चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
राजधानी दिल्लीसह आठ राज्यांमध्ये लोकसभेसाठीच्या 85 जागांवर मतदान होत असून, सकाळी सात वाजेपासून या मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. आज अनेक दिग्गज नेते निवडणूक रिंगणात असून, यात भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी, शत्रुघ्न सिन्हा, सपा नेते मुलायम यादव, रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी या नेत्यांचे भाग्य आज मतपेट्यांमध्ये बंदिस्त होणार आहे. सात राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशात आज मतदान होत असून, राजधानी दिल्लीच्या सात, बिहारच्या तीन, राजस्थानच्या 25 पश्चिम बंगालच्या 17, जम्मूतील एका जागेवर तर उत्तर प्रदेशच्या 18 जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. बिहारमधील काही नक्षल प्रभावित मतदान केंद्रांवर केवळ दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान घेण्यात येणार आहे. मतदानासाठी देशभरातील साडे सहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना 'इलेक्शन ड्यूटी' देण्यात आली आहे. तर हजारो पोलिस आणि राखीव दलाचे जवान सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहे. आज होत असलेल्या मतदानातील 12 हजार गावांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे.