तर पवारांना पंतप्रधान करू- राहुल
कॉग्रेसलाच बहुमत मिळणार ही काळ्या दगडावरची रेष असून, राष्ट्रवादी कॉग्रेसला कॉग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या तर शरद पवार यांना पंतप्रधान बनवू असे मत कॉग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी व्यक्त केले. पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नांची हवा काढतानाच आधी त्यांना बहुमत तर मिळू द्या अशी खिल्लीही त्यांनी उडवली. राहुल यांनी आज पत्रकारपरिषदेत विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. भारतातील दहशतवाद मोडून काढणे शक्य असून, यासाठी साऱ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लिट्टे ही दहशतवादीच संघटना असून, श्रीलंकन सरकारने तमिळ जनतेच्या सुरक्षिततेसाठी खास उपाययोजना करण्याची मागणी राहुल यांनी केली. श्रीलंकन सरकारने प्रभाकरणला कात्रीत पकडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने तेथील तमिळ नागरिकांचे हाल होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे अस्तित्व या निवडणुकांनंतर संपुष्टात येणार असून, एनडीएने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी सुरू करावी असा सल्लाही त्यांनी एनडीएला दिला आहे. डाव्या पक्षांशी केवळ वैचारिक मतभेद असून, त्यांचे आणि आमचे विचार काही प्रमाणात सारखेच असल्याचे राहुल म्हणाले. काही झाले तरी मनमोहनच पंतप्रधान आपल्याला पंतप्रधान बनण्याची मुळीच इच्छा नसून, काही झाले तरी मनमोहन सिंग हेच पंतप्रधान असतील असे मत राहुल यांनी व्यक्त केले. मनमोहन यांच्या कारकिर्दीत भारताचा खर्या अर्थाने विकास झाल्याचे सांगतानाच डावे पक्षही निवडणूकांनंतर मनमोहन यांनाच आपला पाठिंबा देतील असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला.