सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (15:07 IST)

पाकिस्तान : शालेय पुस्तकांमध्ये हिंदूद्वेष शिकवला जातोय का?

करीमुल इस्लाम
शाळेची पुस्तकं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जीव की प्राण असतात. शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आणि पुस्तकात लिहीलेली प्रत्येक ओळ विद्यार्थ्यांसाठी काळ्या दगडावरची रेघ असते.
 
लहान मुलांना शाळेच्या पुस्तकाबाहेरील काही सांगायला गेलो तर मुलं ऐकतात? नाही ना! मुलांसाठी पुस्तकातील प्रत्येक ओळ खरी असते. पुस्तकातील प्रत्येक ओळ मुलांच्या मनावर एखाद्या ठश्याप्रमाणे उमटत असते.
 
ही पुस्तकं वाचून, अभ्यास करून मुलं मोठी होतात. लहानपणी वाचलेलं त्यांच्या मनात कोरलं जातं, ते कायमचं.
 
पण, पाकिस्तानात शाळेच्या पुस्तकातून हिंदूंविरोधात द्वेष पसरवला जातोय का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही शाळा, कॉलेज आणि विद्यापीठात सामाजिक ज्ञान आणि पाकिस्तानी स्टडीजच्या पुस्तकांमध्ये काय शिकवण्यात येतं हे मुलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानातील हिंदू आणि मुस्लीम विद्यार्थी याबाबत काय म्हणतात, हे आम्ही जाणून घेतलं.
 
'अत्याचारी हिंदू'
आम्ही 25 ते 35 वर्ष वयाच्या काही मुला-मुलींशी चर्चा केली. शाळेच्या पुस्तकातील कोणत्या अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे त्यांना दु:ख झालं? किंवा त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
या मुलांनी आम्हाला शाळेच्या पुस्तकातील काही गोष्टी सांगितल्या:
 
"हिंदूंनी मुसलमानांवर खूप अत्याचार केला होता."
 
"मुर्तींची पूजा करणारा काफिर आहे."
 
"एकेकाळी हिंदू घरी मुलगी जन्माला आली तर, तिला जिवंतपणी जमीनीत पुरत होते."
 
"हिंदू मानवतेचे शत्रू आहेत."
 
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या युवकांनी, लहानपणी त्यांच्या आजूबाजूला सहिष्णूता आणि मैत्रीचं वातावरण अनुभवलं. मित्र-मैत्रिणी, ईद, होळीसारखे सण, दिवाळी साजरी करताना या मुलांना हिंदू आणि मुसलमान यांच्यातील अंतर अजिबात जाणवलं नाही.
पण, शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर या मुलांना कळून चुकलं की, त्यांच्या मनामध्ये घृणा आणि पक्षपाताचं विष कालवलं गेलंय. आमच्या मनात विष कालवण्यास शाळेची पुस्तकं कारणीभूत होती, असं ही मुलं सांगतात.
 
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैद्राबादमध्ये रहाणारे राजेश कुमार, वैद्यकीय क्षेत्राशी जोडलेले आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे. सिंध टेक्स्ट बुक बोर्डाच्या 10वी आणि 12वी च्या पाकिस्तान स्टडीजच्या पुस्तकांचा दाखला राजेश कुमार देतात. त्यांनी ही पुस्तकं शाळेत वाचली आहेत.
 
"या पुस्तकातील 33 व्या पानावर मानवतेचे दुश्मन असलेल्या हिंदू आणि शिखांनी हजारो नाही, तर लाखो लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवांची हत्या केल्याचं लिहीण्यात आल्याचं," राजेश कुमार सांगतात.
 
याचा अर्थ ही पुस्तकं लिहीणाऱ्या लेखकांच्या डोक्यात हिंदू आणि शिख मानवतेचे दुश्मन आहेत असं पहिल्यापासूनच होतं, असं ते म्हणतात. मात्र, कोणी दंगल घडवली तर त्यात एकाबाजूचे लोक नसतात. दोन्ही बाजूचे लोक समान दोषी असतात.
 
'मुसलमानांचे दुश्मन'
डॉ राजवंती कुमारी 9वी आणि 10वी च्या पाकिस्तान स्टडीज विषयाच्या पुस्तकांचं उदाहरण देताना सांगतात, "या पुस्तकांमध्ये हिंदूंना मुसलमानांचा शत्रू म्हणून संबोधण्यात आलं आहे."
 
या पुस्तकात लिहीण्यात आलंय, "हिंदू आणि मुसलमानांनी अनेक आंदोलनात एकमेकांना साथ दिली. मात्र, ही मैत्री खूप वर्ष टिकली नाही. हिंदूंचं मुसलमानांशी असलेलं वैर समोर आलं होतं."
"मी स्वत: हिंदू आहे. मग, मुसलमानांची शत्रू कशी असू शकते?" असा प्रश्न डॉ. राजवंती विचारतात.
 
त्या म्हणतात, "मी मुसलमानांसोबत खेळताना लहानाची मोठी झालीये. माझे मित्र मुसलमान आहेत. आम्ही एकत्र येऊन सण साजरे केले आहेत. मग, आमच्यात शत्रूत्व कसं असू शकेल."
 
पक्षपात, घृणा आणि अपमान
पाकिस्तानात 3.5 टक्के लोक गैर मुस्लिम आहेत. एका अंदाजानुसार, पाकिस्तानात हिंदूंची संख्या 1.5 टक्के आहे.
 
अमेरिकेच्या सरकारने 2011 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात, पाकिस्तानात शाळेच्या पुस्तकातून हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक समाजाविरोधात द्वेष पसरवला जात असल्याचं समोर आलं होतं.
 
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाने केलेल्या संशोधनासाठी पाकिस्तानातील पहिली ते दहावीच्या 100 पुस्तकांचा अभ्यास करण्यात आला होता. याशिवाय शाळांना भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांची मतं जाणून घेण्यात आली होती.
 
या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकात पाकिस्तानात रहाणाऱ्या हिंदूंच्या देशप्रेमाची तूलना भारतातील हिंदूंशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे विद्यार्थांच्या मनात, गैर-मुस्लिम लोकांच्या मनात पाकिस्तानसाठी देशभक्ती नाही असं चित्र निर्माण होतं.
 
'हिंदूंना खलनायक बनवलं जातं'
 
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, ए. एच. नायर म्हणतात, "पाकिस्तानमधील शाळेच्या पुस्तकात हिंदूंच्या विरोधातील राग एका विशिष्ट पद्धतीत व्यक्त केला जातो."
 
"तहरीक-ए-पाकिस्तानचा इतिहास शिकवताना. दोन राजकीय पक्ष, मुस्लिम लीग आणि कॉंग्रेसमधील मतभेद, हिंदू आणि मुसलमान यांच्यातील लढाईच्या स्वरूपात दाखवण्यात येतात," असं ते पुढे सांगतात,
 
ए. एच. नायर सांगतात, "यामुळे शाळेच्या पुस्तकात हिंदू खलनायक बनतात. पाकिस्तानचं गठन आणि यामागचं राजकारण याला खरं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. "
 
शाळेच्या पुस्तकात आणखीन एक महत्त्वाचा गंभीर प्रश्न असल्याचं ते सांगतात. एकीकडे मुसलमानांचा इतिहास प्रमुख पद्धतीने दाखवण्यात येतो. तर, दुसरीकडे हिंदूंच्या इतिहासाचा उल्लेख कुठेच दिसून येत नाही.
 
पुस्तकं कशी तयार केली जातात?
सिंध प्रांतात शाळेची पुस्तकं सिंध बुक बोर्डाकडून तयार केली जातात.
 
बोर्डाचे संचालक (टेक्निकल) यूसुफ अहमद शेख बीबीसीशी बोलताना सांगतात, अभ्यासक्रम 'ब्यूरो ऑफ करिकुलम' यांच्याकडून दिला जातो. ज्यानुसार शाळेची पुस्तकं तयार केली जातात.
 
अभ्यासक्रम मिळाल्यानंतर, काही लेखकांची निवड केली जाते. त्यांना पुस्तकं बनवण्यास सांगण्यात येतं. लेखकाने पुस्तक तयार करून दिल्यानंतर, त्याची तपासणी होते. अंतीम टप्प्यात 'ब्यूरो ऑफ करिकुलम' कडून पुस्तकाची तपासणी करण्यात येते.
 
यूसुफ अहमद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंध टेक्स्ट बुक बोर्डाला, 'ब्यूरो ऑफ करिकुलम' ने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकं बनवावी लागतात. अभ्यासक्रमाबाहेरचं यात काही असू शकत नाही.
 
'महिलांना दुय्यम स्थान'
शिकारपुरमध्ये रहाणाऱ्या पारा मांगी, सरकारी कर्मचारी आहेत आणि वृत्तपत्रांमध्ये कॉलम लिहितात. त्या सांगतात, "इंटरमिडीएट अभ्यासक्रमात पाकिस्तानी स्टडीजचं पुस्तक वाचलं होतं. त्यात महिलांना दुय्यम स्थान देण्यात आलं होतं."
 
पारा म्हणतात, वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. हिंदू धर्मात देवींची पूजा केली जाते. त्यांना दुर्गा, काली माता असं संबोधलं जातं.
 
त्या पुढे म्हणतात, "आपल्या हक्कांसाठी, हल्लीच्या काळात प्रत्येक समाजातील महिला संघर्ष करत आहेत. ही संपूर्ण जगभरातील समस्या आहे. महिला आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत."
 
डॉ. राजवंती कुमारी सांगतात, "आम्ही पाच बहिणी आहोत. आई-वडील आमच्यासोबत कधीच वाईट वागले नाहीत. घरात आम्हा बहिणींना खूप सम्मान दिला जातो. हिंदू मुलींना घरातील लक्ष्मी समजतात."
 
तर, राजेश कुमार म्हणतात, "हिंदू आणि जगभरातील इतर सर्व धर्म मानवाधिकार आणि समानतेबाबत सांगतात."
 
"पाकिस्तानात हिंदुंमधील जातीव्यवस्था संपुष्टात आली आहे. आता समाज जात नाही तर, 'क्लास' मध्ये (श्रीमंत-गरीब) विभागला गेलाय," असं राजेश कुमार पुढे म्हणतात.
 
लोक काय म्हणतात?
सिंध टेक्स्ट बोर्डाचे यूसुफ अहमद शेख म्हणतात, "पुस्तकं बनवल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून शाळेला विविध प्रतिक्रिया मिळतात. या प्रतिक्रियांवर विचार केला जातो. पुस्तकात बदल करण्याची गरज असल्यास, योग्यतो बदल केला जातो. "
 
ते सांगतात, "काही वर्षांपूर्वी सिंध प्रांतातील सामाजिक ज्ञान आणि पाकिस्तान स्टडीजच्या पुस्तकांबाबत अल्पसंख्यांक समाजाकडून प्रतिक्रिया आली होती. या पुस्तकातील काही गोष्टी गैर-मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या आहेत असं सांगण्यात आलं. या पुस्तकांची तपासणी करून आक्षेपार्ह लिखाण काढून टाकण्यात आलं होतं. "
 
यूसुफ अहमद शेख यांचा दावा आहे की, 2017 मध्ये पहिली ते आठवीची पुस्तकं बदलण्यात आली होती. नववी आणि दहावीची पुस्तकं दरवर्षी अपटेड करण्यात येतात. पुढच्या वर्षी अकरावी आणि बारीवीच्या पुस्तकांची तपासणी करण्यात येणार आहे.
 
'मी संजय नसतो तर....'
थार पारकरमध्ये रहाणारे पेशाने पत्रकार असलेले संजय मिठरानी सांगतात, पाकिस्तानात हिंदू म्हणून रहाणं खूप आव्हानात्मक आहे. काहीवेळा माझं नाव संजय नसतं तर? असा विचार मनात येतो.
"एखादा व्यक्ती, जो हिंदूंना भेटला नाही, हिंदूंबद्दल ज्याला माहिती नाही. त्याने ही पुस्तकं वाचली तर, त्याच्या मनात हिंदूंविरोधात द्वेष निर्माण होईल. यामुळे पाकिस्तानातील हिंदुंसमोर मोठा प्रश्न निर्माण होईल."
 
डॉ. राजवंती कुमारी म्हणतात, शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी शाळेच्या पुस्तकातील माहितीच खरी असते.
 
"दुसरी, तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या मुलांना वास्तविक इतिहास काय आहे, याची काय माहिती असणार. त्यांना मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर त्यांचा दृष्टीकोन तयार होतो. हिंदू आमचे शत्रू आहेत, असा त्यांचा समज होतो. "
 
पारा मांगी म्हणतात, "येणारी प्रत्येक पिढी ही पुस्तकं वाचेल. ज्यामुळे हिंदूविरोधी वातावरण तयार होईल. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारी पीढी आपण निर्माण करत आहोत का? याचा आपल्याला विचार करावा लागेल."
 
वस्तुस्थितीचा इतिहास
संजय मिठरानी सांगतात, पाकिस्तानात प्रसिद्ध हिंदू आणि त्यांच्याविषयी माहिती दिली गेली, तर फक्त हिंदू विद्यार्थीच नाही तर इतरांना याविषयी गोडी निर्माण होईल. यामुळे राष्ट्रीय एकता निर्माण होण्यास मदत मिळेल.
 
जगन्नाथ आझाद, ज्यांनी पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत लिहीलं होतं. त्यांची ओळख पुस्तकात नाही. लेखकांनी या व्यक्तींविषयी लिहीलं पाहिजे, असं संजय म्हणतात.
 
शिक्षणतज्ज्ञ ए.एच. नायर सांगतात, "येणाऱ्या पिढीतील मुलांना इतिहासाची वस्तुस्थिती सांगावी लागेल. शाळेच्या पुस्तकांच्या माध्यमातून मुलांमध्ये सहिष्णूता, सहनशीलता वाढवण्यावर भर दिला पाहिजे. "