर्वस्वेंसी ॥ ५२ ॥
विप्र केवळ धर्ममूर्ति । क्षत्रिय तयांते रक्षिती ।
वैश्य शूद्र संगतीं तरती । ऐशी स्थिती बुडाली ॥ ५३ ॥
विप्र क्षत्रिय पुढारी । वर्तों लागले अनाचारीं ।
वैश्यीं शूद्रींही त्यापरी । कृषिसेवा सोडिली ॥ ५४ ॥
वर्णाश्रमधर्म बुडाला । आत्मोन्नतीचा मार्ग खुंटला ।
धर्मशास्ता नाहीं उरला । भूमंडळीं ॥ ५५ ॥
घरची कुलवधू टाकिली । कुलटा हवीशी वाटली ।
तिचे ठायीं रंगूं लागली । वृत्ती जयांची ॥ ५६ ॥
अधोमार्गाचे दीपक । म्हाणती आम्ही सुधारक ।
स्वैर आचाराचें सुख । वाटों लागलें ॥ ५७ ॥
व्हावया चित्तशुद्धि । वेदप्रणीत क्रियाविधि ।
आचरितां भवनदी । तरोनि जाय ॥ ५८ ॥
चित्तशुद्धि होय जैशी । प्राणी पावती जन्मासी ।
उच्चनीच वर्णांसी । योग्यतेसारिखे ॥ ५९ ॥
वर्णाश्रमधर्में वर्ततां । चित्ता येतसे शुद्धता ।
म्हणोनि वेद आंखिता । यथाक्रम जाहला ॥ ६० ॥
क्वचित् कोणी भाग्यवंत । भक्तिबळें शिखरा जात ।
परि क्रमाक्रमानें चालत । बहुतेक जन ॥ ६१ ॥
कांही उफराटे चालती । नीचयोनीप्रति जाती ।
कलिधर्में बहुतांची वृत्ति । मागें धांवे ॥ ६२ ॥
कर्महीन झाले सकळ । गेलें आयुष्य आणि बळ ।
मुमुक्षु पडिले विकळ । अंधत्व आलें ॥ ६३ ॥
भविष्य जाणोनि भगवंतें । सोपे सुलभ मार्गातें ।
दाविलें, नाम एकचित्तें । स्मरतां सकलसिद्धी ॥ ६४ ॥
उच्चनीच सर्व याती । नाम स्मरतां मुक्त होती ।
चित्तशुद्धि आणि भक्ति । प्राप्त होय ॥ ६५ ॥
अज्ञ विकल्पी दुराचारी । अशांसही नाम तारी ।
पातकाची नुरे उरी । ज्ञानबोधें ॥ ६६ ॥
कलियुगीं नाम साधन श्रेष्ठ । इतर साधनीं बहु कष्ट ।
अधिकारयुक्त कर्मनिष्ठ । उरला नाहीं ॥ ६७ ॥
परि मुमुक्षुची तळमळ न जाय अंतरींचा मळ ।
संतीं दाखविला सोज्ज्वळ । भजनमार्ग ॥ ६८ ॥
नेणती स्वधर्मकर्म । करूं जाता चुके वर्म ।
उभय हानी कष्ट परम । समाधान नाहीं ॥ ६९ ॥
यास्तव साधुजनीं । बहुतां लाविलें भगवद्भजनीं ।
ज्ञानेश्वर आदिकरोनी । सिद्धपुरुषीं ॥ ७० ॥
बहुतेकीं आदरिलें । कर्मठांनीं अव्हेरिलें ।
कर्मही सांग न झालें । कलिप्रतापें ॥ ७१ ॥
भजनमार्ग आजींचा नव्हे । चहूं युगीं सारखा स्वभावें ।
स्वयें आचरिला सदाशिवें । समाधान पावावया ॥ ७२ ॥
आचार भष्ट जाहलें । मंत्रसामर्थ्य कांहीं न चाले ।
समाधान दुरी राहिलें । निश्चयेंसी ॥ ७३ ॥
वेद गेले भजन गेलें । जन अभिमानडोहीं बुडाले ।
उभयपक्षीं नागवले । सर्वस्वेंसी ॥ ७४ ॥
अन्न न मिळे उदरपूर्ती । अंगिकारिली क्षुद्रवृत्ती ।
नीचयाती हेवा करिती । सामसाम्यें ॥ ७५ ॥
नास्तिक झाले प्रबळ । गुरुत्व ज्ञान तपोबळ ।
लया जावोनि केवळ । अभिमानीं राहिले ॥ ७६ ॥
सामर्थ्य नसतां सत्ता । कोणी न मानी तत्त्वतां ।
अपमान उपहास्यता । होऊं लागली ॥ ७७ ॥
ऐशी उभयपक्षीं हानि । स्वधर्म दिधले टाकोनि ।
उदरपूर्तीवांचोनि । अन्य साधनें राहिलीं ॥ ७८ ॥
थोर कुळें हीनत्वा आली । नाना आपत्तींनीं ग्रासिलीं ।
आहार-विहारें भ्रष्टलीं । कितीएक ॥ ७९ ॥
याकारणें जाहला अवतार । अवलोकिती आचार ।
सुलभसाधनीं नर अपार । रामभजनीं लाविले ॥ ८० ॥
इति श्रीसद्गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
अध्याय पहिला
समास चवथा
भाविक जनां सुविचार । न सुचे इह आणि पर ।
म्हणोनि सद्गुरुअवतार । ईशेच्छेनें लाधला ॥ १ ॥
महाराष्ट्रीं माणदेशीं । परमपवित्र ब्राह्मणवंशी ।
अवतरले पुण्यराशी । सद्गुरुराय ॥ २ ॥
मातापितरा आनंद झाला । अंतर्निष्ठांनीं ओळखिला ।
कार्यकर्ता पुरुष भला । हनुमदंश ॥ ३ ॥
बालपणीं क्रीडा ज्याची । देवतार्चनपूजेची ।
आवडी वृद्धसेवेची । सकलां प्रिय ॥ ४ ॥
उपजत ज्ञान ज्या लाधलें । त्यासी जनव्यवहारें शिकों घातलें ।
लोकाचारें वर्तलें । पाहिजेच कीं ॥ ५ ॥
करिती मौंजी-विवाहादिक । मातापिता पुरविती कौतुक ।
म्हणती प्रपंचभार चोख । वाहील सुपुत्र आमुचा ॥ ६ ॥
लोकाचारें वर्तविती । क्षुद्रवृत्तीसी लाविती ।
सांभाळी आपुली वृत्ती । उपदेशिती पुत्रस्नेहें ॥ ७ ॥
महत्कार्य आणोनि चित्तीं । जनासारिखे वागती ।
सूक्ष्मदृष्टीं न्याहाळिती । स्थिति सर्व ॥ ८ ॥
कळवळा उपजला पोटी । अज्ञानें जनां हानि मोठी ।
उत्तम देह पावोनि शेवटीं । अधोगती चालले ॥ ९ ॥
कर्महीन भक्तिहीन । श्रद्धाहीन विवेकहीन ।
आर्जवें निर्वाह करोन । राहती निरुपायें ॥ १० ॥
सन्मार्गीं लावावें यांसी । करुणा उपजली मानसीं ।
कार्यारंभीं भगवंतासी । आपुलेसें करावें ॥ ११ ॥
भगवत्कृपेवांचून कांही । केवळ प्रयत्न सिद्धी नाहीं ।
समर्थें दासबोधीं पाहीं । कथिले असे ॥ १२ ॥
धरिला मनुजावतार । तैसाचि आचारविचार ।
साधनीं झिजविलें शरीर । साधकवृत्तीं ॥ १३ ॥
व्हावया आत्मज्ञान । सद्गुरूसी रिघाले शरण ।
सेवा केली अतिगहन । गुरुकृपा संपादिली ॥ १४ ॥
केलीं बहुत साधनें । तोडिलीं सकल बंधनें ।
श्रीरामाचे दर्शनें । धन्य झालें ॥ १५ ॥
सद्गुरु बोलती वचन । 'दुर्धर कलि वाढला गहन ।
जीव अज्ञानी मतिहीन । रामभजनीं लावावे ॥ १६ ॥
लोकसंग्रह करावा । प्रपंच थोर वाढवावा ।
अडला भुलला बोधावा । युक्तिप्रयुक्तीं ॥ १७ ॥
नाना प्रापंचिक व्यवसाय । पुरवोनि दावीं भजनसोय ।
बुडत्यासी तरणोपाय । सुचवित जावे' ॥ १८ ॥
आज्ञा वंदोनी शिरीं । गुरुसेवा केली पुरी ।
निघाला भक्तकैवारी । जगदुद्धाराकारणें ॥ १९ ॥
सिद्धपणें विचरती । भूमंडळी नाना तीर्थीं ।
सूक्षदृष्टीं अवलोकिती । स्थिति सर्व ॥ २० ॥
जागोजागीं स्थापिले मठ । भजनीं लाविले भाविक खट ।
सुलभोपायें दाविली वाट । परमार्थाची ॥ २१ ॥
प्रपंच करोनि अलिप्त । अध्यात्मज्ञानें समाधान देत ।
तापत्रयांतूनि काढित । असंख्य नर ॥ २२ ॥
ज्याचा जैसा अधिकार । तैसें साधन लहानथोर ।
दावूनि भवसिंधु पार । पावविती ॥ २३ ॥
शांति जयांची आगळी । कल्पांतींही न डळमळी ।
स्वानंदस्थिति जी निराळी । न होईल कदापि ॥ २४ ॥
भक्तकामना पुरविती । देहदुःखें दूर करिती ।
भूतपिशाचें नेणो किती । उद्धरिलीं दर्शनमात्रें ॥ २५ ॥
असंख्य धेनु पाळिल्या । कसायापासोनि सोडविल्या ।
तैशा कित्येकांसी त्या दिधल्या । पाळावयाकारणें ॥ २६ ॥
नित्य होतसे अन्नदान । तृप्त होती असंख्य जन ।
अन्नपूर्णा स्वयें येवोन । अन्नपूर्ती करीतसे ॥ २७ ॥
नास्तिकांचे समाधान । साक्षात्कारें करिती पूर्ण ।
भक्तिपंथा लावूनि जाण । दुष्ट पातकी उद्धरिले ॥ २८ ॥
सकलांठायीं समदृष्टी । आपपर भाव न ये पोटीं ।
दर्शनें चरणीं पडे मिठी । पूज्यभाव प्राप्त होय ॥ २९ ॥
क्षणएक घडतां संगति । आनंद न समाये चित्तीं ।
नयनीं अश्रुपूर लोटती । गुरुचरणक्षालना ॥ ३० ॥
शिष्यसंप्रदाय वाढला । सच्छिष्यां स्वाधिकार दिला ।
रामनामाचा गजर केला । भूमंडळीं ॥ ३१ ॥
नास्तिकां लाविलें सुवाटें । ज्ञानियांचे मोडले ताठे ।
अज्ञानियां भक्तिपेठे । नेऊनि बैसविले ॥ ३२ ॥
स्वयें बहुत तारिले । शिष्यांकरवींही उद्धरिले ।
राममंदिरां स्थापिलें । जागोजागीं ॥ ३३ ॥
सर्वत्रांसी आज्ञा एक । रामनाम घ्या निःशंक ।
सुख लाभेल ब्रह्मादिक । वांछिती जें ॥ ३४ ॥
ऐसें बहुत कार्य केलें । तंव देह क्षीणत्व आलें ।
स्वस्वरूपीं मीनले । पंचकोश सांडोनी ॥ ३५ ॥
वद्य दशमी मार्गशीर्षमास । समाधीचा पुण्य दिवस ।
येती जे दर्शनास । सद्गुरुधामीं ॥ ३६ ॥
तयां समाधान होय चित्तीं । सेवा करितां सायुज्यप्राप्ती ।
वारी करितां कामना पुरती । भाविकांच्या ॥ ३७ ॥
ऐसें हें अगाध चरित्र । श्रवणें होईजे पवित्र ।
पूर्वपुण्य असेल सूत्र । तरी आवडी श्रवणाची ॥ ३८ ॥
श्रवण करावें एकचित्तें । अर्थें विवरावें तयातें ।
तोडोनिया बंधनातें । सिद्धचालीं चालावें ॥ ३९ ॥
तंव श्रोतीं केला प्रश्न । स्वल्पसंकेतें दाविली खूण ।
तेणें तृप्त न होती श्रवण । विशद करावें ॥ ४० ॥
कोण देश कोण धाम । कोणे कुळीं घेतला जन्म ।
गुरुलीला पावन परम । सविस्तर सांगावी ॥ ४१ ॥
गुरुपरंपराविस्तार । कैसा केला जगदुद्धार ।
भक्त कोण थोर थोर । गुरुकृपा पावले ॥ ४२ ॥
कैसें साधन कैसें भजन । दुःखमुक्त झाले कोण ।
कैसें केलें अन्नदान । कथन करावें ॥ ४३ ॥
मंदिरें स्थापिलीं किती । गोरक्षणाची कैसी स्थिती ।
कैसी अवतारसमाप्ती । स्पष्टोक्ती सांगावी ॥ ४४ ॥
वक्ता बोले जी वचन । गुरुलीला परम गहन ।
मी तंव असें अज्ञान । वर्णूं न शकें ॥ ४५ ॥
परि कृपा केलिया गुरुनाथें । असाध्य तें साध्य होतें
वंदू चरण एकचित्तें । श्रीसद्गुरूंचे ॥ ४६ ॥
कृपाप्रसाद वोळेल जरी । पुढील अध्यायीं सविस्तारीं ।
अंतरी राहोनी विवरी । सद्गुरुस्वामी ॥ ४७ ॥
इति श्रीसद्गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ४८ ॥
इति श्रीसद्गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥