बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय तिसरा

॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥
अध्याय तिसरा
समास पहिला
 
न लिंपे कदा बालक्रिडा‍उपाधी । विवेकें सदा ज्ञान वैराग्य साधी ॥
जया सद्‌गुरूभेटिची होय स्फूर्ति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ३ ॥
 
ॐ नमो जी गुरुमूर्ति । स्वयंसिद्ध ज्ञानज्योति ।
त्रिभुवनीं चमके दीप्ति । चैतन्यरूप ॥ १ ॥
अंतर्बाह्य व्यापूनि असे । परि चर्मचक्षूतें न दिसे ।
दिसे म्हणतांचि पिसें । साक्षित्वें होय ॥ २ ॥
तुझे प्रकाशाचा विलास । निरसी अष्टधेचा भास ।
द्रष्टा आणि दृश्य यांस । स्वतेजीं मेळवी ॥ ३ ॥
प्रकाश आणि दीप । भिन्न ठाव नसे अल्प ।
करितां ध्यानाचा संकल्प । ध्येय ध्याता नुरेचि ॥ ४ ॥
स्वयंप्रकाश परंज्योति । तेजीं सहस्र सूर्य लपती ।
उष्ण शीत विकारस्थिति । मुळीं नाही ॥ ५ ॥
परप्रकाशें पाहो जातां । प्रकाश फिरे मागुता ।
तेथें दुज्याची सत्ता । अल्पही न चले ॥ ६ ॥
तुझ्या स्वरूपाची कोटी । अनंत ब्रह्मांडें सांठवी पोटीं ।
परि भक्त हृदयसंपुष्टीं । घालोनि पूजिती ॥ ७ ॥
तव तेजासी आडवी । ऐसा नसे गोसावी ।
दुजेपणाची यादवी । नाही तेथें ॥ ८ ॥
ज्योत चालली अढळ । नसे मैस ना काजळ ।
वायूचा आधार जोंजाळ । अणुभरी असेना ॥ ९ ॥
तूं होवोनि तुज पाहावें । भावभक्तीनें जाणावें ।
एरवीं ते व्यर्थ गोवे । सद्‍गुरुपद भेटेना ॥ १० ॥
कोणी पाजळी ना विझवी । आदिमध्यान्त ना बरवी ।
अखंड चालली सतरावी । स्नेहेंविण ॥ ११ ॥
मायामोहाचे दर्पणीं । बिंब राहोनि बिंबोनि ।
सवेंचि वाढली दोनी । गंधर्वनगरें ॥ १२ ॥
जड चंचल माया । चैतन्य जाणीव बिंबकाया ।
अधिष्ठानासारिखे जया । विकार दिसती ॥ १३ ॥
परि ते विकारवंत नोहे । मुळीं असिजे तैसेंचि आहे ।
जरी भिन्न भासताहे । अज्ञानियां ॥ १४ ॥
अज्ञान निरसिल्यावरी । बाह्य आणि अभ्यंतरी ।
एकचि रूप निर्धारी । ज्ञानज्योति ॥ १५ ॥
प्रकृतीचा संग घडला । सगुणत्वाचा आळ आला ।
परि म्हणोनीचि लाधला । स्तुति-सेवा कराया ॥ १६ ॥
विशेष जाणिवेचें स्थान । तेंचि सद्गुरूचें अधिष्ठान ।
ऐसें बोलती सज्जन । ठायीं ठायीं ॥ १७ ॥
तीच जाणीव ज्ञानज्योति । सद्‍गुरु ब्रह्मचैतन्यमूर्ति ।
गोंदवलेग्रामीं आम्हांप्रती । भेटली थोर भाग्यें ॥ १८ ॥
निर्गुण सगुणत्वा आलें । आंधळ्यांनींही देखिलें ।
कांहीं जे डोळस झाले । अंतर्बाह्य पाहती ॥ १९ ॥
पाहतां पाहणें विरालें । गुरुरूप होऊनि ठेलें ।
जन्ममरण फेरे चुकले । धन्य पुरुष ॥ २० ॥
गुरुबोधांजन घेतलिया । आंधळेपण जाय विलया ।
द्रष्टेपणही वांया । होऊनि जाय ॥ २१ ॥
सगुणीं सगुण भजावें । चित्तशुद्धीतें पावावें ।
ज्ञानदृष्टीनें पाहावें । सद्गुरूसी ॥ २२ ॥
भोळें भाविक आंधळे जन । यांसी उपासनेलागोन ।
ज्ञानज्योति झाली सगुण । मनुष्यरूपीं ॥ २३ ॥
आमुचे घरा पाहुणी आली । आम्हांसारिखी वागली ।
वागली परि राहिली । वेगळीच ती ॥ २४ ॥
जैसें सोनपितळ आणि सोने । सगट दिसती दागिने ।
शहाणा तो पारखूं जाणे । खरें खोटें कोणते ॥ २५ ॥
मृत्तिका आणि कस्तुरी । मानूं नये एकसरी ।
कस्तुरी कोंदे अंबरीं । सुगंधयुक्त ॥ २६ ॥
गृहीं लाविलिया दीप । जीवजंतू धांवती अमूप ।
फिरफिरोनि घालिती झांप । पोटधंदा सोडोनी ॥ २७ ॥
तैसी ही ज्ञानज्योति । भोंवतीं असंख्य जीव जमती ।
झडपणीं तदाकार होती । संसृतीतें सोडोनि ॥ २८ ॥
रजनीं दृश्य दीप दावी । अज्ञानिया सद्‍गुरुगोसावी ।
ज्ञानतेजें समूळ घालवी । तिमिरराशी ॥ २९ ॥
तिमिर गेलियापाठीं । लोभमोहादि चोरटी ।
न येती समोर दृष्टी । साधकांते नाडाया ॥ ३० ॥
निर्गुण गुणत्वा आलें । गुणसाम्यें वर्णन केलें ।
नातरी वर्णितां भागले । थोरथोर ॥ ३१ ॥
सिद्ध होवोनि सिद्ध पहावे । जाणते होवोनि जाणावें ।
शब्दज्ञानें पडेना ठावें । सद्‍गुरुरूप ॥ ३२ ॥
अनुभवी ना व्युत्पन्न । परि स्तवनीं गुंतले मन ।
आवडीसारिखें सजवोन । निववूं चित्त ॥ ३३ ॥
सूर्या दाविती नीरांजन । ऐसें भक्तीचे लक्षण ।
तैसेंचि ज्ञाननिधान । वर्णूं आतां ॥ ३४ ॥
आवडीसारिखें सजवूं । ज्ञानेंद्रियांची साक्ष घेऊं ।
अंतरीं सद्गुरूचें पद ध्याऊं । निरंतर प्रेमभरें ॥ ३५ ॥
चला गोंदवलें ग्रामासी । रावजीगृहीं सत्वरेंसी ।
बाळलीला आहे कैसी । पाहूं नेत्र भरोनि ॥ ३६ ॥
एक वर्ष झालें बाळा । वाढदिवसाचा सोहळा ।
आनंदें यथासांग झाला । रावजीगृहीं ॥ ३७ ॥
गणपती बोबडें बोले । ऐकतां श्रवण संतोषले ।
उचलोनी कडिये घेतले । ज्यांनी त्यांनी ॥ ३८ ॥
राहेना माउलीघरीं । घेऊनि जाती शेजारी ।
खेळूं लागती नानापरी । त्यासवेंचि ॥ ३९ ॥
जया आपपरभाव नाही । जिकडे नेती तिकडे जाई ।
मुख न्याहाळिना कांही । आपुलें कीं परावें ॥ ४० ॥
सर्वत्रांसी वाटे घ्यावे । वाटणी येईना स्वभावें ।
ज्यानें पहावें त्यानें न्यावे । आपुले गृही ॥ ४१ ॥
तेथेंचि जेवूं घालावें । मऊ शय्येवरी निजवावें ।
पुन्हा माउलीसी पुसावें । बाळ कोठें म्हणोनि ॥ ४२ ॥
मूल पाहतां पडे भूल । वरी गोजिरें आणि सोज्ज्वळ ।
हास्यमुख आणि प्रेमळ । मग काय उणें ॥ ४३ ॥
जरी ओंगळ आणि तुसड । जागचें हलेना जड ।
रडतमुखी खादाड । अतिशयेंचि ॥ ४४ ॥
हटवादी आणि त्रागी । पाय शिर आपटी वेगीं ।
जे सदा असे रोगी । कांही ना कांहीं ॥ ४५ ॥
नकटें काळें कुळकुळीत । मधुरसेवनीं अतृप्त ।
विधि वमन करीत । चिळसवाणें ॥ ४६ ॥
माउलीसी सोडीना । कामकाज करूं देईना ।
म्हणती फेडोन घेतो नाना । उपकार पूर्वजन्मींचे ॥ ४७ ॥
तयासी कोणी न घेती । प्रसंग आल्या कंटाळती ।
वदती 'ऐसीं कां जन्मतीं । दुःख द्यावयाकारणें ?' ॥ ४८ ॥
मस्तकी उवा आणि खवडे । खरूज नायेटे पैण चिपडें ।
झांपड होऊनी सदा रडे । वैरी म्हणती पूर्वींचें ॥ ४९ ॥
तैसा नव्हे गणपती । दर्शनें आनंद होय चित्तीं ।
प्रेमें उचलोनि घेती । करिती हास्यविनोद ॥ ५० ॥
रावजीगृहीं प्रतिदिन । होत असे कीर्तन भजन ।
गणपति चित्त देऊन । श्रवण करी स्थिरत्वें ॥ ५१ ॥
माउलीसन्निध निजेना । निजवितां रडतां राहेना ।
भजनाची आवडी मना । तेथें खेळे स्वच्छंदें ॥ ५२ ॥
म्हणती तुज समजते काय । बालपणीं प्रिय माय ।
खेळखेळोनि दिवस जाय । बालकांचा ॥ ५३ ॥
आजा पोथी वाची नित्य । श्रवणा जावोनि बैसत ।
म्हणती पहा हो याचें चित्त । श्रवणीं स्थिर होतसे ॥ ५४ ॥
अशा वयीं क्रीडेची गोडी । गोड खावयाची आवडी ।
मौज पाहावया घेती उडी । पोरांसवें धांवती ॥ ५५ ॥
यासी दिधल्या खाईना ॥ क्रीडेचा हट्ट धरीना ।
श्रवणा बैसतो पहाना । चित्त देऊनी ॥ ५६ ॥
याची बुद्धी दिसते भारी । सांगितली गोष्ट न विसरी ।
याचेपाशी फसवेगिरी । कांहीं चालेना ॥ ५७ ॥
हळूं हळूं दिवस गेले । तीन संवत्सर पालटले ।
बुद्धि देखोनि चकित झाले । म्हणती कोणा न बोलावें ॥ ५८ ॥
कोणी ठेवितील नांवें । कोणी स्तुति करितील भावें ।
दृष्ट होईल स्वभावें । बालकासी ॥ ५९ ॥
धुळीं अक्षरें घालोन देती । तैसींच काढी शीघ्रगती ।
लिहिण्यावाचण्या गणपती । शिकला त्वरित ॥ ६० ॥
दंतकथा होते सांगत । एकपाठी दुपाठी पंडित ।
भोजसभेसीं नांदत । कालिदासादिक ॥ ६१ ॥
दंतकथा म्हणतां खोटी । करूनि दावितो गोष्टी ।
नवल पहा एकपाठी । पूर्वार्जित ज्ञान ॥ ६२ ॥
पूर्वजन्मीं हा साधु । असेल कोणी प्रसिद्धु ।
वासनाशेषें जन्मसंबंधु । घडला असेल ॥ ६३ ॥
नानापरीनें कल्पना । करिती तर्क वितर्क नाना ।
दृष्टांत आणोनि ध्याना । स्वस्थ राहती ॥ ६४ ॥
चपलत्वें वाटे हूड । परि हूड ना द्वाड ।
पराव्याची न काढी खोड । मैत्री राखे सर्वदा ॥ ६५ ॥
नित्य हरिभजनीं नाचे । रामनाम घेई वाचे ।
बालपणीं आयुष्य न वेंचे । क्रीडेमाजीं ॥ ६६ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय तिसरा
समास दुसरा
 
एकदां वृद्ध लिंगोपंत । नातवासी पाचारित ।
म्हणती 'ऐक रे मात । विचारितों सांग पां ॥ १ ॥
तुजसी एक हंडाभरी । मोहरा दिधल्या जरी ।
तरी काय करिसी सत्वरें । सांग मज' ॥ २ ॥
'वांटोन टाकीन समस्त । अंध पंगु रोगग्रस्त ।
गोरगरीब अनाथ । भिकार्यांसी' ॥ ३ ॥
ऐसें देतां प्रत्युत्तर । आजा संतोषला थोर ।
म्हणे करील परोपकार । दुःखभार हरील ॥ ४ ॥
लिंगोपंत सुसंस्कृत । म्हणोनि ऐसें बोलत ।
उधळ्या म्हणतील समस्त । प्राकृत जन ॥ ५ ॥
बहुतेक मुलांची जात । हातींचे कोणा न देत ।
दुसर्यांचे घेऊं पहात । लोभमोहें ॥ ६ ॥
ऐसी नव्हे सात्विक जाति । परदुःखें दुखावती ।
परसुखें संतोष चित्तीं । होतसे तयासी ॥ ७ ॥
पुनरपि म्हणे आजा । 'तुज केलिया राजा ।
काय करिसी कुलध्वजा । सांग बापा' ॥ ८ ॥
येरू वदे झडकरी । 'न ठेवीन देशीं भिकारी ।
अन्नछत्र राजद्वारीं । ठेवीन नित्य' ॥ ९ ॥
सहज विनोदें पुसिलें । मुलाने प्रत्युत्तर दिलें ।
ऐकोनी अश्रु आले । नयनी श्रोतयाच्या ॥ १० ॥
पंचवर्षांचे बालक । पाहा हो याचें कौतुक ।
सात्विक ज्ञान निःशंक । झाले यासी ॥ ११ ॥
न म्हणे गेईन घोडा । खोपट काढोनि बांधीन वाडा ।
उंची वस्त्रें रथ गाडा । दासदासी दागिने ॥ १२ ॥
विषयभोग वांछिना । भूतदयेहोनि बोलेना ।
वैराग्य कैसें पाहा ना । विवेकेंसहित ॥ १३ ॥
वयें दिसती सान । परि जोडलें निधान ।
उपजत लाधलें ज्ञान । सत्य सत्य ॥ १४ ॥
तपाच्या करितां कोडी । न सुटे मोह-लोभ-बेडी ।
भलीं भलीं जाहली वेडी । यांजसाठी ॥ १५ ॥
क्रियेंवाचून वटवट । घरोघरीं बोलती पोपट ।
उभयकर्मीं वर्ते नीट । ऐसा विरळा ॥ १६ ॥
अनंत जन्मांचिया पोटीं । विषयाची झाली भेटी ।
सोडितां न सुटे गांठी । देहकाष्ठें केलिया ॥ १७ ॥
या कलियुगामाझारीं । वेदांत भरला घरोघरीं ।
आचार पाहतां अणुभरी । शुद्ध नाही ॥ १८ ॥
आम्हां वृद्धांस लाजवी । ऐसी क्रिया करून दावी ।
प्रौढपणीं घेईल पदवी । सायुज्याची ॥ १९ ॥
देहासी वृद्धपण आलें । लोभ मोह तैसेचि ठेले ।
चिंतेने चित्त भ्रमलें । असे नित्य आमुचें ॥ २० ॥
यासी बाळ म्हणों नये । बुद्धीनें हा वडील होये ।
भक्तियुक्त नाम गाये । राम राम म्हणोनी ॥ २१ ॥
आमुचे घरी कुलदैवत । पंढरीनाथ नेमस्त ।
परि हा दिसे रामभक्त । पूर्वसंस्कारें ॥ २२ ॥
जन्मार्जित तप केलें । अथवा रामदूत अवतरले ।
उपजत ज्ञान कैसें आलें । याजपासी ॥ २३ ॥
पहा हो याचा आचार । उषःकाली उठे सत्वर ।
चूळ भरावया नीर । त्वरित आणी ॥ २४ ॥
म्हणे म्हणा हो श्रीहरी । आरती भूपाळी सत्वरी ।
श्रवण करोनि चरण चुरी । दक्षता कैसी पाहावी ॥ २५ ॥
असो तदनंतर । माउलीसन्निध जाय कुमर ।
गोड बोलोनि तोष थोर । देतसे तिजलागीं ॥ २६ ॥
बोलिलें वचन नुल्लंघी । आळसा न देई अंगी ।
वाटे हा बालयोगी । पावला गृहीं ॥ २७ ॥
तुळशी आणवयास धांवे । म्हणे देवपूजन करावें ।
धूपदीप लावा बरवे । दाखवा नैवेद्य ॥ २८ ॥
गीतेचा नित्य पाठ धरीं । चित्त देवोनि श्रवण करी ।
अंतरीं अर्थ विवरी । बाह्य धरी मौनत्व ॥ २९ ॥
निमूटपणें भोजनीं बैसे । गोड-तिखटाची हांव नसे ।
घालिती ते खात असे । आसक्तिरहित ॥ ३० ॥
खेळावयासी नेमस्त । जाई सवंगड्यांसमवेत ।
खोडी कुचाळी न काढित । सदा प्रेम सकळांसी ॥ ३१ ॥
सर्वांसी वाटे हा हवा । याचेसंगें खेळ बरवा ।
नित्य नवा खेळावा । सुखदायक ॥ ३२ ॥
सायंकाळी स्तोत्रें बरवी । मधुरवाणी म्हणोनि दावी ।
भजनीं आवडी नित्य नवी । असे जया ॥ ३३ ॥
भजन झालियावांचोनि । न जाई जो शयनीं ।
सत्कर्मीं निशिदिनीं । काळ करी सार्थक ॥ ३४ ॥
बाळपणीं साधकवृत्ति । अंगीकारिली ज्यांनीं चित्तीं ।
तयां वर्णितां मति । कुंठित झाली ॥ ३५ ॥
सांप्रत असे कलियुग । अधर्मीं प्रवर्तले जग ।
न लागे लावितां मार्ग । सद्धर्माचा ॥ ३६ ॥
पांचवे वर्षीं एके दिनीं । पाचारिलें आजोबांनी ।
भगवद्गीता काढोनि । एक श्लोक सांगितला ॥ ३७ ॥
पाठ म्हणोनि दाविला । तैसा अर्थही निरूपिला ।
आजा मनीं संतुष्ट झाला । अतिशयेंसी ॥ ३८ ॥
पुत्र होईल ब्रह्मज्ञानी । कुळें उद्धरील दोन्ही ।
ऐसें आणोनिया ध्यानीं । ईशस्तवन करीतसे ॥ ३९ ॥
असो ऐसी गृहस्थिती । प्रौढ झाला गणपती ।
मेळवी अनेक सोबती । खेळायासी ॥ ४० ॥
दगड मांडोनि देव करिती । फुलें घालोनि पूजिती ।
आरती धुपारती म्हणती । तयांपुढें ॥ ४१ ॥
मातापित्यांची सेवा करी । आज्ञा नुल्लंघी क्षणभरी ।
हूडपणें न भरे भरी । क्रीडाविनोदें ॥ ४२ ॥
ऐसें असतां एके दिनीं । मध्यसमय जाली रजनी ।
उठोनि पहातसे जननी । तंव गणपती कोठे दिसेना ॥ ४३ ॥
शेजेवरी गणपती नाही । गृह शोधिलें सर्वही ।
कथिलें रावजींसी लवलाही । गणपती कोठें पाहा हो ॥ ४४ ॥
उभयतां बहु शोधिती । सर्वत्रांसी जागे करिती ।
गलबला ऐकोनि रातीं । बहुत लोक मिळाले ॥ ४५ ॥
म्हणती कोठें गेला हो बाळ । पहा पहा हो सकळ ।
लागली सर्वांस तळमळ । तर्क करिती आपुलेपरी ॥ ४६ ॥
कोणी म्हणती तस्करें नेला । अलंकार पाहोनि भुलला ।
ते घेऊन सोडील तयाला । चिंता कांही नसावी ॥ ४७ ॥
शाकिनी डाकिनी गृहस्कंध । यक्ष पिशाच समंध ।
रात्रौ विचरती प्रसिद्ध । बालकांसी पछाडिती ॥ ४८ ॥
कोणी म्हणती झोंपा भारी । कुंभकर्णासारिख्या अघोरी ।
बाळ नेलें निशाचरीं । ठाउकें नाही ॥ ४९ ॥
द्वार बंद नाहीं केलें । असावधपणें निजले ।
तस्करें मुलासी नेलें । खचित खचित ॥ ५० ॥
भजनाचा छंद बहुत । ध्वनि परिसोनि गेला खचित ।
प्रातःकालीं गृहाप्रत । येईल, स्वस्थ रहावें ॥ ५१ ॥
काही मिळाले धीट । म्हणती पुरे पुरे ही वटवट ।
शोधूं चला हो नीट । चहुं दिशांसी ॥ ५२ ॥
मध्यरात्र समयासी । पाहती सांदीकोंदीसी ।
कोणी नेलें बालकासी । कांहीं विचार सुचेना ॥ ५३ ॥
रात्रौ फिरती निशाचर । सर्प वृश्चिक दुर्धर ।
श्वापदें आणि तस्कर । निर्भयपणें ॥ ५४ ॥
शोधितां शोधितां थकले । कांहीं नदीकडे निघाले ।
मार्गीं अकस्मात देखिलें । गणपतीसी ॥ ५५ ॥
समाधीचें केलें आसन । वरी घातलें सिद्धासन ।
नासिकाग्रीं दृष्टी देऊन । रामनाम घेतसे ॥ ५६ ॥
पाहूनि मानसीं चकित । योगी असे हा निश्चित ।
मनीं चरण वंदित । सिद्धपुरुष जाणोनी ॥ ५७ ॥
हातीं धरोनि आणिला । सकळांसी आनंद झाला ।
बहुप्रकारें बोध केला । निबिड अंधारीं नच जावें ॥ ५८ ॥
कोणी म्हणती उपदेशासी । पात्रता नसे आम्हांसी ।
कारणिक अवतरले ऋषि । ज्ञानरूप केवळ ॥ ५९ ॥
सहा वर्षांचा बालक । बैसला सिद्धासनीं एक ।
अपरात्रीं नदीतटाक । श्मशानस्थान विशेष ॥ ६० ॥
यासी काय म्हणावे । दंडावें कीं वंदावें ।
स्तवावें कीं बोधावें । धाक भिती दावोनी ॥ ६१ ॥
गणपती बोले वचन । एकांतीं स्थिर होय मन ।
नामस्मरणीं अनुसंधान । प्रेमपूर वाहतो ॥ ६२ ॥
चित्त वाहे भलतीकडे । मुखें नाम हे कोरडें ।
ऐशियानें आयुष्य थोडें । पुरणार नाहीं ॥ ६३ ॥
तया म्हणती तूं वयें सान । उद्यमीं घालावें मन ।
वृद्धपणीं अनुसंधान । स्वस्थपणें करावें ॥ ६४ ॥
बहुत विद्या शिकावी । आणि भाग्यश्री भोगावी ।
जगीं कीर्ति मिळवावी । मग भजन करावें ॥ ६५ ॥
इंद्रियीं विषय सेवावे । तृप्त करोनि भजावें ।
नातरी लागेल मुकावें । दोहींकडे ॥ ६६ ॥
विषयोर्मि येतां पाहीं । भाव साधनीं न राही ।
अत्याचारें भवडोहीं । बुडतो नर ॥ ६७ ॥
प्रपंच करोनि परमार्थ । करावा बोलती संत ।
वासना झालिया निवृत्त । सुलभ होये ॥ ६८ ॥
आधीं विद्या शिकावी । इंद्रियें अतृप्त न ठेवावीं ।
मग ती परमार्थपदवी । साधनानें साधावी ॥ ६९ ॥
उपदेश नानापरी । करिती ते नरनारी ।
भूतखेतांची भिती भारी । सांगूं लागलें बाळातें ॥ ७० ॥
ऐसे आपुलाल्या मतीं । अधिकार नेणोनि बोध करिती ।
अघटित करणी वदती । परिसिली नाहीं ॥ ७१ ॥
कांही दिवस गेल्यावरी । गणपती नसे शय्येवरी ।
रावजी निर्धारी अंतरी । एकनिष्ठ वैष्णव हा ॥ ७२ ॥
पुत्रस्नेहें कळवळला । धुंडधुंडाळोनी आला ।
म्हणे हा कोठें लपला । न कळेचि ॥ ७३ ॥
पहांटेच्या समयासी । बाळ आला गृहासी ।
रावजी पुसे तयासी । कोठे आसन घातलें ॥ ७४ ॥
येरू वदे नदीथडीं । खडकांच्या पडल्या दरडी ।
माजीं असती भगदाडीं । उपाधिरहित ॥ ७५ ॥
अरे सर्प विंचू फिरती । क्रूर श्वापदें नेणो किती ।
कैसी होईल देहस्थिती । न विचारिसी ॥ ७६ ॥
देह तो प्रारब्धाधीन । कोण चुकवूं शके मरण ।
समय प्राप्त झालिया जाण । मांदुसी ही न टिके ॥ ७७ ॥
नाशिवंत नासणार । जाणोनिया निर्धार ।
आहे तंव जगदीश्वर । शाश्वत तो ओळखावा ॥ ७८ ॥
ऐकोनि ऐसीं उत्तरें । रावजीनेत्रीं नीर झरे ।
म्हणे होईल तें तें खरें । स्वस्थ राहोनि पाहावें ॥ ७९ ॥
अगाध ज्ञान पाहोन । रावजी मानी समाधान ।
म्हणे धन्य गणपती निधान । ईशकृपें लाधलें ॥ ८० ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्री सद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय तिसरा
समास तिसरा
 
श्रीगणेशा तुज नमन । करोनि रघुपतिस्मरण ।
श्रीगुरुलीला कथन । करितों मी यथामति ॥ १ ॥
नित्य शेळ्या चारावयासी । गणपती जातसे वनासी ।
तेथें क्रीडा करी कैसी । पाहतां असाधारण ॥ २ ॥
जमवी दगड बहुत । रचोनि भिंती करित ।
माजीं तीन खडे बैसवीत । नामें सांगे तयांचीं ॥ ३ ॥
मध्यें उभा श्रीराम । जो भक्तां देई आराम ।
सव्यभागीं भक्त परम । लक्ष्मण उभा असे ॥ ४ ॥
वामभागीं सीताबाई । जगद्वंद्य जगाची आई ।
पुढें मारुति वज्रदेही । एक खडा ठेवित ॥ ५ ॥
मित्रांची मांदी मेळविली । दगडांचीं देउळें केलीं ।
मग क्रीडा आरंभिली । कैसी पहा ॥ ६ ॥
हातांतील काष्ठासी । वीणा म्हणोनि स्कंधप्रदेशीं ।
घेवोनि दगड टाळेसी । मेळविती अनेक ॥ ७ ॥
रामनामाचा गजर करिती । छोट्या पाउलीं नाचती ।
दगडीं दगड वाजविती । भजन करिती आनंदें ॥ ८ ॥
मित्रांमाजी मित्र खरा । नामें बापू फडतरा ।
गणपतीवांचोनिया जरा । दुरी न राहे ॥ ९ ॥
गणपती जी जी आज्ञा करी । सुलभ कठिण आदरी ।
न विसंबती क्षणभरी । एकासी एक ॥ १० ॥
वाटे हा पहिला शिष्य । गुरुवचनीं विश्वास ।
नामाचा घे बहु ध्यास । सद्‍गुरुबोधें ॥ ११ ॥
असो ऐसी भजनस्थिति । नित्य आवडी चित्तीं ।
गणूबुवा ऐसें म्हणती । बाळमित्र कौतुकें ॥ १२ ॥
उपजत ज्ञानज्योती । न झांके झांकितां दीप्ती ।
गणूबुवा म्हणोनि वंदिती । चरण सद्गुरूचे ॥ १३ ॥
जैसा मलयगिरीचंदन । सुवासेंसी पैसावोन ।
तैसा वेधी पराव्याचें मन । स्वतेजें आपणाकडे ॥ १४ ॥
पंचाननाचे छाव्यासी । सलगी न करवे जीवासी ।
वयें अल्प परि सर्वांसी । आकर्षत स्वसत्तें ॥ १५ ॥
नागरिकजन आश्चर्य करिती । पोरें यासवेंचि धांवती ।
रानीं जाऊन भजन करिती । धाक न मानिती आमुचा ॥ १६ ॥
रावजीपंत तुमचा पुत्र । मधुरवचनी जगन्मित्र ।
बालकें जमवी सर्वत्र । नायकती गृहकाजें ॥ १७ ॥
घरीं अल्पही न राहती । गणूबुवा म्हणोनि धांवती ।
मायबापाहूनि चित्तीं । प्रिय वाटतो सकळांसी ॥ १८ ॥
यासी बोध करावा कांहीं । अथवा बैसवावें गृहीं ।
वेड लाविलें सकळांही । स्वच्छंदपणे ॥ १९ ॥
तैसा शाळेसी जातां । सकळांसि म्हणे तुम्ही आतां ।
राम राम लिहोनि कित्ता । मजलागीं दावावा ॥ २० ॥
तेंचि काढोनि दाविती । पंतोजी बहु बोध करिती ।
कांही केल्या गणपती । नायकेचि ॥ २१ ॥
पंतोजी बोले तयासी । न यावें तुवां शाळेसी ।
सकल बाळें बिघडविसी । आमुचा धंदा बुडेल ॥ २२ ॥
पंतोजीनें धाक दाविला । गणपतीसी न मानला ।
दुजे दिनीं डाव मांडिला । गड्यांसह गोठ्यावरी ॥ २३ ॥
लहान थोर सवंगडी । क्रीडा करिती आवडी ।
रामभजनाची परवडी । मांडिली कौतुकें ॥ २४ ॥
पंतोजी शाळेमाजीं पाहती । परि एकही नसे विद्यार्थी ।
चिंता उपजली चित्तीं । आतां कैसें करावें ॥ २५ ॥
गृही वृतांत निवेदिला । गणपतीनें पुंडावा केला ।
समजावूनि पाठवा त्याला । विद्यालयीं ॥ २६ ॥
आजा चुलता उपदेशिती । पुन्हां शाळेसी धाडिती ।
माय उपदेशी 'गणपती । तुवां ऐसे न करावें ॥ २७ ॥
वडिलार्जित कुलकरणवृत्ती । चालविली पाहिजे निगुती ।
विद्या करावी पुरती । न करीं कुचराई' ॥ २८ ॥
गणपती बोले 'गे प्रमाण । सर्वही येतें मजलागोन ।
काळजी न करावी, वतन । सांभाळीन दक्षत्वें ॥ २९ ॥
रामनामाची आवडी । काय सांगूं तुज गोडी ।
श्रवण करीं एक घडी । प्रेम कैसें उफाळे' ॥ ३० ॥
ऐसीं वदोनि उत्तरें । रामनाम मंजुळस्वरें ।
घेऊं लागला प्रेमभरें । माय ऐके तटस्थ ॥ ३१ ॥
रामनामाची गोडी । चाखितां चालली घडी ।
वृत्ति गुंतली आवडी । सांज झाली कळेना ॥ ३२ ॥
सकळांसी लाविली चट । रामनामाचा घडघडाट ।
दुरितें सोडिली वाट । गोंदावलीची ॥ ३३ ॥
नऊ वर्षांचे अवसरीं । रावजी मनीं विचार करी ।
व्रतबंध कराया बरी । वयसीमा ॥ ३४ ॥
कुलगुरूसी पाचारोनि । उच्चनीच ग्रह बघोनि ।
मुहूर्त ठरवा उपनयनीं । ऐसें सांगे ॥ ३५ ॥
मुहूर्त बरवा शोधिला । द्रव्यनिधि मोकळा केला ।
मातापितयां आनंद झाला । मनींची हौस पुरवूं वदती ॥ ३६ ॥
सोयरे जमविले सकळ । याज्ञिकी विप्रांचा गोंधळ ।
मौंजीबंधनाची वेळ । आली म्हणती समीप ॥ ३७ ॥
वाद्यें वाजती घडाघडा । मातृभोजनीं काळ न दवडा ।
घटिका भरली वेळ थोडा । सावधान म्हणती ॥ ३८ ॥
पितापुत्र बोहल्यावरी । मंगलाष्टकें सुस्वरीं ।
द्विज म्हणती सावध सत्वरी । मंगलमुहूर्तीं असावें ॥ ३९ ॥
गणपती विचारी मानसीं । हे सावध म्हणती आम्हांसी ।
असावध कोणेविषीं । राहिलो मी ॥ ४० ॥
चित्त देऊनि करी श्रवण । मंत्रार्थ पाहे विवरोन ।
कोठें असती उपनयन । द्विजत्व तेंही दिसेना ॥ ४१ ॥
गायत्री मंत्र उपदेशिला । एकचित्तें पठण केला ।
ॐ तत्सत् अनुभवाला । आलें पाहिजे ॥ ४२ ॥
अनुभवी तोचि ब्राह्मण । येर कुलधर्मपालन ।
ऐसे करितसे मनन । मनामाजीं ॥ ४३ ॥
परिधानासी कौंपीन । प्रावरणासी कृष्णाजिन ।
वैराग्यद्योतक चिन्ह । मनी म्हणे ॥ ४४ ॥
कंठी घालिती यज्ञोपवीत । जें ब्रह्मग्रंथीनें ग्रथित ।
अनुसंधान ठेवावें हा हेत । स्वस्वरूपी ॥ ४५ ॥
कर्मफलानें बांधला । मौंजीबंधनें व्यक्त केला ।
विवेकें पाहिजे सोडविला । जीवात्म्यासी ॥ ४६ ॥
यमनियम दंड देती । भिक्षाहारें उदरपूर्ती ।
लोभ न धरावा चित्तीं । कोणाविषयीं ॥ ४७ ॥
भिक्षा घालोनि म्हणे जननी । चहूं वेद षड्दर्शनीं ।
निपुण होईं अठरा पुराणीं । गुरुबोधें ॥ ४८ ॥
आप्तइष्ट कुलगोत । भिक्षा घालोनि निरोप देत ।
गुरुकृपें ज्ञानोन्नत । व्हावें तुवां ॥ ४९ ॥
बोलती सकल मंत्र मुखें । परि अर्थातें कोणी न देखे ।
विरळा सद्‍गुरुसारिखे । अर्थ विवरिती ॥ ५० ॥
बोलणें एक करणें एक । तो न म्हणावा विवेक ।
परि कालचक्राचें कौतुक । ऐसेंचि आहे ॥ ५१ ॥
कण जावोनि भूस राहिलें । भूषणावांचूनि छिद्र उरलें ।
जाणते पुरुषीं जाणिलें । येर अवघे म्हणती सोहळा ॥ ५२ ॥
कुलगुरु तेंचि सांगती । संध्योपासना शिकविती ।
अग्निकार्य करावें म्हणती । नित्यनेमें ॥ ५३ ॥
प्राणायामीं नासिकासी । करविती हस्तस्पर्शासी ।
न जाणती योगासी । मार्गमळण ॥ ५४ ॥
जैसा गुरु तैसा चेला । निपट बोध वायां गेला ।
गणपती मनीं खोचला । समाधान नाहीं ॥ ५५ ॥
गुरु स्वयें अनधिकारी । शिष्यातें कैसा उद्धरी ।
सद्‍गुरुदयाळांची सरी । येणार नाही ॥ ५६ ॥
भिडें भिडें भिडो जातां । न सुटे कर्माकर्मगुंता ।
सद्‍गुरुपद तत्त्वतां । शोधिलें पाहिजे ॥ ५७ ॥
ऐसें बहुतां प्रकारीं । गणपती विवेकें विवरी ।
चटका लागला अंतरीं । उपदेशाचा ॥ ५८ ॥
इतर मिष्टान्नें जेविती । किती उठती ब्राह्मणपंक्ती ।
दक्षिणा देऊन बोळविती । याचकांसी ॥ ५९ ॥
व्रतबंध सांग झाला । सकलां आनंद वाटला ।
पाहुणे समुदाय बोळविला । वस्त्रें देउनी ॥ ६० ॥
गणपती बालब्रह्मचारी । संध्यावंदनादि कर्में करी ।
म्हणे मागावी माधुकरी । आज्ञा असे गुरूची ॥ ६१ ॥
चारी वेद शिकावे । षड्दर्शना जाणावें ।
पुराणीं व्युत्पन्न व्हावें । ब्रह्मपद पावावया ॥ ६२ ॥
चहूं वेद किती असती । शास्त्रें कैशीं शिकों येती ।
गुरुसेवेची कैसी स्थिती । मज निरूपावी ॥ ६३ ॥
उपाध्ये बोलती बाळा । वेद अनंत आगळा ।
एकही न वचे शिकला । आयुष्यवरी ॥ ६४ ॥
शास्त्रेंही असती अपार । तैसाचि पुराणांचा विचार ।
कलियुगीं उतरे पार । ऐसा नाहीं ॥ ६५ ॥
गुरूसी द्यावें धन । मानावें गुरुवचन ।
कार्याकार्य विद्या पठण । करोनि स्वस्थ असावें ॥ ६६ ॥
जेणें राहे वतन वृत्ती । ती विद्या करावी पुरती ।
अधिकारी तोषवावे चित्तीं । मधुरवचनीं ॥ ६७ ॥
आमुचा तों हाचि धंदा । यजमानास राखों सदा ।
उदरपूर्तीवांचुनि कदा । आन नेणों ॥ ६८ ॥
येणें नव्हे समाधान । अंतरती श्रीचरण ।
उत्तम नरदेह पावोन । व्यर्थ होय ॥ ६९ ॥
वेदें जैसें आज्ञापिलें । तैसें पाहिजे वर्तलें ।
लौकिकीं नसे बोलिलें । भगवद्वाक्यें प्रत्यक्ष ॥ ७० ॥
तरी ऐसा जो कां ज्ञानराशी । तोचि शोधूं अहर्निशी ।
हिंडू आतां दशदिशीं । सद्‍गुरुपद शोधाया ॥ ७१ ॥
सद्‍गुरुकृपा होतां पाहीं । जगीं दुर्लभ नसे कांही ।
सज्जन कथिती ठायीं ठायीं । भगवद्वाक्यें ॥ ७२ ॥
जें वेदविद्येचें दैवत । परमगुह्य गुह्यातीत ।
होतां सद्‍गुरुपदांकित । ठायीं पडे ॥ ७३ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय तिसरा
समास चवथा
 
जयजय श्रीआत्मारामा । भूतां व्यापूनि रिकामा ।
अखंड आनंदसुखधामा । हृदयनिवासी ॥ १ ॥
जवळीं असोनि उमजेना । विषयीं धांवे वासना ।
विभक्तपणे नमितो चरणा । ध्यान राहो अखंड ॥ २ ॥
व्रतबंधनाउपरी । गणपती नाना क्रीडा करी ।
बटुवेष कौपीनधारी । चित्त वेधी पाहतां ॥ ३ ॥
गृहीं वृद्ध लिंगोपंत । बाललीलें होती मुदित ।
पुनरपि गीताई प्रसूत । पुत्र कन्या लाधली ॥ ४ ॥
अण्णा असे पुत्र नाम । मुक्ताई कन्या सुरूप परम ।
सकळांचे अति प्रेम । गणपतीवरी ॥ ५ ॥
तैसे गुलगुरु सखारामभट्ट । पाठक उपनामें कर्मनिष्ठ ।
पत्रिका वर्तविती नीट । विद्वान् होते बहुगुणी ॥ ६ ॥
यांचे पुत्र वामनबुवा । हेचि कर्ते होते तेव्हां ।
तयांचे पुत्र चिंतूबुवा । खेळगडी गणपतीचे ॥ ७ ॥
अप्पा पाटील गांवकर । पुत्र दाजीचा चतुर ।
बाळा तयाचा कुमर । कुलकर्ण्यावरी अति प्रीति ॥ ८ ॥
चरित्रामाजी संबंध । येईल म्हणोनि विशद ।
नामें केलीं प्रसिद्ध । उभय कुलांची ॥ ९ ॥
पंतोजी अण्णा खर्शीकर । व्यवहारविद्येमाजीं चतुर ।
परि नेणती अधिकार । गणपतीचा ॥ १० ॥
एके समयीं ऐसें झालें । गुरुजी स्वल्प गृहीं आले ।
इकडे भजन आरंभिलें । शिष्यवर्गें ॥ ११ ॥
पंतोजींसीं राग आला । छडी मारिती सर्वांला ।
मुलें म्हणती गणपतीला । कैसा विचार करावा ॥ १२ ॥
येरु वदे सर्वांसी । स्वस्थ रहावें मानसी ।
रामद्वेषीं नरासी । शिक्षा होईल त्वरित ॥ १३ ॥
संवगड्यांतील मुलांनीं । अप्पा पाटिला भेटुनी ।
वृत्तांत कथिला मृदुवचनीं । पंतोजींचा ॥ १४ ॥
तुमचे वेश्येपाशी । पंतोजी जाती अहर्निशी ।
भलतें भासतें आम्हांसी । तुमचे तुम्ही पहावें ॥ १५ ॥
पाटील होता विषयग्रस्त । कर्णीं वाक्यें झोंबत ।
दांतओठ खात खात । निघाला तेथोनी ॥ १६ ॥
एकडे गुरुजींची स्वारी । शाळेंतूनि जातां घरीं ।
बैसले तेथें क्षणभरी । पान खात ॥ १७ ॥
बोलाफुला गांठ पडली । पाटलाची स्वारी आली ।
तळची आग मस्तका गेली । निष्ठुरपणें मारित ॥ १८ ॥
मारमारोनि केला विकळ । लोक धांवले सकळ ।
वृत्तांत परिसोनि नवल । अत्यंत भासलें ॥ १९ ॥
ऐसें नव्हे पाटिलबुवा । गणपतीने केला पुंडावा ।
पंतोजी तुम्हीं त्याचे नांवा । कदापि काधूं नये ॥ २० ॥
तो असे भगवद्भक्त । श्रीकृष्णासारिखा धूर्त ।
जाणावें हें सत्य । त्याचे वाटेसी नच जावें ॥ २१ ॥
शाळा सोडिली अण्णांनी । निघाले गाडी भरोनी ।
मार्गीं तयांसी गांठोनी । उपदेशी ब्रह्मचारी ॥ २२ ॥
रामभक्तासी वैर । करितां दुःख होतें फार ।
आतां तरी रघुवीर । स्मरत जावा ॥ २३ ॥
दो दिवसांची चाकरी । रामकृपेची भाकरी ।
तोचि तारी आणि मारी । शरण जावें तयासी ॥ २४ ॥
ऐशी क्रीडा नानापरी । करितसे ब्रह्मचारी ।
मित्रांचा जो कैवारी । संकटसमयीं ॥ २५ ॥
धांवण्यामाजीं चपळ । मुखीं हास्य सोज्ज्वळ ।
तनु दिसे कोमल । उड्या घेई वृक्षावरी ॥ २६ ॥
विनोदी असोनि निश्चल । धीट आणि कोमल ।
वक्तृत्वें भुलवी सकल । लहानथोर ॥ २७ ॥
रामनाम हाचि छंद । हीच क्रीडा विनोद ।
अंतरीं ध्यायी सद्‍गुरुपद । कैं देखेन डोळां ॥ २८ ॥
शाळेसी निमित्तमात्र जाई । विद्या येतसे सर्वही ।
आश्चर्य मानिती पाहीं । बुद्धिप्रभाव देखोनी ॥ २९ ॥
कोळशाची शाई करोनि । अर्कपत्रें काढी लिहोनी ।
रामनामें वृक्ष भरोनी । प्रदक्षिणा करितसे ॥ ३० ॥
पाहोनि क्रीडाकौतुक । आश्चर्य करिती लोक ।
लिंगोपंत धूर्त तार्किक । विचार करी मानसीं ॥ ३१ ॥
हा होईल भगवद्भक्त । प्रपंचीं राहील विरक्त ।
उदासीन वागे सतत । वय सान असोनी ॥ ३२ ॥
तरी हा हातींचा जाईल । रानीं वनीं फिरेल ।
विरक्तपणें वागेल । जनांमध्यें ॥ ३३ ॥
यास्तव शीघ्रची लग्नग्रंथी । घालूं म्हणे रावजीप्रती ।
मानलीं सकलांसि युक्ति । गीताआदिकरोनी ॥ ३४ ॥
शोधूं लागले नोवरी । कुलवंत स्वरूपें बरी ।
जाणोनिया वतनदारी । पाहों येती अनेक ॥ ३५ ॥
गोडसे उपनामी संभाजीपंत । कुलकर्णी खातवळीं वसत ।
तयांची कन्या नेमस्त । केली असे ॥ ३६ ॥
वय सान गौरवर्ण । कुलशील शुभलक्षण ।
वर द्वादशीं एक न्यून । जोडा शोभतसे साजिरा ॥ ३७ ॥
वाङ्निश्चय सीमांतपूजन । विवाहहोम अन्नदान ।
सरस्वती ठेविलें नामाभिधान । समारंभ सांग केला ॥ ३८ ॥
परि गणपती उदासीन । म्हणे कासया हें बंधन ।
कैं देखेन सद्‍गुरुचरण । भवसिंधुतारक ॥ ३९ ॥
विवाह म्हणजे सजीव बेडी । जी थोरथोरांस करी वेडी ।
सद्वासना धडफुडी । असेल तीही घालवी ॥ ४० ॥
नरदेहाचा अधिकार । स्वयें व्हावें विश्वंभर ।
परि करित किंकर । बहुतांचा बहुपरी ॥ ४१ ॥
भलतियाचे आर्जव करवी । कोणा दुरुत्तरें बोलवी ।
नसताचि मोह लावी । पाठीमागें ॥ ४२ ॥
सुकर्मीं वा दुष्कर्मी । प्रवृत्त व्हावे धनागमीं ।
एवं आयुष्य प्रपंचकामी । अहंकारयुक्त लाववी ॥ ४३ ॥
ऐसा हा मोहपाश । बहुत झाले कासाविस ।
तरला ऐसा पुरुष । भाग्यवंत विरळाचि ॥ ४४ ॥
जैसा वाईट तैसा चांगला । परि लाभे क्वचिताला ।
सोमल औषधी असे भला । जाणत्यासी ॥ ४५ ॥
गृहस्थाश्रमाची महती । बहुत गाइली धर्मग्रंथीं ।
परि विषयीं लंपट होती । बहुतेक जन ॥ ४६ ॥
अतिथीसेवा अन्नदान । तिन्ही आश्रमां विश्रांतीस्थान ।
पितरदेवतांसी हवन । गृहस्थाश्रमी मिळतसे ॥ ४७ ॥
पितृऋण मातृऋण । फिटे होतांचि संतान ।
विद्याकलांचे पालन । गृहस्थाश्रमाकारणें ॥ ४८ ॥
एवं चतुर्विध पुरुषार्थ । ज्ञानिया लाभती येथ ।
अज्ञानें होतां आसक्त । अधोगती निश्चयें ॥ ४९ ॥
जरी असेल विवेक वैराग्य । तरीच हें लाधेल भाग्य ।
परि कलियुगीं ऐसा योग । घडणें कठीण ॥ ५० ॥
ज्ञानें व्हावें विरक्त । तरी संसारीं अलिप्त ।
सद्‍गुरुविना ज्ञान प्राप्त । होणार नाहीं ॥ ५१ ॥
या गृहस्थाश्रमाकारणें । देवादिकां जन्म घेणें ।
विद्या कलादि आयतनें । याजसाठीं ॥ ५२ ॥
हें सृष्टीचें उगमस्थान । याचेनि सृष्टीचें पालन ।
नीति न्याय दंडण । याचेकरितां ॥ ५३ ॥
ऐसा विवेक उदेला । हळूं हळूं वाढों लागला ।
सचिंत दिसे बैसला । ठायीं ठायीं ॥ ५४ ॥
जें देवाचें दैत । ऐसे संत महंत ।
तेचि अधिकारी येथ । वेदनिधि दावाया ॥ ५५ ॥
वेद अनंत अपार । शब्दज्ञानें न पडे पार ।
कलियुगीं अल्पायुषीं नर । धृतीही अल्प जहाली ॥ ५६ ॥
तैसा आहार विहार । दुर्जनसंगति अनिवार ।
बुद्धी सुचे तदनुसार । देहसुखाची ॥ ५७ ॥
वेदशास्त्रपठण केलें । परि देहसुखानें नाडले ।
कामधेनूपाशीं घेतलें । तक्र जैसें ॥ ५८ ॥
ऐसा कालाचा महिमा । ध्यानीं न ये परमात्मा ।
सुखासक्तीची सीमा । जाहली असे ॥ ५९ ॥
देहसुखाचीं साधनें । शोधिती ते शहाणे ।
बहु द्रव्य मिळवूं जाणे । तो पुरुष उत्तम ॥ ६० ॥
पंचभूतांचे मिळवणी । सुखसोयी साधिती झणीं ।
तीचि म्हणती ज्ञानी । जनरूढी ॥ ६१ ॥
जो भूतांचा जनिता । त्रिभुवनीं जयाची सत्ता ।
तयासी न पाहतां । प्रकृतिसुखें धुंडाळिती ॥ ६२ ॥
प्रकृतिमाजीं सुख इच्छिलें । ते पुरुष अज्ञानी गणले ।
रावणादिक भले भले । सत्यलोकीं सत्ता ज्यांची ॥ ६३ ॥
वसिष्ठ-विश्वामित्रांची कथा । पाहतां कळे ज्ञानसत्ता ।
सद्‍गुरुकृपें येई हातां । विमल ज्ञान ॥ ६४ ॥
मुळीं प्रकृति नाशिवंत । तिचीं कर्मेंही अशाश्वत ।
ठायीं पाडावें शाश्वत । तरीच ज्ञानी म्हणवावें ॥ ६५ ॥
वेद अनंत बोलिले । प्रवृत्तिज्ञान विशद केलें ।
निवृत्ति संकेतें दाविले । अगोचर जया ॥ ६६ ॥
वेदां जे अगोचर । तें संतांसी गोचर ।
मूळ सांपडतां तरुवर । हातीं येई ॥ ६७ ॥
गुरुकृपेवांचूनि कांहीं । सर्वथा सार्थक होणें नाहीं ।
खूणगांठ बांधोनि हृदयीं । न्याहाळितसे सूक्ष्मदृष्टीं ॥ ६८ ॥
कोणी येतां साधुसंत । म्हणे दाखवा भगवंत ।
वेदशास्त्रांचा मतितार्थ । उकलोनि दावा ॥ ६९ ॥
चार वेद सहा शास्त्रें । अठरा पुराणें उपसूत्रें ।
शिकवा समग्र मंत्र तंत्रें । येके दिनीं ॥ ७० ॥
ऐसा करितां प्रश्न । म्हणती आम्हां नसे ज्ञान ।
गुरुचरणीं व्हावें लीन । ज्ञान येईल तुजलागीं ॥ ७१ ॥
येरु वदे ऐसे संत । कोणें ठायीं नांदत ।
ठाउके तरी पुरवा हेत । कृपा करोनी ॥ ७२ ॥
भवतारक सद्‍गुरु संत । गृहीं गुंततां नोहे प्राप्त ।
लोभ सांडोनि गिरीगव्हरांत । तीर्थीं क्षेत्रीं शोधावे ॥ ७३ ॥
जयांची होतां कृपादृष्टी । अज्ञान ज्ञानासह उठी ।
जन्ममृत्यु आटाआटी । भवग्रंथी तुटेल ॥ ७४ ॥
गुरुशोधाचा निश्चय केला । सोबत्यांसी निवेदिला ।
जे न वदती कवणाला । विश्वासू परम ॥ ७५ ॥
चुलत बंधु दामोदर । दुजा वामन म्हासुर्णेकर ।
दोघां मानवला विचार । सांगातें येऊं म्हणती ॥ ७६ ॥
तंव गृही लिंगोपंत । जरेनें जाहले ग्रस्त ।
मृत्युचिन्हें उमटली जेथे । ते गेले निजस्थाना ॥ ७७ ॥
कोणी हळहळूं लागले । कोणी म्हणती भलें झालें ।
पुत्रपौत्रांदेखत गेले । कलियुगीं अलभ्य ॥ ७८ ॥
लिंगोपंत पुरुष भला । कार्यकर्ता होऊनी गेला ।
ईश्वर तयाचे आत्म्याला । शांति देवो ॥ ७९ ॥
लिंगोपंत निघोन गेले । रावजी कर्ते झाले ।
गणपती वरी खेळ खेळे । मनीं ध्यायी श्रीगुरु ॥ ८० ॥
गुरु शोधायाकारणें । शीघ्रचि गृह त्यागणें ।
सार्थक अन्य साधनें । होणार नाहीं ॥ ८१ ॥
व्रतबंध शुभवेळीं । मातापित्यांची आज्ञा झाली ।
करोनि गुरुसेवा वहिली । विद्या तुवां शिकावी ॥ ८२ ॥
भिक्षा मागोनि उदरपूर्ति । अखंड धरावी शांति ।
ब्रह्मचर्य पाळोनि क्षतीं । विचरावें सकळ ॥ ८३ ॥
ऐशा आज्ञेची पूर्तता । झाली नसे तत्त्वतां ।
तीच मानोनि आतां । सांग करावी ॥ ८४ ॥
आधी उपजत ज्ञान । वेदशास्त्र निमित्त जाण ।
पुधील कार्या अनुलक्षून । निश्चय केला जाण्याचा ॥ ८५ ॥
द्वादश वर्षांचे वय । क्रीडासक्तीचा समय ।
परि वैराग्यउदय । दृढ झाला ॥ ८६ ॥
तिथि वार निश्चित केला । प्रातःकालीं उठोनि गेला ।
सोबती धांवले साह्याला । मागील दोघे ॥ ८७ ॥
गुरुभेटीची आर्त । धरूनि चालिले वनांत ।
तोडिली मायेची मात । दुर्जय दुर्निवार ॥ ८८ ॥
सरिता-सागर संगम । समरसें पावेल विश्राम ।
श्रवण केलिया हरती श्रम । भाविकांचे ॥ ८९ ॥
पुढील अध्यायीं ऐसी कथा । सद्‍गुरु होईल बोलविता ।
वत्स धेनूसी पितां । गळती सेवूं ॥ ९० ॥
इति श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९१ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाद्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥