वरूण आता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत
भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नेते वरूण गांधींना आता मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. वरूण आज रामलीला मैदानातील हनुमान मंदिरात पुजेसाठी गेले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील बाब स्पष्ट केली. कडव्या हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर वरूण यांची लोकप्रियता भलतीच वाढली आहे. त्यात 'रासुका' लावल्यानंतर तर पक्षाने त्यांना 'हिरो' केले. या लोकप्रियतेने वरूण यांच्या समर्थकांनाही हुरूप आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रामशरण वर्मा यांनी वरूण यांना उत्तर प्रदेशचे भावी मुख्यमंत्री असे जाहिर करूनही टाकले होते. तिथे उपस्थित साधू-संतांनीही वरूण यांच्या भाळी आशीर्वादाचा टिळा लावला होता. यासंदर्भात वरूण यांना विचारले असता, वर्मा यांनी सांगितले त्यात चुक काय? असा प्रतिसवाल केला. आपण प्रचारासाठी जेथे गेलो तिथे भाजप नक्की जिंकेल, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, वरूण यांच्यावर लावलेला रासुका हटविण्याच्या सल्लागार बोर्डाच्या निर्णयाविरूद्ध उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.