महाराष्ट्रात ४५ टक्के मतदान
पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात गुरुवारी झालेल्या तिसर्या टप्प्यात प्राथमिक आकडेवारीनुसार सरासरी अंदाजे ४० ते ४५ टक्के मतदान झाले. या टप्प्यात एकूण १० मतदारसंघातील १९६ उमेदवारांचे नशिब मशिनबंद झाले आहे.गुरुवारी (३० एप्रिल) राज्यातील १० लोकसभा मतदारसंघासह देशातील १०७ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात मुंबई शहर व उपनगरातील मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, तसेच ठाणे जिल्ह्यातील ठाणे, पालघर, भिवंडी आणि कल्याण या मतदारसंघाचा यात समावेश होता. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदानासाठी तरुणांचा उत्साह लक्षणीय होता. काही भागात दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार बाहेर पडत होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झालेल्या लोकसभा मतदारसंघांची प्राथमिक अंदाजानुसार सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे - मुंबई दक्षिण मध्य - ३८, मुंबई उत्तर पूर्व - ४२.२८, मुंबई उत्तर मध्य - ४१.८२, मुंबई उत्तर पश्चिम - ४९.१५, मुंबई दक्षिण - ४५, मुंबई उत्तर - ४६.४९, ठाणे - ४०, पालघर - ४५, भिवंडी - ३६.७४, कल्याण - ४०.मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी ३३ हजार कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या चारही मतदार संघातील ५२ मतदान केंद्रे संवेदनशील होती. या सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे शांततेत मतदान झाले, असे उपनगर जिल्हाधिकारी विश्वास पाटील यांनी सांगितले. मुंबईतील सहा व ठाण्यातील चार मतदारसंघातील १५ हजार ८७२ केंद्रांवर मतदान झाले. ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहुल पालघर मतदारसंघात चाळीस टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत मुंबईत मतदानाचा वेग अगदीच संथ होता. दक्षिण मुंबई या गर्भश्रीमंतांच्या भागात दुपारपर्यंत अवघे २८ टक्के मतदान झाले होते. मुस्लिम बहुल भिवंडी व उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ३२ टक्के मतदान झाले.