सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (08:50 IST)

डिप्रेशन जाणवतेय...म्हणा "तारक मंत्र"

तारक मंत्रात फार ताकद आहे. ह्या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय, सर्वात पहिले लिहलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला, त्यानंतर अनेक लेख लिहले परंतु हा सर्वात आवडता लेख. 
 
सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे, तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा, चालता, बोलता, उठता बसता. या मंत्राची जादू, प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी, इतका अप्रतिम व तरूणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य, भारी, कमालच! 
 
डिप्रेस्ड वाटतंय म्हणा तारक मंत्र, कामं अडली आहेत म्हणा तारक मंत्र, एकाकी एकटं पडल्या सारखं वाटतंय म्हणा तारक मंत्र, रडू येतंय, उदास वाटतंय एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे "माझ्या स्वामींचा तारक मंत्र! उदाहरणं देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे "तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे, हे नक्की कळेल.  
 
मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलयं, हे मना तू निःशंक हो, निर्भय हो, स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज स्मर्तृगामी आहेत, त्यांना अशक्य काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ ही हात लावू शकत नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाच भितोस, हे भय पळू दे. स्वामी माऊली असतांना भय ते कसले? "
 
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा" !  हया ओळीतच सर्व काही आहे, कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो, मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते, हे फक्त आई झाल्यावरच समजते, मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. अब्ज आईच्या कोमल ह्रदयापासून त्या माऊलीचे ह्रदय बनलयं कदाचित! मग घाबरणायाचा प्रश्न येतोच कुठे? 
 
खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविण तू स्वामी भक्त- आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे, त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करतेय त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असंच काहीसं महाराजांच आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रध्दा आपुलकी हे सर्व नामस्मरणा द्वारे व्यक्त करायचयं महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. 
 
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ... नको डगमगू स्वामीच देतील हात- आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांच आहे, आपण विसरु पण महाराज आपल्याला विसरणं "अशक्य"! मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे तारक मंत्रात. महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलयं ते अजिबात विसरायचं नाहीये.
 
हे मना तू फक्त निःशंक हो, निर्भय हो- 
तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत, आणि चमत्कार अनुभवावा. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच! आपण खरंच खूप नशिबवान आहोत, आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले. म्हणजे खरंच काहीतरी छोटंस पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली, कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज!.
 
!!!श्री स्वामी समर्थ!!!

- सोशल मीडिया