गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 जुलै 2024 (10:26 IST)

बायडननंतर ट्रम्प यांना आव्हान कोण देणार? हॅरिस की दुसरे कोणी, पुढे काय होणार?

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अमेरिकेतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
 
राष्ट्र्ध्यक्ष पदासाठीच्या या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस उमेदवार असणार अशी चर्चा आहे.
 
पण हॅरिस यांच्या नावाची चर्चा असली तरी त्या अद्याप बायडन यांच्या जागी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या अधिकृत उमेदवार जाहीर झालेल्या नाहीत.
 
बायडन यांनी फक्त त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या नावावर पक्षाकडून अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
 
अमेरिकेत पक्षाच्या उमेदवार ठरवण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. उमेदवाराला आधी स्वतःच्या पक्षात बहुमत सिद्ध करावं लागतं. त्यानंतर अधिकृत घोषणा झाल्यानंतर तो राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार ठरतो.
 
त्यामुळं आता डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते काय निर्णय घेणार आणि कुणाची निवड करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे.
 
निवडीचे स्वातंत्र्य डेलिगेट्सना
यापूर्वी अमेरिकेत अशाप्रकारे विद्यमान राष्ट्राध्यक्षानं निवडणुकीत उमेदवारी सोडण्याचा प्रकार 1968 मध्ये पाहायला मिळाला होता. त्यावेळी लिंडन बेन्स जॉन्सन यांनी माघार घेतली होती.
 
बायडन यांनी उमेदवारीसाठी आवश्यक असलेली 3,896 डेलिगेट्सची मते आधीच मिळवलेली आहेत. पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी आवश्यक आकड्यापेक्षा हा आकडा मोठा होता.
 
आता बायडन यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवल्यामुळं, त्यांचीच राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड होण्याची जास्त शक्यता आहे.
 
पण तसं असलं तरी बायडन यांना पाठिंबा दर्शवलेले 3896 डेलिगेट्स आता इतर कुणालाही पाठिंबा देण्यास स्वतंत्र आहेत. त्यामुळं ते काय निर्णय घेणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.
 
ओपन कनव्हेंशन होणार?
डेमोक्रॅटिक नॅशनल कनव्हेंशन 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये पक्षाला नवीन उमेदवारावर एकमत करण्यात अपयश आलं तर 1968 नंतर प्रथमच ओपन कनव्हेंशनची स्थिती निर्माण होऊ शकते.
 
ओपन कनव्हेंशन म्हणजेच, डेमोक्रॅटिक पक्षातून राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीची इच्छा असलेले एकापेक्षा जास्त उमेदवार समोर येऊ शकतात. त्यांच्यात होणारी ही निवड प्रक्रिया असेल.
 
त्यांच्यातून पक्षाचा उमेदवार निवडण्यासाठी अंतर्गत मतदान प्रक्रिया राबवली जाईल. या प्रक्रियेत कुणाला मत द्यायचं याचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार पक्षाच्या डेलिगेट्सकडे असेल.
 
या निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक उमेदवारांला बॅलेट पेपरवर त्याचं नाव येण्यासाठी किमान 300 डेलिगेट्सच्या पाठिंब्याची म्हणजेच सह्यांची गरज असते.
 
पण या सह्यांमध्ये एका राज्यातील 50 पेक्षा जास्त डेलिगेट्सच्या सह्या घेता येत नाहीत. म्हणजेच किमान सहा अनेक राज्यांतून त्यांना पाठिंबा मिळवावा लागतो.
 
त्यानंतर 3900 डेलिगेट्सच्या मतदानाचा पहिला टप्पा होईल. त्यात डेमोक्रॅट्सच्या प्रामाणिक मतदारांचाही समावेश असेल. या पहिल्या टप्प्यात एखाद्या उमेदवाराला बहुमत मिळालं तर तो पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरेल.
 
पण, पहिल्या टप्प्यानंतरही कोणत्याही उमेदवाराला बहुमत मिळालं नाही, तर मतदानाचे आणखी दोन टप्पे होऊ शकतात.
 
पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवाराला किमान 1976 मते मिळण्याची आवश्यकता असते.
 
हॅरिस यांना कोण देऊ शकतं आव्हान?
गेल्या काही दिवसांत जो बायडन यांच्या उमेदवारीसंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांच्याऐवजी नवीन उमेदवार कोण असणार याच्याही चर्चांना सुरुवात झाली.
 
या चर्चांमध्ये कमला हॅरिस यांच्या शिवाय आणखीही काही नावं समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं.
 
मिशिगनचे डेमोक्रॅटिक गव्हर्नर ग्रेचेन व्हाइटमर या त्यापैकी एक. बायडन यांनी माघार घेतली तरी आपण निवडणूक लढवण्याचा विचार करत नसल्याचं, ग्रेचेन म्हणाल्या होत्या. तरीही त्यांचं नाव या यादीत समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं.
 
रविवारी बायडन यांनी माघर घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्या म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प यांना रोखण्यासाठी आणि डेमोक्रॅट्सच्या विजयासाठी काहीही करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
डेमोक्रॅट्समधील उमेदवारीच्या इतर पर्यायांचा विचार करता कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम, पिट बटिगिग आणि पेन्सिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांची नावंही चर्चेत आहेत.
 
पण जर कमला हॅरिस यांच्याच नावावर राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीबाबत एकमत झालं तर वरिल नावं ही उप-राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी विचारात घेतली जाऊ शकतात.