रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गणपतीला दुर्वा प्रिय होण्याचे कारण ?

एकदा मायावी शक्तीपासून अनलासुर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला. त्याच्या कानठळया बसविणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरकाप उडत होता. त्याचे डोळे लालबुंद होते. त्यांतून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते. या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठायकरून सोडले होते. संपूर्ण देवलोक ह्या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते.
 
अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले. त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला. गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले. अनलासुराविरूध्द युध्द पुकारले.
 
अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला.
 
त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला. तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्रअसे नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळयातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरूणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची लाही काही थांबेना. गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता.
 
इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले. प्रत्येकाने एकवीस-एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला. गणपतीला तात्काळ बरं वाटलं. त्याच्या अंगाची आग शांत झाली.
 
गणपती आनंदून म्हणाला, माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय. केले, परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला. यापुढे जो मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञयाग, व्रतं आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल.