शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (14:41 IST)

Covid-19: रशियात एका दिवसात 1000 लोकांचा मृत्यू, लोकांचा लस घ्यायला विरोध

रशियामध्ये शनिवारी एका दिवसात कोव्हिडमुळं 1000 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून प्रथमच रशियात एका दिवसात एवढे मृत्यू झाले आहेत.
 
गेल्या आठवडाभरापासून कोव्हिड संबंधीच्या आकड्यांमध्ये वाढत होत आहे. रशियाच्या नागरिकांनी लसीकरण करुण घेण्यात अनास्था दाखवल्यामुळं हे आकडे वाढत असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे.
लसीबाबत विश्वासार्हता नसल्यामुळं रशियातील केवळ एक तृतीयांश नागरिकांनी लसीचे डोस घेतले आहेत.
रशियामध्ये कोव्हिडमुळं 2,22,000 मृत्यू झाले आहेत. युरोपातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यात शनिवारी आणखी 33,000 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.अर्थव्यवस्थेला खीळ बसता कामा नये, म्हणून कठोर निर्बंध लादणं टाळलं असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
 
लसीचे डोस घेण्याबाबत नागरिकांनी उदासीनता दाखवली आहे. त्याकडे रशियाच्या प्रशासनानं बोट दाखवलं आहे.
 
"कोरोनाच्या संसर्गाचे आकडे वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, याबाबत त्यांना माहिती देत राहणं सुरू ठेवावं लागणार आहे," असं प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी नुकतंच म्हटंल आहे."लस न घेणं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे. यामुळं मृत्यू होऊ शकतो," असं ते म्हणाले.
 
आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम असून कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळं निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकते, असं सरकारनं म्हटलं आहे.दरम्यान, कोव्हिडच्या भीतीनं प्रॅक्टिस बंद केलेल्या डॉक्टरांनी लसीकरण करून पुन्हा कामावर परतावं अशी विनंती, आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी केली आहे.
 
रशियामध्ये सध्या कोव्हिडचे उपचार सुरू असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजारांच्या आसपास आहे. फेब्रुवारी 2020 पासून आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून रशियात लागण झालेल्यांचा एकूण आकडा 80 लाखांच्या वर आहे.लशीचा एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्यांची आकडेवारी ही आश्चर्यकारक आहे. दोन्ही मिळून हा आकडा लोकसंख्या एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे.
 
यावरून असं लक्षात येतं की, नागरिकांपैकी बहुतांश लोक लसीकरण करून घेण्यासाठी तयार नाहीत. नुकत्याच झालेल्या एका जनमत चाचणीनुसार लसीकरणाला विरोध असणाऱ्यांचा आकडा 50% पेक्षा जास्त असू शकतो.
 
लशीचा शोध लावण्यात रशियानं विलंब केलेला नाही. त्यांची स्पुतनिक V ही लस गेल्यावर्षीच तयार झाली आहे. तर इतरही तीन लशींना मान्यता देण्यात आली आहे.
 
मात्र, लस सुरक्षित आहे हे पटवून देत लसीकरण करून घेण्यासाठी लोकांना राजी करण्यात त्यांना अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे.
 
जगभरात स्पुतनिक V ची विक्री करण्यात रशियाला यश आलं आहे. मात्र इतर देशांना त्वरित ही लस उपलब्ध करून दिली जात असली, तरी त्याच्या वितरणाबाबतच्या काही समस्या आहेत. तसंच काही देशांना डोस वेळेवर मिळण्यातही अडचणी येत आहेत.