ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हल्ला झाला आहे. ते न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते, तेव्हा त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची माहिती न्यूयॉर्क पोलिसांनी दिलीय. हललेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची ओळख पटली आहे.
त्यांची स्थिती नाजूक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत अशी माहिती त्यांचे एजंट अँड्र्यू वायली यांनी दिली, त्यांना बोलताही येत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सलमान रश्दी यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने यापूर्वी सांगितलं होतं की, सध्याची त्यांची तब्येत फारशी चांगली नाही. त्यांची वाचा गेली आहे. कदाचित ते त्यांचा एक डोळाही जाऊ शकतो.
ते म्हणाले, " त्यांच्या जठरात चाकू मारला आहे. तसंच त्याच्या दंडाजवळच्या मज्जातंतूंची मोठी हानी झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे."
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी ट्विट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणतात, "गेल्या 33 वर्षांपासून रश्दी यांनी स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला आहे. द्वेषमुलक व्यक्तींच्या हल्ल्याला ते बळी पडले आहेत. त्यांचा लढा हा आमचा लढा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत."
भारतात जन्मलेले रश्दी यांनी लिहिलेलं 'द सॅटेनिक व्हर्सेस' पुस्तक वादग्रस्त ठरलं होतं, ज्यानंतर त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
रश्दी हे न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशनच्या एका मोकळ्या सभागृहात बोलत होते. तेव्हा अचानक एक व्यक्ती त्यांच्या दिशेने धावत गेली आणि तिने रश्दी यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांना ठोसा मारला की धारदार शस्त्राने भोसकलं, यावरून प्रत्यक्षदर्शींमध्ये गोंधळ होता.
या कार्यक्रमाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एकाने दुरून रेकॉर्ड केलेल्या या व्हीडिओमध्ये या हल्ल्यानंतर उडालेला गदारोळ दिसून येतोय.
यादरम्यान हल्लेखोराने सलमान रश्दी यांच्यासोबत उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीवरही हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत एका पुरुष संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील सलमान रश्दींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये एअर अॅम्ब्युलन्सने नेण्यात आलं.
सलमान रश्दी यांचा जन्म भारतात झाला. त्यांच्याकडे सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन नागरिकत्व आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले साहित्यिक, अशी त्यांची जगभर ओळख आहे.
1981 साली प्रकाशित झालेल्या 'मिडनाईट चिल्ड्रन्स' या पुस्तकानंतर ते प्रसिद्धीस आले. या पुस्तकाच्या जगभरात लाखोंच्या पटीत प्रति विकल्या गेल्या. याच पुरस्कारासाठी त्यांना मानाच्या बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
हल्लेखोर कोण?
सलमान रश्दींच्या मानेवर चाकूनं वार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आणि हल्लेखोर आता पोलिसांच्या ताब्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादी मतार असं हल्लेखोराचं नाव असून तो 24 वर्षांचा आहे. हल्लेखोर हा फेयरव्यू, न्यू जर्सी येथील रहिवासी आहे.
हल्लेखोराचा हेतू अद्याप कळू शकला नसून हल्ल्यामागील कारण जाणून घेण्यासाठी एफबीआयचीही मदत घेण्यात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
संशयित हादी मतार याच्याकडे या कार्यक्रमासाठीचा पास असून तो एकटाच आला होता. पोलिसांनी मतारवर अद्याप आरोप निश्चित केलेले नाहीत.
संशयित हादी मतार याने स्टेजवर उडी मारली आणि सलमान रश्दीच्या मानेवर आणि पोटावर वार केले.
रश्दींवरील हल्ल्यानं मला धक्का बसला आहे - तस्लीमा नसरीन
सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्येष्ठ लेखिका तस्लीमा नसरीन यांनी निषेध केला आहे.
नसरीन यांनी ट्विट करून रश्दी यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, "सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मला नुकतीच मिळाली. याने मला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. असं काही घडेल, याची मला कल्पना नव्हती. ते पाश्चिमात्य देशांमध्ये राहत होते. 1989 पासून त्यांना संरक्षण प्राप्त होतं. त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केला जाऊ शकतो, तर इस्लामवर टीका करणाऱ्या प्रत्येकावर हल्ला होऊ शकतो. मला काळजी वाटते."
'हॅरी पॉटर सिरीज'च्या लेखिका जे. के. रोलिंग यांनीही रश्दी यांच्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली.
जे. के. रोलिंग यांनी एपी वृत्तसंस्थेचं ट्वीट रिट्विट करत म्हटलं, "अतिशय भयानक बातमी."
'द सॅटेनिक व्हर्सेस'वरून वाद
1988 साली सलमान रश्दींचं 'द सॅटेनिक व्हर्सेस' पुस्तक प्रकाशित झालं. रश्दींचं हे चौथं पुस्तकं आहे. या पुस्तकामुळे रश्दींना जवळपास 9 वर्षे लपून राहावं लागलं होतं.
मुस्लीमबहुल देशांमध्ये या पुस्तकामुळे सलमान रश्दींविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या पुस्तकातील मजकुरावर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. काही देशांमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली.
'द सॅटेनिक व्हर्सेस'च्या प्रकाशनाच्या दुसऱ्या वर्षीच इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दींना मृत्यूदंड देण्याची मागणी केली.
या पुस्तकानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. या पुस्तकाच्या अनुवादकाची सुद्धा हत्या झाली.
सलमान रश्दींची साहित्यसंपदा
सलमान रश्दी यांची पहिली कादंबरी 1975 साली प्रकाशित करण्यात आली होती. ग्रिमस असं या कादंबरीचं नाव असून ही एक सायन्स-फिक्शन कथा होती. यानंतर 1981 साली त्यांचं मिडनाईट चिल्ड्रन हे पुस्तक प्रकाशित झालं. याच पुस्तकाला 1981 सालचा बुकर पुरस्कार मिळाला होता.
ग्रिमस (1975)
मिडनाईट चिल्ड्रन (1981)
शेम (1983)
द जग्वार स्माईल (1987)
द सॅटेनिक व्हर्सेस (1988)
हारून अँड द सी ऑफ स्टोरीज (1990)
इस्ट-वेस्ट (1994)
द मूर्स लास्ट साय (1995)
द ग्राऊंड बेनेथ हर फिट (1999)
शालिमार द क्लाऊन (2005)
द एनचँट्रेस ऑफ फ्लॉरेन्स (2008)
लुका अँड द फायर ऑफ लाईफ (2010)
जोसेफ अँटन : अ मेमोईर (2012)
टू ईअर्स एट मंथ्स अँड ट्वेंटी एट नाईट्स (2015)
द गोल्डन हाऊस (2017)
क्विन्शट (2019)
लँग्वेजेस ऑफ ट्रूथ (2021)