बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. धोका चिनी ड्रॅगनचा
Written By अभिनय कुलकर्णी|

चीन घडविण्यात नेहरू, टागोरांचे योगदान!

PIB
PIB
आधुनिक चीन घडविण्यात योगदान देणार्‍या साठ परकीय व्यक्तींच्या यादीत चक्क भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि कवी रवींद्रनाथ टागोर यांचा समावेश झाला आहे.

आधुनिक चीन आकाराला येण्यात या लोकांचा हेतूपूर्वक किंवा अपघाताने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, सकारात्मक किंवा नकारात्मकही अशा कोणत्याही कारणामुळे सहभाग आहे. यादी निवडतानाही यापैकी कुठला ना कुठला आधार घेण्यात आला. ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिले आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातर्फे चालविल्या जाणार्‍या पीपल्स डेली या दैनिकाचेच ग्लोबल डेली हे भावंड आहे हे विशेष.

ज्या नेहरूंच्या काळातच चीनशी युद्ध झाले, त्यांचा या यादीतील समावेश चक्रावणारा वाटत असला तरी चीन बदलण्यात या युद्धाचाही सहभाग असल्याने त्यांचा यादीत समावेश करण्यात आला असावा. नेहरूंचा या यादीत १९ वा नंबर आहे. नेहरूंनीच चीनचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री चाऊ एन लाय यांच्या साथीने 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा दिली होती. पुढे याच चाऊ एन लाय यांच्या काळात युद्ध झाले.

या यादीत रवींद्रनाथ टागोरांचे स्थान ११ व्या क्रमांकावर आहे. टागोरांचे बरेच साहित्य चीनी भाषेत अनुवादित झाले आहे. म्हणूनच त्यांचा क्रमांक इतक्या वर लागला. यादीत एकमेव महिला आहेत, त्या ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर.

चीनच्या स्थापनेला येत्या एक ऑक्टोबरला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीतील ७० टक्के लोक इंटरनेटवरील युजरकडून निवडण्यात आले. तीस टक्के लोकांची शिफारस बुद्धिजीवी मंडळींनी केली.

या यादीतील इतर मंडळीत व्लादिमीर लेनिन, जोसेफ स्टॅलिन, निकिता क्रुश्चेव्ह आणि इव्हान आर्खिपॉव्ह या रशियनांचा समावेश आहे. तिसर्‍या जगातील नेते नेहरू, जोसिफ ब्रॉझ, मार्शल टिटो, हो चि मिन्ह यांचाही यादीत समावेश आहे. त्यांनीच चीनशी घनिष्ठ संबंध निर्माण केल्याचे म्हटले आहे. कार्ल मार्क्स व लेनिन यांनी नव्या चीनची मुहूर्तमेढ घातली. तर अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन या मंडळींनी चीनला प्रभावित केले आणि मायकेल जॉर्डन आणि बिल गेट्स हे चीनी लोकांचे आदर्श असल्याचे म्हटले आहे.