रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

प्रांतीयवाद राजकारणातून- अरूणभाई गुजराती

हिमालयाच्या बर्फापासून ते राजस्थानच्या मरूभूमीपर्यंत महासागराच्या तटापासून ते शेतात वाहणार्‍या पाटापर्यंत हा देश एक आहे. त्याच्या सृजन आणि समृद्धीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. अनेक वर्षांचा वैभवशाली इतिहास असलेल्या या देशाची विविधता हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. भाषा आणि प्रांतांमध्ये भिन्नता हीच आमची ताकद आहे. या पार्श्वभूमीवर किरकोळ वाद हा असणारच. त्यामुळे देशाच्या ऐक्याला काहीही फरक पडणार नाही.

पंजाबच्या बिंद्राने सुवर्णपदक जिंकले तेव्हा केरळला आनंद झालाच ना? महाराष्ट्राचा सचिन जेव्हा सेंच्युरी मारतो किंवा झारखंडचा धोनी जेव्हा ट्वेंटी-२० चा वर्ल्ड कप जिंकून आणतो तेव्हा संपूर्ण भारत देश वेडा होऊन आनंदाने नाचतोच ना? मग आम्ही वेगळे कसे? खरं सांगायचं तर भाषा आणि प्रांताचा वाद हा आमच्या संधीसाधू राजकारण्यांनी उभा केला आहे. केवळ मतांचे राजकारण करणार्‍यांना आणि प्रसिद्धी हवी असलेल्यांना हा मराठीचा पुळका आला आहे. त्यांच्याने काहीही होणे नाही. भारत आणि भारतीय हीच आमची खरी ओळख आहे. मी मराठी, हा गुजराती आणि तो कानडी हा विचार करण्यापूर्वी आम्ही भारतीय हा विचार महत्त्वाचा आहे.

६१ वर्षांच्या आपल्या स्वातंत्र्यातून आपण अनेक स्थित्यंतरे आणि अनेक संकटांचा सामना केला. आज आपल्यासमोर सगळ्यात मोठे संकट आहे गरीबी आणि अशिक्षिततेचे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. हा देश बलशाली बनवूया.
(श्री. गुजराती हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)

(शब्दांकनः विकास शिंपी)