सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (16:38 IST)

वॅग्नर ग्रुपनं दिलेल्या आव्हानातून पुतिन सावरतील?

bladimir putin
खासगी सैन्य कंत्राटदार असलेल्या वॅग्नर ग्रुपने बंडखोरी केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तेला धोका निर्माण झाला होता. मात्र, या ग्रुपने बंड मागे घेतल्यामुळे हा धोका तात्पुरता तरी टळला आहे.
 
वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी शनिवारी (24 जून) उशिरा मॉस्कोकडे जाण्याचा आपला निर्णय बदलल्यामुळे त्यांचं सैन्य दक्षिणेकडील रशियन शहर रोस्तोव-ऑन-डॉनमधून मागे हटलंय.
 
प्रिगोझिन आता बेलारूसला जाणार असल्यामुळे रशिया त्यांच्यावर कोणताही खटला चालवणार नाही. पण मागच्या एका दिवसात घडलेल्या नाट्यमय घडमोडींमुळे बरेचसे गंभीर प्रश्न निर्माण झालेत.
 
या संकटातून पुतीन बाहेर पडतील का?
मागची दोन दशकं रशियावर ताकदीनं राज्य करणाऱ्या पुतिन यांच्यासमोर हे सर्वात मोठं आव्हान उभं ठाकलं होतं.
 
क्रेमलिन आणि वॅग्नर ग्रुप यांच्यात झालेल्या करारामुळे आता बंड थंड झालं आहे. त्यामुळे वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांवर कोणतेही खटले चालवले जाणार नसून ते आपल्या लष्करी तळांवर परतू शकतात. पण त्यांचे नेते येवगेनी प्रिगोझिन यांना रशिया सोडून बेलारूसला जावं लागलंय.
 
पण पुतिन यांच्याविषयी बोलायचं तर ते घटनेतून म्हणावे त्या ताकदीने बाहेर आल्याचं दिसत नाही.
 
रोस्तोव्हमध्ये नेमकं काय झालं?
वॅग्नर ग्रुपच्या सैन्यानं शहरातील लष्करी तळांवर ताबा मिळवला आणि नंतर मॉस्कोच्या दिशेने उत्तरेकडे कूच केली.
 
ही घटना ज्या व्यक्तीमुळे घडली, ते येवगेनी प्रिगोझिन मात्र आजही मुक्त आहेत. याच व्यक्तीने रशियाचं लष्करी नेतृत्व उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी केलेल्या बंडखोरीचे आरोप मागे घेण्यात आले.
 
वॅग्नर ग्रुपने केलेलं बंड पुतिन यांच्यासाठी निश्चितच धोकादायक क्षण होता.
 
जेव्हा कोणता व्यक्ती इतके दिवस सत्तेत असते, तेव्हा त्याला आपण अजिंक्य असल्याचा, प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतो, असा भास निर्माण होतो.
 
16 महिन्यांपूर्वी व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या सुरक्षिततेसाठी 'युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाई' सुरू केली.
 
पण अलीकडच्या काही महिन्यांत क्रेमलिनवर ड्रोन हल्ले झालेत, पश्चिम रशियावर बॉम्बहल्ले झाले आहेत आणि आता सशस्त्र लढवय्यांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेने कूच केली.
 
माघार घेण्याच्या निर्णयापूर्वी हे लढवय्ये रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना हटवण्याची मागणी करत होते.
 
रशियामधील परिस्थिती अस्थिर का आहे?
वॉशिंग्टनमधील थिंक टँक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ द स्टडी ऑफ वॉरच्या मते, येवगेनी प्रिगोझिन यांचं बंड जरी संपलं असलं तरी रशियापुढे अतिशय अस्थिर परिस्थिती आहे.
 
या थिंक टँकच्या विश्लेषकांच्या मते, अयशस्वी बंडखोरी आणि तात्पुरत्या स्वरूपातील उपायांमुळे हे संकट टळलं असलं तरी यामुळे पुतीन सरकार आणि युक्रेन युद्धातील रशियाच्या लष्करी मोहिमेला मोठं नुकसान सोसावं लागलंय.
 
विश्लेषकांनी म्हटलंय की, "या बंडामुळे रशियन सैन्यबळाचा तकलादूपणा समोर आलाय आणि अंतर्गत धोक्याचा सामना करण्यासाठी पुतिन असमर्थ असल्याचंही उघड झालंय. त्यामुळे पुतिन यांचा सैन्यावरील एकाधिकार कमी झाल्याचं देखील दिसतं आहे."
 
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, रोस्तोव्हच्या काही भागात वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना अभिवादन देण्यात आलं.
 
बीबीसी प्रतिनिधी जॉय इनवुड यांचं विश्लेषण :
येवगेनी प्रिगोझिन यांनी भलेही बंडखोरी मागे घेतली असेल, मात्र 24 तासांत ज्या घटना घडल्या, त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतचे त्यांचे संबंध कायमचे बदलले आहेत.
 
प्रिगोझिन यांनी केटरिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे त्यांना एकेकाळी पुतिन यांचं शेफ म्हटलं जायचं.
 
प्रिगोझिन यांच्या सैन्याने मागील काही वर्षात रशियाच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र ते ही कोणाच्या डोळ्यांवर न येता.
 
पुतिन यांनी वॅग्नर ग्रुपच्या माध्यमातून अशी कामं केली, जी करण्यास ते कचरत होते. त्यांना वॅग्नर ग्रुपशी असलेला संबंध सार्वजनिकरित्या जाहीर करायचा नव्हता.
 
सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असाद यांना मदत करण्यापासून ते 2016 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी बोट फार्म चालविण्यापर्यंत, वॅग्नर ग्रुपने पुतीन यांच्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
 
वॅग्नर ग्रुपचा सर्वाधिक प्रभाव आफ्रिकेत दिसून आलाय. जसं की, 2020 आणि 2021 मध्ये माली देशात लष्करी सत्तापालट होऊन सरकार अस्तित्वात आलं. इथे वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांनी इस्लामिक बंडखोरांविरुद्ध दीर्घ लढा दिला. पण असं म्हटलं जातं की, इथे वॅग्नर ग्रुपचे लढवय्ये रशियन सैन्याच्या इशाऱ्यावर गेले होते.
 
असं म्हटलं जातं की, वॅग्नर ग्रुपने सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये, सरकारला राजधानीचं संरक्षण करण्यास मदत केली होती. सोबतच वॅग्नर ग्रुपने मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचे आरोपही करण्यात आलेत.
 
त्यामुळे हा वॅग्नर ग्रुप आता रशियन सरकारच्या निशाण्यावर येऊ शकतो असं दिसतंय. पण प्रश्न असा आहे की आफ्रिकेत लढणाऱ्या आणि इतर देशांच्या सरकारांना संरक्षण पुरविणाऱ्या वॅग्नर ग्रुपचं आता काय होणार?
 
असं म्हटलं जातंय की, या ग्रुपच्या नियंत्रणाखाली अनेक खनिज संसाधने आहेत. हाच त्यांच्या संपत्तीचा स्त्रोत देखील आहे.
 
त्यामुळे पुतिन यांच्याशी संबंध बिघडल्यानंतर प्रीगोझिन यांना या खनिज क्षेत्रात आपला प्रभाव टिकवून ठेवता येऊ शकेल का?
 
प्रिगोझिन पुढे काय करणार?
बीबीसी पूर्व युरोप प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांचं विश्लेषण :
 
पैसा? पण माझ्यामते, त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे. काल त्यांच्या घराची झडती घेतली असता, खूप सारे पैसे सापडले आहेत.
 
पण त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना भविष्यात कोणतं आश्वासन दिलं गेलंय?
 
वॅग्नर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन हे पुतिन यांच्यासाठी खूप महत्वाचे व्यक्ती राहिलेत आणि त्यांनी पुतिन यांची सावली बनून काम केलंय.
 
सीरियातील लढाई असो किंवा 2014 मध्ये युक्रेनकडून क्रिमिया हिसकावून घेणं असो, प्रिगोझिन यांनी पुतिन आणि रशियासाठी ही सर्व कामं केली आहेत.
 
पण त्यांना आता कोणत्या अटींवर बेलारूसला जाऊ देण्यात आलंय हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे.
 
त्यांना आता शांततेत निवृत्ती घेता येईल, यावर काही माझा विश्वास नाही. पण प्रिगोझिन पुढे काय करणार हे देखील अद्याप स्पष्ट नाही.
 
शांतपणे विस्मृतीत जाण्यासारखी ती व्यक्ती नाहीये.
 
पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात काय करार झाला असेल?
कीवमधील बीबीसी प्रतिनिधी अब्दुलजलील अब्दुरसुलोव्ह कीव यांचं विश्लेषण :
 
संपूर्ण दिवस वाटाघाटी झाल्यानंतर प्रिगोझिन यांनी माघार घ्यायचं ठरवलं. पुतिन यांचे सहकारी आणि बेलारूसचे नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी ही चर्चा केली आहे.
 
या करारानुसार, प्रिगोझिन बेलारूसला जातील. त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या सैनिकांवर रशियामध्ये खटले चालवले जाणार नाहीत.
 
लुकाशेन्को यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांच्या संमतीने हा करार झाला आहे.
 
या करारांतर्गत रशियाने वॅग्नर ग्रुपच्या लढाऊ विमानांना सुरक्षा पुरविण्याचं आश्वासनही दिलं आहे.
 
याशिवाय त्यांना आणखी कोणते प्रस्ताव देण्यात आलेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
 
युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशिया बेलारूसची जमीन वापरत आहे. आपल्या लष्करी कारवायांसाठी त्यांना या जमिनीची आवश्यकता आहे. त्यामुळे बेलारूसचं सार्वभौमत्व रशियाच्या दारात लीन झाल्याचं म्हणता येईल.
 
जर पुतिन यांची रशियावर असलेली पकड ढिली झाली तर बेलारूसमध्ये लुकाशेन्को यांनाही धोका निर्माण होईल. बेलारूस त्यांच्या गरजांसाठी रशियावर सर्वात जास्त अवलंबून आहे.
Published By -Smita Joshi