मल्हारी मार्तंड विजय अध्याय तिसरा
श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मनीं हरिध्यान केलें ॥ द्विज वैकुंठाप्रति गेले ॥ मूर्ति पाहोनी तोषले ॥ सिंहासनी विराजित ॥१॥
किरीटकुंडल सुहास्य वदन ॥ चतुर्भुज आकर्णनयन ॥ मूर्ति गोजरी मेघ वर्ण ॥ गळा माळा वैजयंती ॥२॥
नेसले पीतांबर ॥ जे झळके चिदांबर ॥ शंखचक्रगदाकर ॥ लखलखित शोभतसे ॥३॥
कपिल सिध्द नारद ॥ सनकादिक मुनिवृंद ॥ स्मरती मनीं गोविंद ॥ गरुड सन्मुख उभा असे ॥४॥
अप्सरा गायन करिती ॥ तेणें मुनिमानस हरिति ॥ असो धर्म पुत्र साती ॥ नमोनियां स्तवन केलें ॥५॥
हे नारायणा माधवा ॥ दीन वत्सला केशवा ॥ शरण आलों देवाधिदेवा ॥ प्रार्थना हे स्वीकारावी ॥६॥
मल्ल पीडितां गांजिलों ॥ तें शक्रासि निवेदलों ॥ तथा नाटोपे म्हणोनि आलों ॥ अनन्य भावें शरण तुज ॥७॥
ऐसें स्तवन ऐकोन ॥ मग बोले नारयण ॥ आम्हीं तुम्ही मिळोन ॥ कैलासाप्रति जाऊं ॥८॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥९॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां वैकुंठभिगमनोनाम तृतीयोऽध्याय गोड हा ॥३॥