लोकसभेच्या महायज्ञाची पूर्णाहूती
तळपत्या उन्हात आज लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांनी पूर्णाहूती देत गेला महिनाभर सुरू असलेल्या महायज्ञाची सांगता केली. सात राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील ८६ जागांवरील १४३२ उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले. सोळा मेस ही यंत्रे उघडली जाऊन दिल्लीच्या राजकीय मंचावर कोणाचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट होईल. दरम्यान, आज झालेल्या मतदानाला हिंसाचाराचे गालबोटही लागले. पंजाबात सत्तारूढ शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी मोगा नावाच्या खेड्यात एका खासगी वृ्तवाहिनीच्या दोन पत्रकारांवर हल्ला चढवला. वाहनातून शस्त्रे घेऊन जाणार्या पक्ष कार्यकर्त्यांचे रेकॉर्डिंग या पत्रकारांनी केल्याचा राग आल्याने हा हल्ला चढविण्यात आल्याचे समजते. तिकडे कोलकत्यातील बालीगुडीमध्ये तृणमुल कॉंग्रेस व माकप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक कार्यकर्ता मरण पावला. लोकसभेच्या ८५ जागांसाठी आज मतदान झाले. दुपारी तीनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी. पंजाब ५०.०१, उत्तराखंड ४६, तमिळनाडू ४५.८६, हिमाचल प्रदेश ३८.७२, पश्चिम बंगाल ४५, उत्तर प्रदेश ४१, पुडुच्चेरी ५१.८८, चंडिगड ५३, जम्मू व काश्मीर ३४. उत्तर प्रदेशात पीलभीतमध्ये दुपारी तीनपर्यंत सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के मतदान झाले होते. वादग्रस्त ठरेलले वरूण गांधी हे भाजपचे युवा नेते येथील प्रमुख उमेदवार आहेत. जयाप्रदा व आझम खान यांच्यातील भांडणामुळे लक्षवेधी ठरलेल्या रामपूरमध्येही ४१ टक्के मतदान झाले. भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी व कॉंग्रेसच्या नूर बानो येथील प्रमुख उमेदवार आहेत. अझहरूद्दीन उमेदवार असलेल्या मुरादाबादमध्ये ४० टक्के मतदान झाले. लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी, माकप नेता वृंदा करात, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करूणानिधी व अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता, अभिनेत्री व राजकारणी जयाप्रदा, दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत, संगीतकार ए. आर. रहमान यांनी आज सकाळीच मतदान केले. मतदान व्यवस्था- पाचव्या व अंतिम टप्प्यासाठी पाच लाख मतदान कर्मचारी व २५४ पर्यवेक्षक नेमले होते. या टप्प्यात एकूण ९३ महिला उमेदवार होत्या. दहा कोटी ७८ लाख मतदार होते. एक लाख २१ हजार ६३२ मतदार केंद्रे होती. यांचे भवितव्य आज ठरले- गृहमंत्री पी. चिदंबरम (शिवगंगा), पंचायती राज मंत्री मणिशंकर अय्यर (मयलादुतुरै) मेनका गांधी (आंवला) त्यांचे चिरंजीव वरुण गांधी (पीलीभीत), माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू (अमृतसर) माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन (मुरादाबाद), जयाप्रदा (रामपूर) या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य आज यंत्रात बंद झाले. या राज्यात झाले मतदान- या टप्प्यात हिमाचल प्रदेशातील चार, जम्मू- काश्मीरमधील दोन, पंजाबच्या नऊ, तमिळनाडूतील सर्व ३९, उत्तर प्रदेशातील १४, उत्तराखंडातील पाच, पश्चिम बंगालमधील ११, चंडीगड व पुदुच्चेरीतील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल.