मेरा सुंदर सपना 'टूट' गया!
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने अनेकांची स्वप्ने चक्काचूर झाली आहेत आणि ही स्वप्ने पाहणार्यांना जमिनीवर आणून ठेवले आहे. भाजपचे 'पीएम इन वेटिंग' लालकृष्ण अडवानी हे या रांगतले पहिले. अडवानींचे हे स्वप्न आता स्वप्नच राहिल्याचे दिसते आहे. ते पूर्ण होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यांच्याशिवाय या शर्यतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजद प्रमुख लालू यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, लोजपाचे रामविलास पासवान व माकप नेता प्रकाश करात यांची नावे होती. अडवानींनी मनमोहनसिंग यांना निवडणुकीच्या प्रचारसभांत 'कमकुवत पंतप्रधान' असे हिणवून आपल्या इच्छेला बळकटी दिली होती. दुसरीकडे 'ह्रदयात महाराष्ट्र' ठेवणार्या शरद पवारांनी कायमच 'नजरेसमोर राष्ट्र' ठेवले होते. पण कॉंग्रेसला भरभरून दान देणार्या मतदारांना पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रातही तोंडावर आपटवले आहे. पवारांनी या पदासाठी चांगलीच 'फिल्डिंग' लावली होती. शिवसेनेसारख्या एरवी 'जातीयवादी' असलेल्या पक्षाचा पाठिंबा घ्यायलाही ते तयार झाले होते. पण त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव, लोजपाचे रामविलास पासवान, सपाचे मुलायमसिंह यादव या सगळ्यांनी एकत्र येऊन चौथी आघाडी बनवली. लालूंनी आपणही या पदासाठी तयार असल्याचे सांगितले. पण दुर्देव. ही आघाडी पार कोसळली. मायावतींनी तर आपल्याला पंतप्रधान म्हणून जाहीर करण्याचे तिसर्या आघाडीच्या नेत्यांना सांगितले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्या या पदासाठी प्रयत्नशील होत्या. पण निकाल असे काही आले की त्यांची इच्छा मनातच राहिली. प्रकास करात यांनी आपण या शर्यतीत नाही, असे कितीदाही सांगितले तरी त्यांची इच्छा अप्रत्यक्षपणे का होईना होतीच, हेही जाणवत होते. पण मतदारांनी डाव्यांना बंगाल आणि केरळमध्येही आडवे पाडल्यानंतर या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची तोंडेच बंद झाली आहेत.