शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 5 एप्रिल 2021 (14:51 IST)

पाकिस्तानच्या फखर झमानची विक्रमी खेळी पण फेक फिल्डिंगची का होतेय चर्चा?

दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या वनडेत पाकिस्तानच्या फखर झमानने 193 रन्सची अद्भुत खेळी साकारली. मात्र फखरच्या खेळीपेक्षाही दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या फेक फिल्डिंगची चर्चा क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर रंगली आहे.
 
दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्यांदा बॅटिंग करताना 341 रन्सची मजल मारली. कर्णधार तेंबा बावूमाने सर्वाधिक 92 रन्सची खेळी केली. क्विंटन डी कॉकने 80, रॅसी व्हॅन डर डुसेने 60 तर डेव्हिड मिलरने 50 रन्स केल्या.
 
जिंकण्यासाठी डोंगराएवढं लक्ष्य मिळालेल्या पाकिस्तानने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या मात्र सलामीवीर फखर झमानने एका बाजूने जिगरबाज खेळी केली. आफ्रिकेच्या प्रत्येक बॉलरला चोपून काढत झमानने अविश्वसनीय विजयाची शक्यता निर्माण केली. द्विशतकाच्या दिशेने झमान पाकिस्तानला थरारक विजय मिळवून देणार असं चित्र होतं.
 
एका बाजूने साथीदार बाद होत असल्याने मॅचचं पारडं आफ्रिकेच्या दिशेने झुकलं. मात्र झमानला बाद करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटनने केलेली क्लृप्ती स्पिरीट ऑफ द गेम अर्थात खेळभावनेला साजेसी आहे का? यावर चर्चा सुरू झाली आहे.
पाकिस्तानने 324 रन्स केल्या आणि दक्षिण आफ्रिकेने 17 रन्सने हा मुकाबला जिंकला. तीन सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत आहे.
 
झमानने 18 चौकार आणि 10 षटकारांची लयलूट करत पाकिस्तानला जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. झमानने याआधी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं आहे. रविवारी तो दुसऱ्या द्विशतकासह पाकिस्तानला अशक्य वाटणारा विजय मिळवून देणार अशी खेळी त्याने साकारली. मात्र एका बाजूने सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने विजयाने हुलकावणी दिली. झमानने या खेळीदरम्यान अनेक विक्रम नावावर केले.
 
शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानला जिंकण्यासाठी 31 रन्सची आवश्यकता होती. झमानने बॉल तटवून काढला, एक रन पूर्ण केली. दुसऱ्या रनसाठी झमान पुन्हा स्ट्राईकवर येत असताना आफ्रिकेच्या क्विंटनने फिल्डर एडन मारक्रमला थ्रो नॉन स्ट्रायकरच्या दिशेने कर असं सांगितलं. क्विंटनने हाताने खूण करून सांगत असल्याने झमानचं चित्त विचलित झाला. त्याचा वेग मंदावला. नॉन स्ट्रायकरच्या दिशेने पाहण्याच्या नादात मारक्रमचा थ्रो क्विंटनच्या इथल्या स्टंप्सवर येऊन आदळला. झमान क्रीझच्या बाहेर असल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं.
 
झमानला बाद करण्यासाठी क्विंटनने केलेल्या कृतीला फेक फिल्डिंग असं म्हटलं जातं. आयसीसीच्या नियमानुसार फिल्डर आपल्या शरीराच्या अवयवाचा उपयोग करून बॅट्समनचं लक्ष विचलित करत असेल तर त्याला फेक फिल्डिंग म्हटलं जातं.
क्विंटनच्या फेक फिल्डिंगवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी तसंच जगभरातील तज्ज्ञांनी टीका केली आहे. अफलातून खेळीसाठी झमानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.