बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण इतिहास
Written By
Last Modified: बुधवार, 14 मे 2014 (17:01 IST)

सोनिया युग समाप्तीच्या मार्गावर !

सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जो अंदाज व्यक्त केला जात आहे तो पाहाता काँग्रेस पक्षाच्या दहा वर्षे चाललेल्या सत्तेचा आता अंत जवळ आला आहे, असे वाटते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार दिल्लीत स्थानापन्न होईल, अशीही भविष्यवाणी केली जात आहे. 2004 आणि 2009 मध्ये देखील अशाच प्रकारे भविष्यवाणी करण्यात आली होती. परंतु नंतर ती खोटी ठरली. त्यामुळे निवडणूकपूर्व अंदाजावर विश्वास ठेवता येत नाही. जर ही भविष्यवाणी अचूक ठरली तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे भवितव्य काय प्रश्न निर्माण होईल. 1998 पासून त्या काँग्रेस अध्यक्षपदावर आहेत. पक्षात मोठ्या प्रमाणावर बदल झाला पाहिजे, असे काही बडय़ा काँग्रेसजनांना वाटते. परंतु सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबत ते काहीही बोलायला तयार नाहीत. पक्षाची धुरा त्यांच्याकडे कायम राहावी की, राहुल गांधी यांच्या खांद्यावर सोपवावी याविषयी देखील कोणी मतप्रदर्शन करताना दिसत नाही. सध्या तरी काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांचे स्थान सोनिया गांधींनंतर आहे.

126 वर्षाची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ राहणार्‍या सोनिया गांधी या एकमेव आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या एक सामान्य गृहिणी होत्या. 1984 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना देशातील राजकारण जवळून पाहाण्याची संधी मिळाली. 1991 मध्ये   जेव्हा अतिरेक्‍यांनी राजीव गांधी यांची हत्या केली तेव्हा त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. पुढे 1991च्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. 1966 मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात नरसिंहराव असे पहिले पंतप्रधान होते जे नेहरू-गांधी घराण्यातील सदस्य नव्हते. राव सत्तेतून बाजूला झाल्यानंतर सीताराम केसरी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आली. तेव्हापासून या पदावर गांधी परिवारातील व्यक्ती राहिली पाहिजे असा विचार पुढे आला. नरसिंहराव यांच्या काळात काँग्रेसने पाच वर्षे सत्ता भोगली आणि नंतरच्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अनेक चांगले नेते हताश होऊन पक्षातून बाहेर पडले. चांगली परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाची प्रतीमा खराब झाली.

2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगले यश प्राप्त केले. निवडणूक निकालानंतर पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान होण्यासाठी सोनिया गांधींवर दबाव आणला. पक्षाबाहेरील काही लोकांनी मात्र त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे केला. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी  मनमोहनसिंग यांच्या नावाचा विचार अत्यंत जाणीवपूर्वक करण्यात आला. सोनिया गांधी यांना आव्हान देण्याची ताकद त्यावेळी काँग्रेस पक्षातील एकाही नेत्याकडे नव्हती. फिनिक्स पक्षी जसा राखेतून उंच गगनाकडे झेप घेतो, त्याप्रमाणे सोनिया गांधी यांच्याकडे पाहिले गेले. 2009 च्या निवडणुकीतही या यशाची पुनरावृत्ती घडली. काँग्रेस ही निवडणूक हरणार असे भाकीत अनेक राजकीय पंडितांनी केले होते. परंतु तसे घडले नाही. काँग्रेस दुसर्‍यांदा निवडून आली. सोनिा गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मनमोहनसिंग यांचीच निवड केली. सोनिया गांधी यांनी केवळ काँग्रेस पक्षच मजबूत केला असे नव्हे तर पक्षाला गतवैभवदेखील पुन्हा प्राप्त करून दिले.

इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेस पक्ष ज्या अडचणीतून जात होता त्यापेक्षा मोठी अडचण असताना सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली आणि यश मिळवून दिले. एकीकडे पक्षावर पूर्ण नियंत्रण ठेवताना दुसरीकडे देशातील गरीब लोकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड दिसून आली. गेल्या पाच वर्षात सरकारने जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्याचे श्रेय सोनिया गांधी यांनाच दिले पाहिजे. गरिबांसाठी अन्नसुरक्षा योजना सुरू करून त्यांनी याची प्रचिती दिली आहे. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कामाचा अधिकार अशा अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या. यमु ळे देश सशक्त होईल, असे सोनिया गांधी यांना वाटते.

गेल्या काही वर्षात भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता यामुळे पक्षाला फार मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांना सोळाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाच्या सीमारेषेवर उभा असल्याचे वाटते. निवडणुकीत य‍श मिळो अथवा न मिळो पक्षाची जबाबदारी राहुल गांधी यांच्या खांद्यावर सोपविण्याची सोनिया गांधी यांनी तयारी केली आहे. परदेशातून आलेली गांधी घराण्याची सून, नंतर गृहिणी पुढे भारतातील शक्तीशाली नेत्या आणि दीर्घकाळ काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा असा सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास लोकांना दीर्घकाळ लक्षात राहील.