खैबर पख्तुनख्वामध्ये प्रवासी वाहनावर अज्ञात बंदूकधाऱ्यांचा गोळीबार
पाकिस्तानच्या वायव्य पख्तुनख्वा प्रांतात एका प्रवासी वाहनावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 11 जण ठार झाले. तर सहा जण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुर्रम जिल्ह्यातील कांज अलीझाई भागात शनिवारी ही घटना घडली.
स्थानिक उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रवासी वाहनावर अचानक गोळीबार केला, त्यात 11 प्रवासी ठार आणि सहा जण जखमी झाले. या जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
सध्या कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. या घटनेमुळे या प्रदेशातील सुरक्षा चिंता आणखी वाढली आहे, ज्यामध्ये हिंसाचार आणि दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत.
शुक्रवारी सशस्त्र हल्लेखोरांनी याच अशांत प्रांतातील कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 20 जण ठार झाले, तर सात जण जखमी झाले.
Edited By - Priya Dixit