मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (19:31 IST)

नितांत सुंदर देश पण अडकलाय ड्रग्सच्या विळख्यात, कसा चालतो आंतरराष्ट्रीय ड्रग व्यापार?

drugs
फर्नांडो दुआर्ते
ड्रग माफियांशी संबंधित हिंसाचारामुळे कधीकाळी शांत पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या इक्वाडोरचं रूपांतर अमली पदार्थांच्या प्रमुख जागतिक व्यापारी केंद्रात झालंय.
 
जगभर पसरलेल्या अमली पदार्थांच्या काही अब्ज डॉलर्सच्या व्यापारामध्ये या देशाने आपला हिस्सा कसा नोंदवला?
 
जानेवारी महिन्यात एकामागोमाग एक हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्या. बंदुकीचा धाक दाखवून एका टीव्ही पत्रकाराचं अपहरण करण्यात आलं, एका सरकारी वकिलास गोळ्या घालण्यात आल्या, हॉस्पिटलवर छापा मारण्यात आला, बॉम्बस्फोटाच्या धमक्या दिल्या गेल्या आणि एक कुख्यात गुंड तुरुंगातून बेपत्ता झाल्यानंतर कैद्यांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना ओलीस धरलं.
 
राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी आणीबाणी जाहीर केली आणि ज्या देशाची अर्थव्यवस्था अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर अवलंबून आहे, त्या देशाचं 'नार्को-स्टेट’ (अमली पदार्थांच्या आहारी गेलेला देश) मध्ये रूपांतर होऊ नये साठी पावलोपावली संघर्ष करतोय, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
 
परंतु लॉस शोनोरोस आणि लॉस लोबोससारख्या टोळ्या किंवा बांदा यांनी यापूर्वीच इथल्या समाजावर आपली पकड मजबूत केली आहे.
 
हा प्रदेश एकेकाळी पर्यटन स्थळ आणि जगातील सर्वोच्च केळी निर्यातदार म्हणून ओळखला जात असे, परंतु आता इक्वाडोर हा “युरोप आणि अमेरिकेला कोकेनचा पुरवठा करणारा सुपरहायवे” झाल्याचं अमेरिकेतील संघटित गुन्हेगारीवर विशेष संशोधन करणारी वॉशिंग्टन स्थित थिंक टँक ‘इनसाइट क्राइम’ ने म्हटलंय.
 
भौगोलिक परिस्थिती हे या बदलमागचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जातंय. कोकेनमधील सर्वांत प्रमुख घटक असलेल्या कोकाचं जगातील सर्वोच्च उत्पादन कोलंबिया आणि पेरुमध्ये घेतलं जातं आणि त्या देशांच्या सीमा इक्वाडोरला लागून आहेत.
 
अमली पदार्थांच्या व्यापारामध्ये अनेक दशकं कळीची भूमिका बजावणारा कोलंबियाचा सशस्त्र गट ‘फार्क’ने 2016 साली शांतता करारावर स्वाक्षरी केली आणि त्यांनी या व्यापारापासून माघार घेतली.
 
परंतु छोटे गट आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी ही पोकळी भरून काढण्याचं काम केलं आणि कोलंबियामध्ये सुरक्षा दलांनी कडक कारवाई केल्यामुळे, अमली पदार्थांना परदेशी बाजारपेठेत पोहोचवण्याठी नवीन मार्ग शोधून काढले. प्रशांत महासागराच्या किनाऱ्याला लागून असलेल्या इक्वाडोरमधील गुआयाक्विल सारख्या बंदरांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
 
आता हा देश वितरणाचं प्रमुख केंद्र झालाय - सर्वप्रथम बोटीद्वारे आणि नंतर विमानाने कोकेनची देशाबाहेर तस्करी केली जाते, शिवाय अमेरिका आणि युरोपमधील बाजारपेठांमध्ये तस्करी करण्यासाठी कधी कधी केळ्यांच्या कंटेनरचा वापर केला जातो. इक्वाडोरच्या टोळ्यांनी मेक्सिकोसारख्या इतर देशांतील ड्रग माफियांसोबत हातमिळवणी केली आहे.
 
युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम (यूएओडीसी) नुसार या टोळ्या शक्तिशाली झाल्यामुळे इक्वाडोरमध्ये 2016 आणि 2022 दरम्यान हत्यांचं प्रमाण चौपट झालंय.
 
सरकारी आकडेवारीनुसार पोलिसांनी 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत 12 ते 17 वयोगटातील 1300 मुलांना खून, अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या संशयावरून अटक केली. कुख्यात टोळ्यांमध्ये सामील होण्यासाठी या मुलांनी शाळा सोडली होती, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
जिनिव्हा येथील थिंक टँक ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह अगेन्स्ट ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज्ड क्राइम’ (जीआयटीओसी) मधील अमली पदार्थ धोरण तज्ज्ञ फेलिप बोतेरो यांच्या मते, "शहरातील गरीब भागात या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.”
 
लहान आणि किशोरवयीन मुलं गुंडांच्या प्रभावाखाली येतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मालकाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करतात, असंही ते म्हणाले.
 
अमली पदार्थांच्या सेवनात वाढ
इक्वाडोरमधील परिस्थितीला जागतिक स्तरावर कोकेन आणि इतर ड्रग्सची वाढलेली मागणी कारणीभूत असल्याचं ‘यूएनओडीसी’चं मत आहे.
 
2021 च्या अलीकडील अहवालात असा अंदाज बांधण्यात आलाय की, की गेल्या 12 महिन्यांत जगभरातील 15-64 वयोगटातील 296 दशलक्ष लोकांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेलं. दशकभरापूर्वीच्या आकडेवारीशी तुलना करता हे प्रमाण 23% अधिक आहे.
 
संयुक्त राष्ट्राच्या मते, सर्वसाधारणपणे कैनाबिस (भांग), अफू, वेदनाशामक, हेरॉइन आणि ऍम्फेटामाइन्स या अमली पदार्थांचा सर्वांत जास्त वापर केला जातो.
 
अलीकडच्या वर्षांत कोकेनच्या उत्पादनातही 'विक्रमी' वाढ झाली आहे.
 
‘यूएनओडीसी’च्या अंदाजानुसार उदाहरण घ्यायचं झाल्यास कोलंबियामध्ये त्याचं उत्पादन 2011 मधील 400 मेट्रिक टन वरून 2021 साली 1800 मेट्रिक टनांपर्यंत वाढलं आहे.
 
संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या मते, कोलंबियामध्ये एक किलो कोकेनची किंमत कमीतकमी 2000 डॉलर आहे. परंतु मूळ ठिकाणापासून दूर जाऊ लागल्यानंतर त्याच्या किमतीत वाढ होऊ लागते. उदा. त्याच एका किलोची किंमत ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर दोन लाख वीस हजार डॉलरपेक्षा अधिक असते.
 
अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील अमली पदार्थ धोरण तज्ज्ञ आयलीन टीग यांचं म्हणणं आहे की, काही देशांमध्ये या बेकायदेशीर व्यापाराला सरकारचं पाठबळ आहे.
 
1980 च्या दशकात याचं सर्वांत योग्य उदाहरण कोलंबियामध्ये पाहायला मिळालं होतं, जेव्हा ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार आणि त्याच्या मेडेलिन कार्टेलनी (टोळी) लोकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार केलेलं. एकेकाळी त्याची संपत्ती 30 अब्ज डॉलर होती.
 
एस्कोबार जिवंत नसला तरी कोलंबियामध्ये अजूनही विविध टोळ्यांचे अस्तित्व आहे. गल्फ क्लॅन ही सर्वांत मोठी टोळी असून तिचे अमेरिकेपासून रशियापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनांसोबत संबंध आहेत.
 
ओटोनी या नावाने प्रसिद्ध असलेले त्यांचे प्रमुख डायेरो ॲंटोनियो उसुगा यांना 2021 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर ही संघटना कमकुवत झाली.
 
मेक्सिको सरकार आणि सिनालोआ संघटनेत अनेक दशकं संघर्ष सुरू होता. अमेरिकन न्याय विभागाच्या मते, अमली पदार्थांची तस्करी करणारी ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली संघटना आहे.
 
एस्कोबारप्रमाणेच सिनालोआ कार्टेलचा म्होरक्या जॅकविन ‘अल चापो' गुझमानवर देखील अनेक पुस्तकं, माहितीपट आणि नेटफ्लिक्सवरील 'नार्कोस' सारख्या मालिका तयार झाल्या आहेत.
 
सध्या तो अमेरिकेतील तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय आणि त्याचा व्यवसाय त्याची दोन मुलं आणि जुना सहकारी इस्माईल झांबादा गार्सिया यांच्यामार्फत चालवला जातोय.
 
मेक्सिकोमधील इतर शक्तिशाली टोळ्या म्हणजे 'जालिस्को न्यू जनरेशन' आणि 'लॉस झेटास', ज्याची सुरूवात मेक्सिकोच्या स्पेशल फोर्सेसच्या एलिट युनिटच्या काही भ्रष्ट सदस्यांनी केली होती.
 
व्यसनांच्या आहारी गेलेलं आफ्रिकेतील पहिलं राज्य
दक्षिण अमेरिकेत तयार होणारे अमली पदार्थ थेट उत्तर अमेरिका आणि युरोपात जात नाहीत. सीमेवरील नियामक एजन्सीसोबतच्या उंदीर-मांजराच्या खेळाला विश्रांती देण्यासाठी आफ्रिका हा एक प्रमुख मार्ग बनला आहे.
 
युरोपला अमली पदार्थांचा साठा पाठवण्यासाठी पश्चिम आफ्रिका हा महत्त्वाचा मार्ग झालाय.
 
उपग्रहांपासून नजर चुकवण्यासाठी अमली पदार्थांचे पार्सल विमानातून समुद्रात टाकण्यात येतं, त्यानंतर पाणबुडी आणि निळ्या कव्हरने झाकलेल्या मासेमारीच्या छोट्या नौकांमार्फत अमली पदार्थांचा हा साठा अटलांटिक मार्गे पुढे पाठवला जातो.
 
‘यूएनओडीसी’चे माजी कार्यकारी संचालक अँटोनियो मारिया कोस्टा यांच्या मते, "अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये आफ्रिकन देश धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत आणि अनेकांना इथे संघटित गुन्हेगारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अमली पदार्थांमधून येणारा पैसा अर्थव्यवस्था आणि समाज या दोघांसाठीही घातक ठरत आहे,” असं ही ते म्हणाले.
 
गिनी बिसाऊ हा जगातील सर्वांत गरीब देश आहे. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी 2000 च्या सुरुवातीच्या दशकात या देशाला आफ्रिकेचा पहिला ‘नार्को-स्टेट’ म्हणजेच व्यसनांच्या आहारी गेलेला देश म्हणून घोषित केलेलं. तिथल्या नेत्यांवर अमली पदार्थांच्या व्यापाराला प्रोत्साहन आणि गुन्हेगारांकडून पैसे घेतल्याचा आरोप होता.
 
हा पैसा सुरक्षा दलांकडे जात असल्याचाही संशय आहे. 2022 मध्ये गिनी बिसाऊचे राष्ट्रपती उमारो सिसोसो एम्बालो यांनी अमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर देशात सत्तापालट करण्याचा कट रचल्याचा आरोप केलेला.
 
13 वर्षांपूर्वी जेव्हा गिनी बिसाऊचे राष्ट्रपती जोआओ बर्नार्डो व्हिएरा यांची त्यांच्याच सैनिकांनी हत्या केली तेव्हा त्याला 'कोकेन कू' (कोकेन सत्तापालट) असं म्हटलं गेलेलं. त्यावेळी देशात अमली पदार्थांच्या व्यापारातून येणा-या पैशावर नियंक्षण मिळवण्यासाठी सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला होता.
 
देशाच्या उत्तरेकडील शेजारच्या मालीमध्ये सशस्त्र बंडखोर गट सक्रिय असून तिथे सर्रासपणे अमली पदार्थांची तस्करी केली जाते.
 
पश्चिम आफ्रिका ते भूमध्य समुद्र आणि युरोपमधील कॉरिडॉरच्या मार्गावर माली येतं.
 
संयुक्त राष्ट्राच्या मते 2015 ते 2020 दरम्यान या प्रदेशात जप्त केलेल्या कोकेनचं प्रमाण वर्षाला 13 किलोवरून वाढून 2022 साली ते 863 किलो झालंय.
 
यूएनओडीसीचे माजी प्रमुख अँटोनियो मारिया कोस्टा यांच्या मते, “अमली पदार्थांचा व्यापार हा सशस्त्र गटांसाठी उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे."
 
“फक्त सेवन केल्याने अमली पदार्थांचं व्यसन जडत नाही, तर त्यातून मिळणारा प्रचंड नफा हेदेखील एक प्रकारचं व्यसन आहे."
 
"द मालियन" या नावाने प्रसिद्ध असलेला आफ्रिकेतील अमली पदार्थांचा सर्वात कुख्यात व्यापारी अल हाद्ज अहमद इब्न इब्राहिम याला 2019 साली अटक झाल्यानंतर मोठया प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
 
मोरोक्कोच्या तुरुंगात इब्राहिम 10 वर्षे शिक्षा भोगतोय. तो मूळचा मालीच्या उत्तरेकडील बदूइन या वाळवंटी प्रदेशातला आहे.
 
जेउन आफ्रिका नियतकालिकानुसार सहाराच्या एस्कोबारने आफ्रिकेत सेकंड-हँड कार विकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेली, ज्यामुळे त्याला व्यावसायिक मार्ग, कस्टम आणि इतर गोष्टींबद्दल माहिती मिळाली.
 
सोन्याच्या व्यापारात उडी घेतल्यानंतर तो अटलांटिक पलिकडील कोकेनच्या व्यापारात सक्रिय झाला आणि त्याच्या अटकेच्या वेळी त्याच्याकडे ब्राझील, रशिया आणि मोरोक्कोसह अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने मालमत्ता होत्या, असं सांगितलं जातं.
 
अंमली पदार्थांच्या जागतिक व्यापारात पूर्व आफ्रिकेचंदेखील योगदान आहे. टांझानियामधील दार एस सलाम आणि केनियामधील मोम्बासा ही बंदरं दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये पाठवल्या जाणाऱ्या अमली पदार्थांसाठी ट्रान्झिट मार्ग म्हणून काम करतात.
 
‘यूएनओडीसी’च्या म्हणण्यानुसार, या ठिकाणांहून हेरॉईन, ॲम्फेटामाइन्स आणि गांजा देखील पलीकडे पाठवला जातो. या प्रदेशात नैरोबी आणि आदिस आबाबा सारखी मोठी आंतरराष्ट्रीय विमानतळं देखील आहेत.
 
संपूर्ण खंडात बेकायदेशीरपणे अमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचे पुरावे हाती लागत असल्याने अधिकारी चिंताग्रस्त आहेत.
 
‘यूएनओडीसी’च्या अंदाजानुसार 2021 मध्ये पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील 10% लोकांनी गांजाचे सेवन केले. जागतिक स्तरावर हा आकडा 4% आहे.
 
यादरम्यान कोविड-19 च्या साथीनंतर आशियामध्ये सिंथेटिक औषधांचा व्यापार झपाट्याने वाढला आहे.
 
गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखलं जाणारं थायलंड, लाओस आणि म्यानमारच्या सीमेवरील दुर्गम जंगल क्षेत्र सिंथेटिक औषधं आणि हेरॉइनचं जागतिक केंद्र बनलंय.
 
2023 मध्ये संयुक्त राष्ट्राने दिलेल्या अहवालानुसार अफगाणिस्तानला मागे टाकून म्यानमार हा अफूचं (हेरॉइनचा मुख्य घटक) उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा देश बनला आहे.
 
म्यानमारमध्ये अनेक दशकांपासून सरकारशी लढणाऱ्या बंडखोर गटांचं उत्पन्न अमली पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून आहे. आणि गृहयुद्धाच्या काळात गेल्या वर्षभरात खसखसची लागवड वाढली आहे.
 
सॅम गोर हा गोल्डन ट्रँगलमधील सर्वात कुख्यात गट असून ते आशियाई टोळ्याचं एक सिंडिकेट आहे.
 
‘यूएनओडीसी’च्या अंदाजानुसार 2018 मध्ये सॅम गोर यांनी क्रिस्टल मेथच्या व्यापारातून एका वर्षात तब्बल आठ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती.
 
ऑस्ट्रेलियन पोलिसांना खात्री आहे की, देशातील 70% अमली पदार्थांसाठी हेच जबाबदार आहेत.
 
मेथाम्फेटामाइन, हेरॉईन आणि केटामाइनला चहाच्या डब्यांमध्ये भरून त्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.
 
नेदरलँड्सने 2021 साली ‘एशियाचा अल चापो' म्हणून ओळखल्या जाणारा चिनी-कॅनडियन व्यापारी त्से ची लोप याला सिंडिकेटचा प्रमुख असल्याच्या आरोपाखाली अटक केली.
 
त्से ची लोप याला डिसेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या हवाली करण्यात आलं. त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
अमेरिकेच्या ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या आशियाई अमली पदार्थ व्यापार तज्ज्ञ वांडा फेल्बाब ब्राऊन सांगतात की, आशियामध्ये अमली पदार्थांबाबत लोकं रानटी वृत्तीने वागतात त्यामुळे इथले गट शांतपणे काम करतात.
 
फेल्बाब ब्राउन यांनी सीरियाला ‘नार्को स्टेट’ म्हटलंय. गरिबांचं कोकेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टॅगान या अमली पदार्थाची इथे मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.
 
पश्चिम आशियातील विशेषतः आखाती देश आणि सौदी अरेबियामध्ये याचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं.
 
2011 पासून गृहयुद्धात अडकलेला सीरिया हा कॅप्टॅगानचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक देश मानला जातो आणि देशाच्या एकाकी पडलेल्या राजवटीसाठी अमली पदार्थ हे उत्पन्नाचं साधन असल्याचं दिसतं.
 
फेल्बाब ब्राऊन यांच्या मते, कॅप्टॅगानचा पश्चिम आशियातील व्यापाराची उलाढाल वर्षाला $5 अब्ज इतकी आहे आणि यातील "मोठा" वाटा “असादच्या राजवटीला चालना देण्यासाठी” वापरला जातो.
 
जून 2023 मध्ये बीबीसी न्यूज अरेबिक आणि शोध पत्रकारिता नेटवर्क ‘ओसीसीआरपी’ यांचा संयुक्त तपास अहवाल प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये कॅप्टॅगान व्यापार आणि राष्ट्रपती बशर अल-असद यांचं कुटुंब आणि सीरियन सैन्य यांच्यात परस्पर संबंध असल्याची माहिती समोर आली.
 
सीरियाच्या सरकारने बीबीसीच्या प्रश्नांना उत्तर दिली नसली, तरी यापूर्वी करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले होते.
 
चीन आणि फेंटानिल
जाता जाता चीनचा उल्लेखही इथे करायला हवा. अमेरिकेने चिनी कंपन्या आणि तिथल्या लोकांवर ‘फेंटानिल’ या शक्तिशाली आणि अनेकदा प्राणघातक सिंथेटिक ओपिओइड मध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे उत्पादन केल्याचा आरोप केला आहे.
 
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे रसायन अमेरिकेत वितरित करण्यापूर्वी मेक्सिकोला पाठवलं जातं, जिथे फेंटानिल तयार केलं जातं.
 
अमेरिकेत अमली पदार्थांमुळे होणाऱ्या बहुतांश मृत्यूंसाठी फेंटानिल जबाबदार असल्याचं मानलं जातं. चीनने फेंटानिलच्या तस्करीबाबतचे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
चीनने म्हटलंय की, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे फेंटानिलची अमेरिकेत बेकायदेशीरपणे तस्करी होत नव्हती आणि याच्याशी संबंधित सर्वाधिक मृत्यू अमेरिकेन वापरकर्त्याचे आहेत, असं अजिबात नाहीए.
 
वांडा फेल्बाब ब्राऊन म्हणतात की, या रसायनांचं उत्पादन थांबवणं कठीण आहे कारण “त्याची तस्करी मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांऐवजी कौटुंबिक पातळीवर केली जाते.”
 
“सोप्या पद्धतीने या पदार्थांची तस्करी करता येते आहे आणि यातून मेथाम्फेटामाइन्स इतकाच नफा होतो."
 
दरम्यान अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, चीनी कंपन्या मेक्सिकोच्या संघटनांना फेंटानिलच्या उत्पादनासाठी तांत्रिक मदत पुरवतात याचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत.
 
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यूयॉर्क न्यायालयाने चार चिनी नागरिकांना फेंटानिलच्या तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरवलेलं.
 
या आरोपींपैकी एक व्यापारी कुन जियांग हा अमेरिकेच्या औषध नियामक प्रशासनाच्या वॉन्टेडच्या यादीत आहे.