बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (17:08 IST)

श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय पाचवा

॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥
अध्याय पाचवा
समास पहिला
 
तपें तोषला सद्‌गुरु ज्ञानियांचा । वदे वाढवीं पंथ या राघवाचा ॥
कलीमाजिं मंदावली धर्मभक्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ५ ॥
 
जयजय सद्‍गुरु परंपरा । वंदन करूं जोडोनि करां ।
मुमुक्षुजनां आसता । उपकार किती वानावे ॥ १ ॥
भूमिस्थित गुप्त ठेवा । वरी बैसोन नसे ठावा ।
आयता काठोनि हातीं द्यावा । ऐसें केलें ॥ २ ॥
अज्ञान भरलें शीत । अंग थरथरां कांपत ।
कटकटा वाजती दंत । मायामोहें ॥ ३ ॥
ज्ञानाग्निस्फुल्लिंग चेतविले । प्रगट करोनि दाविलें ।
शीत वारोनि सुखी केलें । बहुतांसी ॥ ४ ॥
पूर्वप्राप्त निधान । जवळी असोनि चुकलें जाण ।
आड पाडिले झांकण । सगुणत्वाचें ॥ ५ ॥
सगुणींच दाविलें निर्गुण । भ्रमाचें फेकोनि झांकण ।
सक्षात्कारें समाधान । दिधलें तुम्हीं ॥ ६ ॥
दया उपजोनि पोटीं । ईश्वरें मानवहितासाठीं ।
दिधली जी निधानपेटी । तुमचे हातीं ॥ ७ ॥
जतन करोनि ठेविली । प्राणापरिस सांभाळिली ।
बहुतांचे उपेगा आली । भवदारिद्र्य हरावया ॥ ८ ॥
जें शिवें आदरिलें । जहर विष शमविलें ।
नित्य समाधान लाभलें । चिंतनें जयाच्या ॥ ९ ॥
कितीएक जीवन्मुक्त झाले । देहीं असोनि विदेही बनले ।
कोणी राम होवोनि गेले । सायुज्यासी ॥ १० ॥
भक्तपणें विभक्त कोणी । राहिले सुखें सुखावोनि ।
कोणी नामरूप विसरोनि । चैतन्यचि जाहले ॥ ११ ॥
कित्येक ते विरक्त । जगीं वर्तती पिशाचवत् ।
कदापि न लागों देती अंत । कोणासही ॥ १२ ॥
कोणी झाले ब्रह्मवेत्ते । देव वंदिती जयांते ।
अभिमानरहित क्रोधापरते । दयाशांतेचे पुतळे ॥ १३ ॥
कोणी झाले सत्ताधारी । दुर्जन पळविले दुरी ।
सज्जनांचे साह्यकारी । होवोनि गेले ॥ १४ ॥
कोणी रामभक्तीची गुढी । उभारिली दोहीं थडी ।
इहपर स्वानंदगोडी । चाखिली सहज ॥ १५ ॥
कोणी लिहिलें अध्यात्म । गुह्यातीत गुह्य परम ।
तरोनि गेले बहु दुर्गम । भवसिंधु श्रवणमननें ॥ १६ ॥
कोणी ब्रह्मानंदीं निमग्न झाले । ब्रह्मचर्य आदरें पाळिले ।
षडूर्मींचे हवन केले । शांतिकुंडी> ॥ १७ ॥
ऐसे तरले कितीएक । तरती, तरतील अनेक ।
जें चिंतनीय वासनाच्छेदक । परमसार ॥ १८ ॥
तेंचि दिधलें दीनाहातीं । जेणें घडे अनन्यभक्ती ।
तन्मयता चित्तशांती । प्राप्त होय ॥ १९ ॥
कैसें करणीचें लाघव । मावळविती समूळ माव ।
मीपणासी नुरे ठाव । द्विअतभाव हरोनी ॥ २० ॥
जेथें वेद मंदावे । शास्तांचे विचार थकले ।
उपनिषदें घुसळोनि पाहिलें । तरी वेगळें दिसेना ॥ २१ ॥
ऐसा तो स्वानंदघन । सच्छिष्या दिधला जाण ।
पतित केले पावन । दयादृष्टी ॥ २२ ॥
तयासी करोनि वंदन । पंचमाध्याचें विवरण ।
जें असे अत्यंत गहन । तें बोलूं गुरुकृपें ॥ २३ ॥
चतुर्थाध्यायाचे अंती । गुरुसेवा केली जी ती ।
परिसतां वाढे गुरुभक्ती । भाविकांची ॥ २४ ॥
पंचमी सहजानंद । गुरुशिष्या ऐक्यपद ।
जगदुद्धाराचा अनुवाद । पडेल श्रवणी ॥ २५ ॥
असो चालली अखंड सेवा । सत्संगतीचा सेविती मेवा ।
विषयोर्मींचा सुटला गोवा । सहजसमाधि बाणली ॥ २६ ॥
पाहुनियां साधनस्थिति । सद्‍गुरु संतुष्ट होती ।
मग जीवींचे गुह्य कथिती । ज्ञानदृष्टि चेवोनि ॥ २७ ॥
मतकींची ऊ काढोनि । हातीं दिधली तयांनी ।
श्रीरामा वसिष्ठांनीं । दिधले तेंचि तुज देतो ॥ २८ ॥
पुरपि काढोनि एक । हातीं देती देख ।
सांदिपनें यदुनायक । बोधिलें तेंचि घेईं बा ॥ २९ ॥
विकल्प विचार न करितां गुरुप्रसाद वंदिला माथां ।
संतुष्ट झाला गुरुदाता । अनन्यभाव पाहोनी ॥ ३० ॥
विवेकयुक्त वैराग्य । साधन साधी अव्यंग ।
ऐसा सच्छिष्य सभाग्य । मिळतां गुरु संतोषे ॥ ३१ ॥
जो आळसा न देईं अंग । गुरुवचनीं श्रद्धा चांग ।
गुरुकृपा व्हावया मग । उशीर नाहीं ॥ ३२ ॥
गुरुवचनीं विकल्प धरी । तो शिष्य नव्हे, आपुला वैरी ।
क्षीर टाकोनि करी । मदिरापान जैसा ॥ ३३ ॥
गुरूचें जाणे अंतर । ऐसा दुर्लभ नर ।
जो पावे पैलपार । ऐसा विरळा ॥ ३४ ॥
बहुतेकीं गुरु केले । म्हणती गुरुमुख पाहिजे झालें ।
ऐसें वेदशास्त बोलिलें । ठायीं ठायीं ॥ ३५ ॥
जन्मा आलियाचें सार्थक , एकदां करावें गुरुमुख ।
लौकिक व्यवहार मानिती देख । तेही गुरुभक्त म्हणविती ॥ ३६ ॥
कोणी म्हणती गुरु करावा । म्हणजे प्रपंच चाले बरवा ।
संकटकालीं आठवावा । म्हणजें बरें ॥ ३७ ॥
कित्येक गुरु केला । अनन्य शरण नाहीं गेला ।
सेवा अक्रितां लाजला । तोही शिष्य म्हणवीतसे ॥ ३८ ॥
कित्येक गुरूसी वंचिती । प्रसंगें सेवा न करिती ।
प्राणासवें रक्षिती । आपुलें धन ॥ ३९ ॥
कोणी म्हणती हा गोसावी । कारणिक संगति करावी ।
नाहीं तरी कुळाची थोरवी । जाईल आमुची ॥ ४० ॥
कोणी म्हणती हा भाग्यवंत । याचे संगें राहतां नित्य ।
मिष्टान्नें सेवितां तृप्त । होऊं आम्ही ॥ ४१ ॥
कित्येक म्हणवाया संत । गुरु करिती त्वरित ।
झालों आतां पुनीत । पूर्ण ज्ञानी ॥ ४२ ॥
गुरुभक्तीचे नांवाखाली । कित्येकीं दुष्कर्में झांकिली ।
अद्वैताची बोलती बोली । म्हणती आम्ही परमहंस ॥ ४३ ॥
स्वानुमतें मुक्त झाले । आणि संदेहचक्रीं भ्रमले ।
भ्रष्टाकारें कुडे झाले । कितीएक ॥ ४४ ॥
निर्हेतुक गुरुभक्ति । निर्विकल्प ज्यांचि वृत्ति ।
आवडी सतीसी पती । जेवीं तैसी ॥ ४५ ॥
सर्वस्व अर्पिले गुरूसी । तोचि अधिकारी मोक्षासी ।
लाजवी महासिद्धीसी । सिद्धपुरुष ॥ ४६ ॥
गुरुचें करितां गुणश्रवण । सर्वेंद्रियांचे करी कान ।
जैसा चातक घे झेलोन । मेघोदक ॥ ४७ ॥
काळवेळ जाणवेना । श्रवणीं आवडी लागली मना ।
अखंड चालवी भजना । गुरुगुणासी ॥ ४८ ॥
तैसे गुण वर्णितां । न पुरे शब्दव्युत्पन्नता ।
वाक्इंद्रिय श्रमता । नेत्रेंद्रिय पाझरे ॥ ४९ ॥
गुरूचें घेतां नाम । अंतरीं पावे विश्राम ।
म्हणे धन्य कुळ धन्य जन्म । ऐसें पद पावलों ॥ ५० ॥
देहाचें करोनि पोतेरें । सारवी स्वामीचीं मंदिरें ।
इंद्रियें उपकरणीं सुंदरे । पीक धरी हस्तकीं ॥ ५१ ॥
गुरुवांचोनि नसे काज । न धरी लोकलाज ।
अधिक सेवा मागें व्याज । सद्‍गुरुपासी ॥ ५२ ॥
गुरु जेथोनि चालले । तया धुळीसही वंदिलें ।
धन्य इचें भाग्य उदेले । चरण वाहिले मस्तकी ॥ ५३ ॥
सकलां गुरुरूप पाहे । आणि नम्र होत आहे ।
जैसा धनलोभी चिंतित राहे । धनागार ॥ ५४ ॥
गुरुसेवीसी तत्पर । आळस ओळखी सांडिली दूर ।
क्षुत्पिपासेचा विसर । चरणीं देह अर्पिला ॥ ५५ ॥
जैसा रवि अहोरात्र । निरालस्य चालवी सूत्र ।
न लागे अन्नवस्त्र । अथवा स्तुतीही वांछिना ॥ ५६ ॥
तैसा सतत सेवा करी । न म्हणे उणी पुरी ।
तनु झिजवी चंदनापरी । अहंता नसे अंतरी ॥ ५७ ॥
सेवेची तन्मयता ऐसी । जें जें लागेल गुरूसी ।
आधींच समजे सच्छिष्यासी । तैसी सामग्री करितसे ॥ ५८ ॥
गुरूसी तृषा लागेल पुढें । पूर्वींच जाणे शिष्य रोकडें ।
पात्र भरोनि करी पुढें । ऐसीं एकाग्रलक्षणें ॥ ५९ ॥
गुरुहूनि निजसखा । दुजा न देखे जो कां ।
गुरुभक्त एकमेकां । भेटतां द्वैत न वाटे ॥ ६० ॥
माय एक गुरुमाय । पिता गुरुचि होय ।
गणगोत गुरुराय । सोय जाणते हिताची ॥ ६१ ॥
चित्त चिंतनीं झिजे । देहासक्ति सेवें बुझे ।
वंदनें अहंकार लाजे । गुरुपुत्रासन्निध जावया ॥ ६२ ॥
अर्चने घडे विषयत्याग । आज्ञा प्रमाण लय अभंग ।
ऐसिया भक्तीनें आत्मयोग । सहजासहजीं घडतसे ॥ ६३ ॥
करितां सप्रेम गुरुभक्ति । सहजीं प्रकाशे ज्योति ।
गुरुभक्त ते जाणती । इतर करिती कुतर्क ॥ ६४ ॥
मातीचा केला द्रोण । निर्विकल्प सेविला गहन ।
न शिकवितां झालें ज्ञान भिल्लासी पहा प्रत्यक्ष ॥ ६५ ॥
सेवा चालली अढळ । संतोषले दीनदयाळ ।
कृपामृताचा खळाळ । लोटला पूर ॥ ६६ ॥
शिष्य वैराग्यें उदास । आणि गुरुवचनीं विश्वास ।
अनन्य शरण आलियास । सद्‍गुरुकृपा वोळतसे ॥ ६७ ॥
गणपति कृपापात्र जाहला । परि पाहिजे परीक्षिला ।
कसवटी पूर्ण उतरला । तरीच श्लाघ्य ॥ ६८ ॥
म्हणोनि एके दिनीं । बैसले सहज सिद्धासनी ।
बोलती शिष्यालागोनि पानें तोडीं वडाचीं ॥ ६९ ॥
गुरुआज्ञा मानोनि शिरीं । शिष्य चढे वृक्षवरी ॥
पर्णें तोडोनिया करीं । भूमीवरी टाकितसे ॥ ७० ॥
ऐसा चालिला क्रम । चीक वाहे तळीं परम ।
तंव बोलती तुकाराम । वृक्षा दुःख देऊं नको ॥ ७१ ॥
अरे हें रुधिर स्रवतें । तरी पर्णें लावीं जेथींची तेथें ।
ऐकोनियां वचनातें । पर्णें सर्व जमविली ॥ ७२ ॥
जेथून तोडिलें पान । तेथें लावी नेवोन ।
तत्काळ जाय मिळोन । पूर्वीं होतें गैसेंचि ॥ ७३ ॥
न धरीं मनीं विकल्प । न करी 'हो ना' जल्प ।
वचन प्रमाण हा संकल्प । बाणोनि गेला ॥ ७४ ॥
वृक्ष पूर्ववत् झाला । सद्‍गुरु मनीं संतोषला ।
म्हणे शिष्य भला भला । चैतन्याचा अधिकारी ॥ ७५ ॥
असिई कठिण आज्ञा करिती । कैं दुरुत्तरेंही बोलती ।
कैं धन्य धन्य म्हणोनि गाती । विषाद अहंकार उठेना ॥ ७६ ॥
एकदां मोळी उंसाची । दोघां दोचौघां न हालेचि ।
मस्तकीं देवोनि त्वरेंचि । चलविती निजपंथें ॥ ७७ ॥
धांवती योजन योजन पयंत । मागुतीं शिष्य धांवत ।
मग ऊम्स समस्त । फेंकून देती चहूं दिशां ॥ ७८ ॥
परि निष्कारण देती त्रास । ऐसा न ये किंतु जयास ।
सेवा घेती हेंचि विशेष । म्हणोनि हर्ष मानी ॥ ७९ ॥
गुरुसेवा सतत घडो । चित्त सेवेमाजीं जडो ।
आळस गिरिकंदरी दडो । ऐसें भावी ॥ ८० ॥
कैं अंधारीं फिरविती । सर्पविंचूसी धरविती ।
अंतःस्थिति पाहती । नाना प्रकारें ॥ ८१ ॥
ऐसाचि एक प्रसंग पुढें वर्णूं यथासांग ।
श्रवण करितां अव्यंग । गुरुसेवा कळॊं ये ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते पंचमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय पाचवा
समास दुसरा
 
एकदां ओहोळ तटाकांत । बैसले तुकाराम संत ।
सन्निध उभा राजीवसुत । करद्वय जोडोनिया ॥ १ ॥
तंव तेथें लहान बालकें । क्रीडा करिती कौतुकें ।
तुकाराम वदती इतुकें । खड्डा एक काढीं बा ॥ २ ॥
परिसोनियां वचनाप्रति । खड्डा काढिती शीघ्रगती ।
तुकाईनें बालकें हातीं । धरूनि आणिलीं त्या ठायीं ॥ ३ ॥
तीन्ही पोरें खड्ड्यांत । घालोनि वरि वाळून दडपित ।
लीलानाटकी हे संत । काय करिती न कळेचि ॥ ४ ॥
जयांची कर्तुमकर्तुम् शक्ति । ते अन्यथाही करूं शकती ।
शिष्या वरी बैसविती । सिद्धासन घालोनि ॥ ५ ॥
म्हणती कोणासवें न बोलावें । आणि आसनही न त्यगावें ।
ऐसें सांगोन सहजभावें । दूर जावोन बैसले ॥ ६ ॥
सजीव बालकें गोमटीं । पुरविली धरणीचे पोटीं ।
तरी विकल्पकुतर्कगोष्टी । नाठवे सच्छिष्यासी ॥ ७ ॥
सद्‍गुरु त्रिभुवननायक । दयासागर भरले एक ।
मनीं ठसलें ज्या निःशंक । तया विकल्प नाठवे ॥ ८ ॥
देह चरणीं अर्पिला । तेचि वेळीं अभिमान सांडिला ।
सुखदुःख नाठवे चित्ताला । देहजनित विकार ॥ ९ ॥
असो तेथें त्या वेळीं घरची मंडळी शोधूं आलीं ।
म्हणती पोरें कोठें गेली । खेळत होतीं आतांचि ॥ १० ॥
शोधशोधूनि थकले । गणपतीसी पुसूं लागले ।
कोठें चुकलीं आमुची मुलें । तुम्ही देखिलीं कीं नाहीं ॥ ११ ॥
तो न बोलेचि कांही । गुरुआज्ञा मानूनि हृदयीं ।
तंव पाहिली तुकाई । धांवून चरण वंदिले ॥ १२ ॥
मग तुकाईस विनवीत । बालकें चुकलीं निभ्रांत ।
तेणें उद्विग्न झालें चित्त । कांही समाचार सांगावा ॥ १३ ॥
ते वदती तेथें बैसला बुवा । त्यासी समाचार पुसावा ।
न बोले तरी झोडावा । निष्ठूरपणें ॥ १४ ॥
मज वाटतें खचित । यानें केला बाळघात ।
याची करणी अघटित । कोणासही न कळे ॥ १५ ॥
ऐकतांचि ऐसे वचन । धांवले ते क्रोधायमान ।
दांभिका धरिलेंसि मौन । बाळघातक्या निष्ठुरा ॥ १६ ॥
तरी तो कांहीच न बोले । तेणें ते अधिक संतापले ।
लथा बुक्या दंड मारिले । कितीयेक ॥ १७ ॥
मारोनियां थकले बहुत । परि प्रत्युत्तर न मिळत ।
बोलती तुकाराम संत । यासी दूर ढकलावे ॥ १८ ॥
करणी करोति निशाचरी । पोरें पुरोनि बैसला वरी ।
वाळू काढावी सत्वरी । म्हणजे प्रत्यक्ष कळेल ॥ १९ ॥
वाळू काढिली सत्वरेंसी । पाहते जाहले बाळकांसी ।
शोक करिती अतिशयेंसी । पुन्हा मारूं धांवले ॥ २० ॥
मारिती झोडिती पाडिती । नाना दुरुत्तरें बोलती ।
सद्‍गुरु दुरोनि पाहती । अंतरीं आनंद उमाळे ॥ २१ ॥
धन्य शिष्यशिरोमणि । सत्त्वाची ही केवळ खाणी ।
देहभाव सांडोनि । चैतन्यरूपीं निमाला ॥ २२ ॥
समस्त जनां निवारिलें । तुमचें बालकां काय झालें ।
अमृतदृष्टीनें पाहिलें । तंव उठोन बैसलीं ॥ २३ ॥
शय्येवरोनि निजोन उठती । तैसीं उठली शीघ्रगती ।
पाहोनि विस्मय चित्तीं । न समाये जनांच्या ॥ २४ ॥
तंव तुकाराम सद्‍गुरुमाऊली । शिष्यासमीप धांवली ।
कवटाळी हृदयकमळीं । मस्तकीं ठेवी वरदहस्त ॥ २५ ॥
सद्‍गुरुकृपामृत स्रवलें । ज्ञानाज्ञान विरालें ।
अमृतमय होऊन राहिलें । अंतर्बाह्य ॥ २६ ॥
आधीं इंद्रियें अंतर्मुख झालीं । स्थूललिंगची वृत्ति उडाली ।
त्रिगुणेंसी आटली । भूतांसहित ॥ २७
॥ महाकारण तुर्या अवस्था । शब्दब्रह्मीं रिघालीं तत्वतां ।
अहंब्रह्माची स्फुरणता । सोऽहंसह मावळली ॥ २८ ॥
उरला आदिचिदानंद । मावळलें मायाभासद्वंद्व ।
जें नोहेचि प्रतिपाद्य्य । वेश्रुतींसी ॥ २९ ॥
चौदेहातीत झाला । मरणा मारोनि उरला ।
आदिमध्यान्त संचला । एक आत्मा ॥ ३० ॥
महामाया गुणमाया । मूळमाया जाय विलया ।
असोनि नुरली काया । ब्रह्मचैतन्यता बाणली ॥ ३१ ॥
अलंकार अनेक भासले । सुवर्णत्वें एकचि झाले ।
तैसें जग अनंत नटलें । मिमलज्ञानें ब्रह्म एक ॥ ३२ ॥
लेखना वाचना अवकाश । तेथें नलगे निमिष ।
द्वैतभावना निःशेष । उडोनि होय तादात्म्य ॥ ३३ ॥
ऐशिया आनंदसागरांत । सद्‍गुरु सच्छिष्य नांदत ।
तेथील एक बिंदु प्राप्त । अनंत सुकृतें होईल ॥ ३४ ॥
गुरुशिष्याची भावना । समूळ उडाली कामना ।
स्वस्वरूपीं लीन जाणा । एकरूप जाहले ॥ ३५ ॥
जैसें काष्ठ अग्नीप्रति । भेटतां होतसे अग्निमूर्ति ।
तैसा शिष्य गुरुप्रति । भेटतां झाला गुरुरूप ॥ ३६ ॥
सरिता सागरा मिळाली । सागररूपें पैसावली ।
अथवा लवण उदक भेट जाहली । संचले एकरूप ॥ ३७ ॥
तैसें द्वैताद्वैतातीत ब्रह्म । चैतन्य प्रकाशलें परम ।
यास्तव ब्रह्मचैतन्य हें नाम । तिकाईनें संबोधिलें ॥ ३८ ॥
ऐसी झाली स्थिति । शब्दीं न वर्णवे निगुती ।
निःशब्दीं शब्दव्युत्पत्ति । चालेल कैसी ॥ ३९ ॥
स्तवनाची आर्त उपजली मोठी । परि मंद बुद्धि मराठी ।
न सुचे तेव्हां दिठी । सद्‍गुरुपदीं ठेविली ॥ ४० ॥
ब्रह्मचैतन्य गुरुमाय । जी दीन अनाथांची सोय ।
जैसी वत्सालागीं गाय । तैसी आम्हां पान्हवली ॥ ४१ ॥
उभयतां आनंदें भेटती । जन समस्त पाहती ।
म्हणती साधूची कृति । ब्रह्मादिकां नेणवे ॥ ४२ ॥
व्यर्थ साधूसी छळिले । धाय मोकलोन र्तडूं लागले ।
तुकाईनें समाधान केलें । सकळैकांचे ॥ ४३ ॥
तुकाराम ब्रह्मचैतन्य । उभयतां झाले अनन्य ।
संवाद झाला गहन । स्थिरचित्तें परिसावा ॥ ४४ ॥
॥ इति श्रीसद्गुलीलामृते पंचमाध्यांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय पाचवा
समास तिसरा
 
श्रीगुरु वदती शिष्यासी । धन्य धन्य तेजोराशी ।
सांग सेवा झाली तुजसी । आज्ञापितों तें ऐकावें ॥ १ ॥
कलि जाहला उन्मत्त । अधर्म माजला समस्त ।
न सुचे निताहित । जीवमात्रांसी ॥ २ ॥
खर्याच।एन खोटें भास्ते । खोटें सत्यत्वें उठतें ।
कल्पनातरंग नाना मतें । भूमंडळीं पैसावली ॥ ३ ॥
कर्माधिकारी ब्राह्मण । कर्महीन झाले दीन ।
विपरीत संगती गहन । बुद्धि विपरीत जाहली ॥ ४ ॥
आचारभ्रष्ट स्थानभ्रष्ट । अधिकारभ्रष्ट बुद्धिभ्रष्ट ।
देहसुखाची हांव नश्ट । लागली मागें ॥ ५ ॥
जितुकी देहाची हांव धरिली । तितुकी क्षीणता आली ।
शतकाची पन्नाशी झाली । वयसीमा ॥ ६ ॥
देहधर्त्यासी ओळखितां । देहाची कायसी चिंता ।
शीर सलामत आतां । पगड्या बहुत जमतील ॥ ७ ॥
एवं देहसुखावांचून कांही । सर्वथा कार्य उरले नाही ।
नाशिवंत सुखें समाधान कांही । चित्ताचें होईना ॥ ८ ॥
जैसी रोहिणीमाव । तैसी धरली हांव ।
घटोत्कच-दुकानींचा भाव । पाहून हर्ष वाटतो ॥ ९ ॥
देहसुखासी भुलले । शाश्वत टाकोनि धांवले ।
नाशिवंतानेंही पोळले । मग धांवाधांव आरंभिली ॥ १० ॥
न पाहती कुलगोत । आचार विचार वेदप्रणीत ।
वेदांसीच मूर्ख म्हणत । जुनें टाकून नवे घ्यावें ॥ ११ ॥
धर्माधर्म नीतिन्याय । उपाय करितां अपाय ।
देह हेंचि मानूनि ध्येय । आत्मज्ञान विस्रले ॥ १२ ॥
तेणें अत्यंत दीन झाले । स्वसत्तेंते मुकले ।
वंदनेअधीन झाले । ध्र्म सांडिला अनेकी ॥ १३ ॥
सुख राहिलें एकीकडे । धुंडाळिती भलतीकडे ।
मृग जैसा वावडे । कस्तुरीकारणें ॥ १४ ॥
सर्व सुखाचे आगर । सोडोनि धांवला दूर दूर ।
तेणे उपाय तें अपाय थोर । होऊं लागला ॥ १५ ॥
आत्मानुसंधानावांचोनि । नैष्कर्म्य बोधी शब्दज्ञानी ।
आचार्य समर्थांची करणी । ध्यानीं न ये ॥ १६ ॥
कालचक्राचें कौतुक । भजन वाटे निरर्थक ।
तेणें व्याकुळ होती लोक । दिवसेंदिवस ॥ १७ ॥
अहो या भजनानें काय होतें । ऐसें पुसती जाणते ।
परी चित्तशुद्धीसी भजनापुअर्तें । साधन नाहीं ॥ १८ ॥
शब्दज्ञानें वेडावलें । अनुभवाविण कुडे झाले ।
प्रवृत्तिज्ञान म्हणतीं भलें । विषयसुख वांछिती ॥ १९ ॥
नरदेहाचा मुख्य धर्म । आत्मोन्नतीचें जाणावें वर्म ।
तदनुरोधें क्रियाकर्म । करीत असावें ॥ २० ॥
ती दृष्टी विसरली । देहबुद्धि दृढ झाली ।
तेणें अधर्मी प्रवर्तली । दृष्टी सर्व ॥ २१ ॥
वेद शास्त्रें पुराणें । उपनिषदें संतवचनें ।
उपहासिती, आणि शहाणे । म्हणती आम्ही ॥ २२ ॥
पुराणांतरींच्या कथा । असत्य काल्पनिक सर्वथा ।
वाटों लागल्या चित्ता । कलिधर्में ॥ २३ ॥
हा फिरला काळ । तेणें संतांचा पडला दुष्काळ ।
नास्तिकां झाला सुकाळ । अवनीवरी ॥ २४ ॥
तयांमाजी जे भाविक । त्यांसी नसे मार्गदर्शक ।
तेणें सत्यास्त्यविवेक । न सुचे अल्पही ॥ २५ ॥
तयां तुवां बोधावे । नास्तिकां सुपंथा लाववें ।
रामनाम वाढवावें । भूमंडळीं ॥ २६ ॥
कामिकांचे पुरवोनि काम । त्यांसी लावावें भजनी प्रेम ।
कालानुरूप साधन सुगम । उरलें नाहीं आणिक ॥ २७ ॥
आतां जगदुद्धाराकारणें । तुवां जनीं कार्य करणें ।
हे गुरुआज्ञा मानणें वाढवीं भक्ति ॥ २८ ॥
आज्ञा वंदिली मस्तकी । मूर्ति ठेविलीं हृदयमंचकीं ।
गुरुशिष्यां झाली एकी । विरला द्वतभाव ॥ २९ ॥
वंदोनि श्रीगुरूचीं पाउलें । ब्रह्मचैतन्य सद्‍गुरु निघाले ।
प्रथम नैमिष्यारण्यीं गेले । एकांतवास कराया ॥ ३० ॥
वेदधर्म हातीं आलें । अज्ञेय कांही न उरलें ।
योगाभ्यासें दंडण केलें । सगुणदेहाचें ॥ ३१ ॥
देह अत्यंत हलका झाला । आणि तेजें ओथंबला ।
वाटे दुजा कपि आला । उड्डाण करी वृक्षाग्री ॥ ३२ ॥
गुरुसेवा झाली नवमास । पुढें गेले कांही दिवस ।
तोंवरी नऊ संवत्सरास । गृहत्यागासी जाहले ॥ ३३ ॥
गीता रावजी वृद्ध झाले । शोधशोधूनि थकले ।
साधुबैरागी जे भेतले । पुसती त्यांसी पुत्रवार्ता ॥ ३४ ॥
चातक करी मेधआशा । तैसी झाली त्यांची दशा ।
करुणा भाकिती जगदीशा । पुत्र भेटवीं आम्हांते ॥ ३५ ॥
स्नेही सोप्बती विसरोनि जाती । परि मायबाप सर्वदा चिंतिती ।
भार्या पतिव्रता स्ती । तीही सदा ध्यातसे ॥ ३६ ॥
ऐसी आतां इकडील स्थिति । तिकडे सद्‍गुरु मनीं ध्याती ।
आतां जावें गृहाप्रति । मायदर्शनाकारणें ॥ ३७ ॥
गुरुप्राप्तीकारणें जन्मदात्या दुःख देणें ।
घडलें या मायागुणें । निरुपाय तेथे ॥ ३८ ॥
गृही जाण्याचा धरला हेत । श्रीगुरु वैरागीवेष घेत ।
जटा वळल्या समस्त । अंगी विभूती चर्चिली ॥ ३९ ॥
कटीं बांधिला कसोटा । हातें घेती चिलीम चिमटा ।
बैरागी शोभला गोमटा । तेजःपुंज ॥ ४० ॥
तीर्थें क्षेत्रें करीत । स्वामी निघाले गृहाप्रत ।
मार्गीं घेतले सांगात । वैरागी चार ॥ ४१ ॥
पाहतां गुरूंचे मुखाकडे । तत्काळ लीनता जोडे ।
दिस्ती हे साधु गाढे । पोटभरू नव्हेती ॥ ४२ ॥
मार्गीं अनंत शरण येती । शिचा सामग्री अर्पिती ।
मुक्काम करीत गुरुमूर्ति । गोंदावलेस पावली ॥ ४३ ॥
कोणा न देती ओळख । दुरून पाहती कौतुक ।
टकमका पाहती लोक । वैराग्यासी ॥ ४४ ॥
मारुतीचे मंदिरांत । ठाण मांडिती गुरुनाथ ।
समीप अगटी धगधगीत । केली असे ॥ ४५ ॥
दुरोनि देखती मायचरण । आणि पाहती पितृवदन ।
मनींच करोनि वंदन ।देवालयीं बैसले ॥ ४६ ॥
दर्शन घेतां प्रेम उठे । परि ओळख कोणा न पटे ।
सद्‍गुरु जाणती गोमटे । समस्तांसी ॥ ४७ ॥
असो जेव्हां झाली निशा । ग्रामीं होता तमाशा ।
जो प्रत्यक्ष यमफांसा । पडला सर्वांवरी ॥ ४८ ॥
जमले सकळ गांववेडे । खदखदा वासती दंताडें ।
श्वान जैसा चघळी हाडें । गोडी ना रस ॥ ४९ ॥
दाजी पाटील गांवकर । आणि अण्णा वारसवडेकर ।
उभयतां देखोनि गुरुवर । म्हणती कोठील बैरागी ॥ ५० ॥
हिरवा तमाखू मुळेल । म्हणोनि गेले ते जवळ ।
गोष्टी करिती प्रांजळ । कोण कोठील म्हणोनि ॥ ५१ ॥
बोलतां उभयतां संबंध आला । गणूबुवा खचित गमला ।
खूण पाहती कान जो तुटला । बाळपणीं ॥ ५२ ॥
परि ओळख न देती । मनीं हर्ष मानिती ।
रजनी सरलिया प्रभातीं । म्हणती समस्तां । कळवूं हे ॥ ५३ ॥
त्यांई ऐसा बेत केला । श्रींनी अंतर्ज्ञानें जाणला ।
उठोन पहांटसमयाला । गेले निघोनि श्वशुरग्रामीं ॥ ५४ ॥
तेथेंही हनुमान मंदिरांत बुवा जाणोनि तळ देत ।
दर्शना अनेक जन येत । सिद्ध पुरुष जाणोनी ॥ ५५ ॥
पाहूनिया तेज शांति । पूज्यभाव उपजें चित्तीं ।
संसारी अनेक प्रश्न करिती । कायाव्याधी पीडितसे ॥ ५६ ॥
कोणा सांगती रामनाम । कोणा प्रदक्षिणेचा नियम ।
कोणा औषधी सुगम । सांगते झाले तेधवां ॥ ५७ ॥
खातवळीं पसरली मात । मारुतीचे मंदिरांत ।
कोणी आले महंत । त्रिकालज्ञानी ॥ ५८ ॥
श्रीगुरूंचे श्वशुरगृहीं । चिंता करतीं प्रत्यही ।
कधीं येईल जांवई । परतोनि गृहातें ॥ ५९ ॥
सासूसी कानगी कळली । कन्येसह दर्शना गेली ।
गर्दी जाईतों उभी ठेली । मग करी वंदन ॥ ६० ॥
स्वामीं एक विनवणी ।कन्येचा गेला घरधनी ।
कोठें गृह त्यागोनि । मागुता केव्हां येईल ॥ ६१ ॥
रात्र।ंदिन वाटे चिंता । कन्या प्रौढ झाली आतां ।
पति केव्हां येईल मागुता । सांगा स्वामी ॥ ६२ ॥
श्रीगुरु बोलती वचन । अखंड केलिया नामस्मरण ।
त्वरित येईल परतोन । चित्तीं चिंता न करावी ॥ ६३ ॥
बोलोनि ऐसीं उत्तरें । किरीक्षिती ते अंतरें ।
आचारनीति शोधिती सारें । ओळख न देती आपुली ॥ ६४ ॥
पाहिली गोंदावलीची स्थिति । तैसीच येथीलही पाहती ।
पुढें गेले डांबेवाडिप्रति। चुलत भगिनीसी भेटाया ॥ ६५ ॥
दारी जाऊनि 'रघुवीर' । ऐसा केला उच्च गजर ।
'भीमाताई भिक्षा सत्वर । आणुनिया घालावी' ॥ ६६ ॥
ऐसा शब्द पडतां कानीं । भीमा दचकली मनीं ।
गोसावी कोण मजलागोनि । नामें हांका मारित ॥ ६७ ॥
बाहेर येवोनि पाहात । ओळखी कांही न लागत ।
परि आनंदलें चित्त । उगाच पाहे मुखाकडे ॥ ६८ ॥
दिव्य रूप भव्य मूर्ति । मस्तकीं जटा शोभती ।
कौपीनधारी आणि विभूति । सर्वांगासी चर्चिलीसे ॥ ६९ ॥
सद्‍गुरु वदती 'भीमाताई । सासरी तल्लीन झालीस बाई ।
ओळखी सांडिली सर्वही । माहेरघरची' ॥ ७० ॥
इतुकें परिसतां सत्वरी । गणू म्हणूनि हांक मारी ।
आनंदे नयनीं नीर धरी । गुण आठवी बाळपणींचे ॥ ७१ ॥
'कासया झालासि निष्ठूर । सोडून गेलास घरदार ।
दुखविलें सर्वांचे अंतर । काय साधिलें सांग बा; ॥ ७२ ॥
येरु वदे साधिले नाहीं । ऐसी वस्तूच नसे कांही ।
असो, आज्ञा देई लवलाहीं । मज जाणें असे बहु दूर ॥ ७३ ॥
कोणा सांगू नये वार्ता । गणपति येथें आला होता ।
सत्वरे।एन येईल मागुता । सत्य सत्य जाणावें ॥ ७४ ॥
ऐसें बोलोनि सत्वर । निघाला तो योगेश्वर ।
भगिनी हांक मारी करुणास्वर । 'सत्वर येईं परतोनि' ॥ ७५ ॥
श्रीगुरु निघाले तेथून । तीर्थें क्षेत्रें करिती भ्रमण ।
सूक्ष्मपणें अवलोकून । जनस्थिति जाणति ॥ ७६ ॥
बहुतेक असती कामासक्त । आश्रमधर्मासि विरक्त ।
धनें विंधिलें चित्त । सर्वत्रांचे सारिखें ॥ ७७ ॥
वेद अतिथि साधुसंत । असत्य मानिती पौराणमत ।
हिंसाकर्मीं प्रवर्तत । वाग्जल्प वाढला ॥ ७८ ॥
राजसत्ता विधर्मी झाली । धर्मश्रद्धा उडाली ।
समाधानापासोनि ढळली । जनता सर्व ॥ ७९ ॥
नाना प्रापंचिक आपत्ती । अपार विघ्नें आदळती ।
बुद्धि आयुष्य शरीरसंपत्ती । विलया जात चालली ॥ ८० ॥
जितुक्या सुखसोई केल्या ।तितुक्या गरजा वाढल्या ।
देह पराधीन झाला । व्यसनीं अत्यंत नागवले ॥ ८१ ॥
जगच्चालक आत्माराम । विसरतां वृथाचि श्रम ।
कोठें न मिळे आराम , त्रिखंदही शोधिल्यां । ८२ ॥
काम्यकर्में कांही राहिली । नैष्कर्म्यभाव्ना उडाली ।
पातकांची सीमा झाली । व्यभिचारकर्म वाढलें ॥ ८३ ॥
सकळांसी भ्रष्टता आली । दैवी शक्ती अदृष्य झाली ।
तेणें श्रद्धा उडोनि गेली । देववेदसंतांवरची ॥ ८४ ॥
नास्तिक बनोनि सकळ । अनुभवहीन वाग्जाळ ।
घरोघरीं ब्रहसुकाळ । वैखरीवरी राहिला ॥ ८५ ॥
अनुभवाविण निर्गुण । श्रद्धेविना सगुण भजन ।
करितां नव्हे समाधान । कोणाएकाचें ॥ ८६ ॥
सगुणीं सायुज्यता घडे । तरीच निर्गुणज्ञान जोडे ।
श्रद्धा सगुणीं पवाडे । नवविधा भक्तिमार्गें ॥ ८७ ॥
कुलशील चित्तशुद्धि । परंपरागत धर्मबुद्धि ।
लया जातां वेदविधि । यथासांग घडेना ॥ ८८ ॥
दुर्धर कलि माजला । अधर्म बहु पैसावला ।
तरुणोपाव न उरला । प्राणियांसी ॥ ८९ ॥
यास्तव सुलभ रामभजनीं । लावावें श्रीगुरुवचनीं ।
ऐसें आणोनि ध्यानीं । विचरती महीवरी ॥ ९० ॥
इथि श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरुविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९१ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते पंचमाध्यायांतर्वतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति पञ्चमोऽध्यायः समाप्तः ॥