शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (07:34 IST)

टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या पाणबुडीचा स्फोट झाल्याचं निष्पन्न, पाचही प्रवाशांचा मृत्यू

110 वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट झाल्याचं शोधमोहिमेत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या पाणबुडीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती अमेरिकेच्या US कोस्ट गार्ड्सने दिली आहे.
 
US कोस्ट गार्डचे रिअर अडमिरल जॉन मॉगर यांच्या माहितीनुसार, टायटन पाणबुडीचा स्फोट झाला असून त्याचे पाच भाग टायटॅनिक जहाज बुडालेल्या ठिकाणापासूनच्या 1600 फूट परिसरात आढळून आले आहेत.
 
सापडलेल्या अवशेषाचे तुकडे हे मोठ्या स्फोटानंतरच झालेले असू शकतात, असं जॉन मॉगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
रविवारी (18 जून) टायटनचा संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच अमेरिकन नौदलाने शोधमोहीम सुरू केली होती. यादरम्यान त्यांनी काही संशयास्पद स्फोटसदृश आवाज नोंदवले होते.
 
या पाणबुडीत 92 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा असल्याने त्यांचा जवळपास चार-पाच दिवसांपासून युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. पण अखेरीस या पाणबुडीचा पाण्यातच स्फोट होऊन ती उद्ध्वस्त झाल्यावर बचाव पथकाने शिक्कामोर्तब केलं आहे.
 
पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यातही या पाणबुडीमध्ये बसलेल्या व्यक्तींची नावे पाहिल्यानंतर या प्रकरणाला मोठं वलय प्राप्त झाल्याचं दिसून येतं.
 
पाणबुडीत कोण-कोण होते?
या पाणबुडीत स्वार झालेल्या पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट, तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश होता.
 
58 वर्षीय हार्डिंग स्वतःही एक एक्सप्लोअरर आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, “टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचण्याच्या मोहिमेचा मी सुद्धा एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे.”
 
त्यांनी असंही म्हटलं होतं की, न्यू फाउंडलँडमध्ये गेल्या चाळीस वर्षांतली सर्वांत भीषण थंडी पडली आहे. त्यामुळेच 2023 मध्ये टायटॅनिकपर्यंत पोहोचणारी ही एकमेव मानवी मोहीम असेल.
 
पुढे त्यांनी लिहिलं, “हवामानामुळे एक संधी मिळाली आहे आणि आम्ही उद्याच बुडी मारण्याचा प्रयत्न करू.”
 
या पाणबुडीमध्ये पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमानही होते.
 
शहजादा दाऊद पाकिस्तानातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक आहेत. ते एसईटीआय इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी आहेत. ही जगातील ना नफा तत्वावर चालणाऱ्या प्रमुख वैज्ञानिक संस्थेपैकी एक आहे.
 
दाऊद 48 वर्षांचे आहेत आणि त्याचा मुलगा 19 वर्षांचा आहे. पाकिस्तानी वंशाचे असलेले शहजादा दाऊद सध्या ब्रिटनमध्ये राहतात. त्यांचं कुटुंब ब्रिटनच्या सरे भागात राहतं.
 
शहजादा दाऊद आणि सुलेमान यांच्या निधनाबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच, ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंग यांनाही त्यांच्या कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 
पाणबुडी प्रवासासाठी 2 कोटींचं तिकिट
8 दिवसांच्या या मोहिमेसाठीच्या तिकीटाची किंमत अडीच लाख डॉलर म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या टूरमध्ये टायटॅनिक जहाजाचे अवशेष समुद्रात 3800 मीटर खाली जाऊन पाहिले जातात.
 
युएस कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, रविवारी हा प्रवास सुरू झाल्यानंतर 1 तास 45 मिनिटांनी पाणबुडीचा संपर्क तुटला. त्यानंतर पाणबुडीच्या शोधमोहिमेसाठी एक सी-130 विमान पाठवण्यात आलं. तसंच सोनार यंत्रणेचीही मदत घेण्यात येत होती.
 
ही मोहीम अमेरिकेसह कॅनडाचं नौदल आणि इतर कंपन्यांच्या मदतीने सुरू आहे.
 
पाणबुडीची टूर आयोजित करणाऱ्या ओशनगेट कंपनीने म्हटलं की पाणबुडीतील प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले जात आहेत.
 
या मोहिमेत दोन लष्करी विमाने, एक सोनार आणि एक पाणबुडी तैनात करण्यात आली आहे.
 
युएस कोस्ट गार्डच्या मते, पोलर प्रिन्स नामक जहाजाने सोमवारी सायंकाळी पाणबुडीला पृष्ठभागावर पाहिलं होतं.
 
सीबीएसचे रिपोर्टर डेव्हिड पोग यांनी गेल्या वर्षी याच पाणबुडीतून प्रवास केला होता. ते म्हणतात, पाणबुडीशी संपर्क करण्याचा कोणताच मार्ग नाही. कारण रेडिओ किंवा जीपीएस पाण्याच्या आतमध्ये काम करत नाहीत.
 
पाणबुडीचा दरवाजा केवळ बाहेरूनच उघडतो, अशी त्याची रचना होती. त्यामुळे आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणबुडीचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याकडे इतर कोणताच मार्ग उपलब्ध नाही, असं कंपनीने म्हटलं होतं.
 
टायटन सबमर्सिबल
साधारणपणे या पाणबुडीत एक पायलट, तीन पर्यटक आणि कंपनीच्या शब्दांत सांगायचं झालं तर एक ‘कन्टेन्ट एक्सपर्ट’ असतो.
 
हा प्रवास न्यूफाउंडलँडमधल्या सेंट जोन्सपासून सुरू होतो. टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहचून परत येईपर्यंत पाणबुडीला आठ तासांचा वेळ लागतो.
 
ओशियनगेटच्या वेबसाइटवरील माहितीनुसार त्यांच्याकडे तीन पाणबुड्या आहेत. मात्र, केवळ टायटन ही पाणबुडीच टायटॅनमिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आहे.
 
ही पाणबुडी 10432 किलो वजनाची आहे आणि वेबसाइटवरील माहितीनुसार ती 13100 फूट खोल जाऊ शकते. पाणबुडीत पाच प्रवाशांसाठी 96 तास पुरेल एवढा ऑक्सिजन असतो.
 
ओशियनगेटच्या मालकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, पोलर प्रिन्स नावाचं एक जहाजही या मोहिमेचा भाग होतं. या जहाजाच्या मदतीनेच पाणबुडीला टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचवलं जातं.
 
त्यांनी हेही सांगितलं की, आताच्या घडीला पाणबुडीमधले प्रवाशांचा बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाहीये. कारण पाण्याच्या इतक्या खाली जीपीएस काम करत नाही आणि रेडिओही नाही.
 
त्यांनी सांगितलं, “जेव्हा सपोर्ट शिप पाणबुडीच्या बरोबर वरती असतं, तेव्हा ते टेक्स्ट मेसेज करून संदेशाची देवाणघेवाण करू शकतं. पण आता या संदेशांचं उत्तर मिळत नाहीये.”
त्यांनी सांगितलं की, पाणबुडीमधल्या प्रवाशांना बाहेरून बोल्ट लावून सील केलं जातं. अशा परिस्थितीत पाणबुडी पृष्ठभागावर आली, तरी प्रवासी बाहेर पडू शकत नाहीत. पाणबुडीचे कर्मचारीच बाहेरून ती उघडू शकतात.
 
शंभर वर्षं उलटून गेली, तरी टायटॅनिकचे अवशेष समुद्र तळाशी शाबूत आहेत. आपल्या पहिल्याच प्रवासात हिमनगाला धडकून समुद्रात बुडालेलं टायटॅनिक हे त्या काळातलं सर्वांत मोठं जहाज होतं.


Published By- Priya Dixit