सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

शरद पवारांची नजर पंतप्रधानपदावर

तिसर्‍या व चौथ्या आघाडीचे सहाय्य घेणार?

कोणत्याही आघाडीला बहूमत मिळणार नाही, याची 'पोल' एक्झिट पोलने खोलल्यानंतर कुंपणावर असणार्‍या नेत्यांच्या पंतप्रधानपदाच्या आशा पल्लवीत झाल्या असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आघाडीवर आहेत. त्यासाठी पवार सातत्याने तिसर्‍या आणि चौथ्या आघाडीच्या नेत्यांशी संपर्कात आहेत. भाजप व कॉंग्रेस आघाड्या २०० जागांच्या आत आटोपल्या तर पवार पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहिर करतील, व त्यांना तिसरी व चौथी आघाडी पाठिंबा देईल, असे चित्र आहे.

पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. यावेळच्या निवडणुकीत तर ते त्यासाठीच उतरले आहेत. आधी त्यांनी स्वतःचे नाव जाहीरही केले होते, मग मात्र, कमी जागा मिळाल्यास मी पंतप्रधान कसा होईन, असा मानभावी सवालही नंतर केला होता. मात्र, आता कोणत्याच आघाडीला स्पष्ट बहूमत मिळणार नाही, हे स्पष्ट होताच, त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली आहे.

एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दोन्ही मुख्य आघाड्या २०० जागांच्या आतच रहातील असे दिसते आहे. तिसरी आघाडीही शंभराच्या आसपास घोटाळते आहे. या आघाडीत अखिल भारतीय अण्णा द्रमुक, सेक्युलर जनता दल व तेलगू देसम हे प्रमुख पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांचे नेते पवारांचे मित्र आहेत. शिवाय डाव्यांनाही पवारांचे वावडे नाही. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव व लोकजनशक्तीचे रामविलास पासवान हेही पवारांना समर्थन देतील असे दिसते आहे. पवार त्यासाठी सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याचे कळते.

तिसरी आघाडी, चौथी आघाडी मिळून पवारांचा पाठिंबा दीडशे सदस्यांच्या पलीकडे जातो. मग राहिलेले पक्ष व कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन पंतप्रधानपदावर आरूढ होण्याचा पवारांचा आडाखा आहे. या परिस्थितीत मराठी मुद्यावर शिवसेनाही पवारांना पाठिंबा देऊ शकतो. शिवसेना मनोहर जोशींनी कालच तसे संकेत दिले आहेत. शिवाय खुद्द पवारांनी उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून याविषयी चर्चा केल्याचे समजते आहे.

पवारांच्या पंतप्रधानपदाला जयललिता, बिजू जनता दलाचे प्रमुख व ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही पाठिंबा दिला आहे. तिकडे प्रजाराज्यमचे अध्यक्ष चिरंजीवी यांनीही पवारांना पाठिंबा देण्याचा विचार करू असे सांगितले आहे. त्यामुळे व्यापक स्तरावर पवारांना पाठिंबा मिळण्यात अडचण येईल, असे काही वाटत नाही. प्रत्यक्षात सगळी गणिते गृहतिकांवर आधारीत आहेत. निकाल आल्यानंतर मात्र, यासंदर्भातील हालचाली आणखी वेगाने होतील.