रशियाचं लुना 25 हे लँडर चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे रॉकेट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या बेतात होतं. मात्र प्री-लँडिग ऑर्बिटमध्ये गेल्यावर त्यात काही समस्या निर्माण झाल्या.
हे रॉकेट चंद्रावर सोमवारी उतरणार होतं. चंद्रावर गोठलेलं पाणी आणि इतर काही गोष्टी धरून ठेवतं का हे पाहण्यासाठी हे मिशन आखण्यात आलं होतं.
रॉसकॉसमॉस ही संस्था रशियाची अंतराळ संशोधन संस्था आहे. लुना 25 चा संपर्क तुटल्याचं या संस्थेने सांगितलं आहे.
“रॉकेट एका अनोळखी कक्षेत गेले आणि चंद्रावर कोसळलं.” असं या संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं रॉकेट 'लुना 25' च्या रुपानं चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं.
11 ऑगस्ट 2023 च्या पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी रॉसकॉसमॉस स्टेट स्पेस कॉर्पोरेशनने 'लुना 25' हे अंतराळयान वोस्तोचनी कॉस्मोड्रोम इथून प्रक्षेपित केलं होतं.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी सध्या भारत आणि रशिया यांच्यात स्पर्धा सुरू आहे. भारताचं चंद्रयान पुढच्या आठवड्यात चंद्रावर उतरेल अशी अपेक्षा आहे.
आतापर्यंत कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचलेला नाही. अमेरिका आणि चीन चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचले आहेत.
रशियाची चांद्र मोहीम काय आहे?
रशियासाठी ही चांद्र मोहीम एकप्रकारे ऐतिहासिक होती.
1958 ते 1976 दरम्यान तत्कालीन सोव्हिएत रशियाने असेच 24 अधिकृत लुना मिशन चंद्रावर पाठवले होते. पण तेव्हापासून सुमारे पाच दशकं काहीच नाही.
दरम्यान 90च्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएत रशियाचा पाडाव झाला आणि आत्ताचं रशिया जन्मास आलं. त्यामुळे ही आधुनिक रशियाची पहिलीच चांद्रमोहीम म्हणता येईल.
लुना 25च्या प्रोबमध्ये, म्हणजे चंद्रावर लँड करणार होतं, त्या भागात सगळी संपर्काची साधनं आणि सेन्सर्स होती, जे चंद्रावरून माहिती पृथ्वीवर परत पाठवणार होतं. तसंच, हे प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच बोगुलॉव्स्की क्रेटर (Boguslavsky Crater) शेजारी लँड करणार होतं. मात्र, लँड करण्याआधीच हे लँडर कोसळलं आहे.
रशियाच्या रॉकेटचं नियोजन कसं होतं?
रशियाचं हे रॉकेट झेपावल्यानंतर त्यापासून फ्रिगॅट मॉड्यूल प्रोबसह वेगळं होणार होतं. मग हे मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत राहण्यासाठी एकदा वेग आणि जोर लावमार होतं, आणि मग पुन्हा त्याच कक्षेतून चंद्राच्या दिशेने वेगात जाण्यासाठी दुसऱ्यांदा इंजिन फायर करून जोर लावणार होतं.
वाटेत दोन वेळा हे मॉड्यूल आपली दिशा नीट करणार होतं आणि मग चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडिंगची तयारी करणार होतं.
पृथ्वीच्या कक्षेतून ते चंद्राच्या कक्षेपर्यंतचाच प्रवास सुमारे 5 दिवसांचा होता. त्यानंतर तीन दिवस लुना-25चं प्रोब चंद्राच्या कक्षेत आपली लँडिंगची जागा शोधून दक्षिण ध्रुवाजवळ लँड करणार होतं.
मात्र, चंद्रावर उतरण्याच्या एक दिवस आधीच ते कोसळलं आहे.
'चंद्र' गाठण्याची आजवरची शर्यत
शीतयुद्धापासूनच रशिया आणि अमेरिका यांच्यात अंतराळ मोहिमांच्या बाबतीत चढाओढ राहिली आहे. त्यातच आता चीन, जपान आणि इस्रायलसुद्धा चंद्र गाठायच्या शर्यतीत आहेत. आणि इलॉन मस्क यांच्या SpaceX सारखे खासगी प्लेअरही आता या क्षेत्रात आले आहेत.
आजवर अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीन यांनी त्यांचे अंतराळयान आणि प्रोब्स चंद्रावर संशोधनासाठी यशस्वीरीत्या लँड केले आहेत. पण ते सर्व प्रामुख्याने चंद्राच्या दर्शनी भागातच आहेत, जिथे सूर्य प्रकाश नेहमी पडतो.
पण दक्षिण ध्रुवाजवळ सूर्य प्रकाश पडत नसल्याने तिथलं हवामान थंड असेल त्यामुळे तिथे पाण्याचे अवशेष सापडू शकतात, असा अंदाज अनेक दशकं वर्तवला जात होता.
अखेर 2009मध्ये भारताच्याच चंद्रयान-1 मोहिमेअंतर्गत घोषणा करण्यात आली होती की इस्रोच्या मून इम्पॅक्ट प्रोबला चंद्रावर पाण्याचे अंश सापडले आहेत. तेव्हापासून या दक्षिण ध्रुवाजवळच्या भागाविषयी कमालीचं कुतूहल निर्माण झालं आहे.
चंद्रावर खरंच पाण्याचा विपुल साठा असेल तर तिथून चंद्रापलीकडच्या अंतराळ मोहिमांसाठी एक बेस तयार करता येईल, पाण्यातल्या हायड्रोजनला इंधनरूपात वापरता येईल, अशी आशा अंतराळ संशोधकांना आहे. त्यामुळे सगळे या दक्षिण ध्रुवाकडे चालले आहेत.
Published By- Priya Dixit