1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2024 (08:18 IST)

ट्रम्प-बायडन डिबेट: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?

नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेचे नागरीक आपल्या पुढच्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी मतदान करतील. पण या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री होत आहे.
‘व्हाईट हाऊस’ या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी, तिथल्या ओव्हल ऑफिसमध्ये निवडून जाणारी व्यक्ती देश आणि विदेशातील लोकांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव असते.
 
त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचा प्रत्येकावर परिणाम होतो. नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया.
 
कोणते पक्ष आणि उमेदवार राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत?
अमेरिकन राजकारणावर 2 पक्षांचं वर्चस्व आहे. डेमोक्रॅटिक पार्टी (Democratic Party) आणि रिपब्लिकन पार्टी (Republican Party). त्यामुळेच आजवर अमेरिकेत होऊन गेलेले सगळे राष्ट्राध्यक्ष या दोनपैकी एका पक्षाचे होते.
 
या दोन पक्षांपैकी डेमोक्रॅट्स (डेमोक्रॅटिक पार्टी) हा पुरोगामी राजकीय पक्ष आहे, ज्यांचा व्यापक हेतू मुख्यत्वे नागरी हक्क, व्यापक सामाजिक सुरक्षा कवच आणि हवामान बदलांशी संबंधित उपाययोजना असा आहे.
 
जॉन एफ. केनेडी, बिल क्लिंटन, बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे होते.
 
विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडन याच पक्षाचे आहेत आणि ते दुस-यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 
रिपब्लिकन हा अमेरिकेतील पारंपरिक विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. याच पक्षाला जीओपी (ग्रँड ओल्ड पार्टी) म्हणूनही ओळखलं जातं. कमी कर, सरकारचा आकार कमी करणं, बंदुकीचे अधिकार तसंच इमिग्रेशन आणि गर्भपातावरील कडक निर्बंध अशा मुद्द्यांचं समर्थन करणारा पक्ष म्हणून हा ओळखला जातो.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, रोनाल्ड रेगन, रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे होते.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. आणि यावर्षीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.
 
याशिवाय काही अपक्ष उमेदवारही राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. यात माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा पुतण्या - रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांचाही समावेश आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची पुढची निवडणूक कधी आहे?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक ही नेहमी नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी होते. 2024 ची निवडणूक मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 रोजी होईल.
 
तर विजयी उमेदवार जानेवारी 2025 पासून व्हाईट हाऊसमध्ये चार वर्षांसाठी पदभार स्वीकारेल.
 
उमेदवार कोण आहेत आणि त्यांना नामांकन कसं दिलं जातं?
अमेरिकेत पक्ष थेट उमेदवार जाहीर करत नाहीत, तर उमेदवार ठरवण्यासठीही पक्षाचे सदस्यही मतदान करतात, ज्याला प्रायमरी इलेक्शन (प्राथमिक निवडणूक) किंवा कॉकस म्हणून ओळखलं जातं.
 
2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होती. सुरुवातीला यात नऊ रिपब्लिकन, चार डेमोक्रॅट आणि दोन अपक्ष अशा 15 उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी काहीजण यापूर्वीच शर्यतीतून बाहेर पडले.
 
राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पुन्हा एकदा निवडणुक लढवणार असल्याचं जाहीर केलं आणि आता ते डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत.
दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत.
इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय?
राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात.
 
अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत.
 
अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळतात, तो जिंकतो.
म्हणजे जेव्हा एखादा अमेरिकन मतदार त्याच्या आवडत्या उमेदवाराला मत देतो तेव्हा ते राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेसाठी नसून राज्यपातळीसाठी असतं.
 
एखाद्या राज्यात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची सगळी इलेक्टोरल व्होट्स जमा होतात. अमेरिकेतली दोन राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे.
 
त्याचा परिणाम म्हणजे देशभरातून सर्वांत जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजेता ठरतोच, असं नाही. 2016साली हिलरी क्लिंटन यांच्याबाबत असंच घडलं होतं. त्यांना देशाचा विचार करता ट्रंप यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती, पण त्यांना 270 इलेक्टोरल व्होट्स मात्र मिळाली नाहीत.
 
बहुतेक राज्य अशी आहेत जिथे पारंपरिकरित्या मतदारांचा कल हा दोनपैकी एकाच कुठल्यातरी पक्षाकडे जास्त असतो. म्हणूनच मग उमेदवार सहसा अशा डझनभर राज्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतात, जिथे दोन्ही उमेदवारांना जिंकण्याची संधी असते.
 
या राज्यांना 'बॅटलग्राऊंड स्टेट्स' म्हटलं जातं. यांनाच 'स्विंग स्टेट्स' (Swing States) असंही म्हणतात, कारण त्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते.
 
प्रेसिडेन्शियल डिबेट काय आहे?
प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार असणाऱ्या नेत्यांमधला जाहीर वादविवाद.
 
1960मध्ये रिचर्ड निक्सन आणि जॉन एफ. केनेडी यांच्यातलं प्रेसिडेन्शियल डिबेट पहिल्यांदा टीव्हीवरून दाखवण्यात आलं होतं. आणि व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्यासाठी केनेडी यांनी याची मदत झाली, असंही म्हटलं गेलं होतं.
 
1976पासूनच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये किमान एक तरी असं डिबेट झालेलं आहे.
 
यावेळच्या निवडणुकीत 2 प्रेसिडेन्शियल डिबेट्स होतील. पहिलं CNN चा इव्हेंट असेल, तर दुसरं ABC न्यूजचा.
 
90 मिनिटांच्या या डिबेटमध्ये 2 कमर्शियल ब्रेक्स असतील. यामध्ये कोण कुठल्या बाजूला उभं राहणार, समारोपाचा मुद्दा आधी कोण मांडणार हे नाणं उडवून - टॉस करून ठरवलं जातं.
 
दोन्ही उमेदवारांना या चर्चेसाठी पेन, नोटपॅड आणि पाण्याची बाटली दिली जाते. याशिवाय इतर कोणतीही गोष्ट - अगदी आधीपासून मुद्दे लिहीलेला कागदही स्टेजवर नेता येत नाही. किंवा ब्रेकदरम्यान या नेत्यांना त्यांच्या कॅम्पेन स्टाफसोबत बोलता येणार नाही. पूर्ण वेळ दोन्ही नेते उभे असतील. आणि या वादविवादा दरम्यान त्यांच्यासमोर प्रेक्षक नसतील.
 
निवडणुकीमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांची मतं मांडतील आणि दुसऱ्याची मतं खोडून काढण्याचा प्रयत्न करतील.
 
डिबेट आणि निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे?
राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतल्या दोन्ही उमेदवारांची वयं हा चर्चेचा विषय ठरवाय. जो बायडन आहेत 81 वर्षांचे तर डोनाल्ड ट्रम्प आहेत 78 वर्षांचे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी हे दोन्ही नेते वयस्कर असल्याची चर्चा आहेच.
 
पण त्यासोबतच अमेरिकन अर्थव्यवस्था, जगात सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या युद्धांमधली अमेरिकेची भूमिका, निर्वासितांबद्दलची अमेरिकेची भूमिका, गर्भपात - बंदूक खरेदी यांविषयीचे कायदे याविषयी दोन्ही नेत्यांची आणि त्यांच्या पक्षांची भूमिका वेगवेगळी आहे. त्याविषयीच्या पवित्र्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण येतंय यावर जगातली राजकीय समीकरणंही अवलंबून असल्याने त्यानुसारही या निवडणुकीकडे पाहिलं जाईल.
 
गेल्या काही काळात अमेरिकन कोर्टांनी दिलेले निर्णयही काही प्रमाणात भूमिका बजावतील.रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय आणि त्यांच्यावर अजून 3 प्रकरणी खटला सुरू आहे. तर डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांना कोर्टाने ड्रग्सच्या अंमलाखाली असताना बंदूक विकत घेण्याबद्दल दोषी ठरवलंय.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण येतंय यावर जगातली राजकीय समीकरणंही अवलंबून असल्याने जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे.
 
डोनाल्ड ट्रंप यांनी America First म्हणत, 2020मध्ये अमेरिकन सैनिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी परत येण्याचा आदेश दिला आणि तिथे तालिबानने सत्ता काबीज केली.
 
आत्ताही अमेरिका रशियाविरोधात ताकदीने युक्रेनच्या पाठीशी उभा आहे, लष्करी आणि आर्थिक मदत पुरवतोय. तर रशिया-युक्रेन युद्ध आपण लवकरात लवकर संपुष्टात आणू असं ट्रम्प यांनी बोलून दाखवलं होतं.
 
त्यामुळे खुद्द युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणालेत की “अमेरिकेच्या पुढच्या नेत्याचं युक्रेनविषयीचं मत कसं आहे, त्यावरूनच युद्धाची पुढची दिशी ठरू शकते.”
 
अमेरिकेचे भारत, चीन, रशिया, इराण, इस्रायल, युके आणि युरोपशी असलेले संबंध किती चांगले किंवा वाईट आहेत, यावरून अनेक युद्धांची दिशा ठरते, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलू शकते.
 
शिवाय नोकरी - शिक्षण किंवा कायमचं राहण्यासाठी अमेरिकेत जाणं कोणत्या देशाच्या लोकांसाठी सोपं वा कठीण होणार, हे देखील राष्ट्राध्यक्ष कोण होतंय, यावर अवलंबून आहे.
 
आणखी कोण निवडून येतं?
राष्ट्राध्यक्षपदी कुणाची निवड होते याकडे सर्वांचं लक्ष असतं, पण ही निवडणूक फक्त राष्ट्राध्यक्ष निवडण्यापुरतीच मर्यादित नसते.
 
याच निवडणुकीत मतदार काँग्रेसच्या म्हणजे अमेरिकन संसदेच्या नवीन सदस्यांचीही निवड करण्यासाठीही मतदान करतात.
यात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या कनिष्ठ सभागृहातील सर्व 435 जागांसाठी निवडणूक होते, तर सिनेट या वरिष्ठ सभागृहातल एक तृतियांश म्हणजे 33 जागांवरचे सदस्यही निवडले जातात.
 
सध्या हाऊसवर रिपब्लिकन्सचं नियंत्रण आहे तर सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सचं वर्चस्व आहे.
 
ही दोन्ही सभागृहं कायदे पास करण्याचं काम करतात. त्यामुळे दोन्हीपैकी एकाही सभागृहात राष्ट्राध्यक्षांच्या विरोधी पक्षाचं वर्चस्व असेल तर ते सभागृह एकप्रकारे राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवू शकतं.
 
मतदान कोण करू शकतं?
जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असाल आणि तुमचं वय 18 किंवा त्याहून जास्त असेल, तर तुम्ही दर चार वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरता.
 
अनेक राज्यांमध्ये मत देण्यापूर्वी मतदारांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठीची कागदपत्रं दाखवावी लागतात. तुरुंगातले कैद्यांच्या मतदानाबाबतही विविध राज्यांत वेगवेगळे नियम आहेत.
 
बहुतेक लोक निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये मतदानाच्या इतर पर्यायी पद्धतीही अस्तित्त्वात आल्या आहेत.
 
निवडणूकीत कोण जिंकलं हे कधी कळतं?
सहसा निवडणुकीच्या रात्री विजयी उमेदवाराची घोषणा केली जाते, परंतु 2020 साली सर्व मतांची मोजणी करण्याकरिता काही दिवस लागले.
2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी न्यूयॉर्कमध्ये पहाटे 3 वाजता स्टेजवर येत समर्थकांसमोर विजयानंतरचं भाषण दिलं होतं.
 
2000सालीही रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अल गोअर यांच्यातल्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले नव्हते. महिन्याभराने सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर बुश विजेता आहेत, यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
 
विजेता पदभार कधी स्वीकारतो?
राष्ट्राध्यक्ष बदलल्यास निवडणुकीनंतरचा कालावधी ट्रांझिशन किंवा संक्रमण काळ म्हणून ओळखला जातो.
 
नवीन नेत्याला आणि त्याच्या टीमला कॅबिनेटमधल्या मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी आणि पुढच्या कार्यकाळाची आखणी करण्यासाठी हा काळ दिला जातो.
 
त्यानंतर जानेवारीमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांचा एका दिमाखदार सोहळ्यात शपथविधी होतो. या सोहळ्याला इनॉग्युरेशन (Inauguration) म्हटलं जातं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी मध्ये कॅपिटल बिल्डिंग या तिथल्या संसदेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर हा सोहळा होतो.

Published BY- Priya Dixit