1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

शेवटच्या आहुतीसाठी ४८ तासांचा अवधी

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या लोकशाहीच्या यज्ञातील शेवटची आहुती पडण्यासाठी आता जेमतेम ४८ तास उरले आहेत. त्यासाठीचा प्रचार आज पाच वाजता संपला. शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलेला दिसला.

लुधियानात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने काल 'हम एक है' चा नारा दिला. तर कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी चेन्नईत द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांच्या साथीने 'हम (अभी भी) साथ साथ है'चा बिगुल वाजविला. महिनाभर सुरू असलेले हे रणकंदन आज थांबले आणि आता सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी दिल्लीची वाट धरू लागले आहेत.

पंधरावी लोकसभा स्थापन करण्याच्या दृष्टीने ८५ टक्के काम झाले आहे. आता अंतिम पाचव्या टप्प्यात नऊ राज्यात व केंद्र शासित प्रदेशातील एकूण ८६ जागांसाठी बुधवारी मतदान होईल. त्यानंतर सर्व टप्प्यातील एकत्रित मतमोजणी येत्या सोळा मेस होईल. या मतमोजणीच्या मंथनातून काय बाहेर येते, आणि कुणाच्या हाती सत्तेची दोरी जाते आणि मधल्या मध्ये कोण लोण्याचा गोळा पटकावतो हेही स्पष्ट होईल.

पाचव्या टप्प्यात गृहमंत्री पी. चिदंबरम (शिवगंगा), पंचायती राज मंत्री मणिशंकर अय्यर (मयलादुतुरै) मेनका गांधी (आंवला) त्यांचे चिरंजीव वरुण गांधी (पीलीभीत), माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू (अमृतसर) माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन (मुरादाबाद), जयाप्रदा (रामपूर) हे प्रमुख उमेदवार भाग्य आजमावत आहेत.

या टप्प्यात हिमाचल प्रदेशातील चार, जम्मू- काश्मीरमधील दोन, पंजाबच्या नऊ, तमिळनाडूतील सर्व ३९, उत्तर प्रदेशातील १४, उत्तराखंडातील पाच, पश्चिम बंगालमधील ११, चंडीगड व पुदुच्चेरीतील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल.