सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated :नाशिक , सोमवार, 11 मार्च 2019 (10:30 IST)

मोदी सरकार ही देशात राष्ट्रीय आपत्ती - शरदचंद्र पवार

देशात आजवर पहिला असा पंतप्रधान बघितला आहे की विरोधी पक्षातील लोकांचा सन्मान न राखता सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना योग्य वागणूक न देता त्यांच्यावर टीका टिपणी करतात. आजवर देशात विरोधकांचा सन्मान केला जात होता. मात्र सद्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नाही. प्रधानमंत्री हा देशाचा असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो मात्र सद्या देशातील मोदींचे सरकार ही राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका खासदार शरदचंद्र पवार यांनी केली. तसेच राज्यांच्या प्रमुखाने विरोधकांशी सन्मानाने वागविण्याची गरज आहे मात्र ते देखील राज्यात दिसत नाही. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जामिनावर आहात अशी भाषा केली जाते हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नाही अशी टीका त्यांनी केली. छगन भुजबळ हे अडचणीतून बाहेर पडले असतांना महाराष्ट्रात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ते लढता आहे ही गौरवाची बाब आहे असे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संयुक्तिक बैठक पार पडली. त्यावेळे ते बोलत होते.
 
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री विनायकदादा पाटील, प्रशांत हिरे, आ. हेमंत टकले, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार निर्मला गावित, नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, डॉ.अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष शरद आहेर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,शिरीष कोतवाल, शैलेश कुटे, मुरलीधर पाटील, डॉ.हेमलता पाटील, राहुल दिवे,वत्सला खैरे, अश्विनी बोरस्ते, लक्ष्मण जायभावे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी शरदचंद्र पवार म्हणाले की, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्ह्णून आपण निवडून येतो त्यानंतर व्यापक दृष्टीकोनातून देशातील सर्व सामान्य जनतेच्या प्रतिनिधित्व करण्याची आवश्यकता आहे.एकदा लोकप्रतिनिधी झाल्यावर आपण पक्षाचे नव्हे तर जनतेचे प्रतिनिधित्व करत असतो ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, लोकशाहीला संसदीय पद्धतीने दिशा देण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले त्यामुळे आजवर लोकशाही टिकली. जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांनी केली त्यासाठी त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. इंदिरा गांधी यांनी देशाचा इतिहास नाही तर भूगोल बनविला इतकी कामे त्यांनी केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील गरीब जनता ही इंदिरा गांधी यांच्याशी एकरूप झाली होती. त्यामुळे त्या लोकप्रिय बनल्या होत्या. मात्र आजचे प्रधानसेवक की देशात गेल्या साठ वर्षात काय केले अशी भाषा करतात हे कोणालाही न पटणारे आहे अशी टीका त्यांनी केली. ज्या घरण्यावर आजचे पंतप्रधान टीका करतात त्या इंदिरा गांधी देशाला स्थिर सरकार दिले, देशाची प्रतिष्ठा वाढविली, राजीव गांधी यांनी आधुनिकतेची कास धरल्याने आज देशात तंत्रज्ञान विकास झाला त्यांनी देशासाठी योगदान दिले त्यांच्यावर टीका केली जाते.हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नसून या  भूमिकेला सक्त विरोध करून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे ते एकत्रही आले आहे. त्यामुळे सर्व निर्णय एकत्रित रित्या घेतले जात आहे. असे सांगून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्यासाठी सारखेच आहे त्यात कुठलाही दुजाभाव नाही असे त्यांनी सांगितले.
 
यावेळी माजी मंत्री विनायक दादा पाटील म्हणाले की, देशातील पंतप्रधान सुद्धा खोट बोलू शकतात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कधी एवढे खोटे बोलू शकत नाही. अशा परिस्थितीत गेले पाच वर्षे सरकार चालू आहे. देशात पुन्हा यांचे सरकार आले तर पुन्हा देशात निवडणूका होतील की नाही यात शंका आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही नेते फक्त बोलघेवडे असतात तर काही प्रत्यक्ष बांधकाम करत असतात त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे बांधकाम करणारे नेते असून त्यांनी जिल्ह्यात अनेक विकासाची कामे केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आघाडीकडून जो उमेदवार देण्यात येईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नात्यांनी आपली मनोगते व्यक्त करून लोकसभा निवडणुकीत आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.