आयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल
आयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर वन ठरली आहे. तेल आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने (ओएनजीसी) आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या सौरचुलीने पहिला क्रमांक पटकावून १० लाखांचे पारितोषिक पटकावले. सोबतच अशा एक हजार सौरचुली बनवण्याची ऑर्डरही ओएनजीसीने दिली. सादर केलेल्या सौरचुलींच्या फॉम्युर्ल्याबाबत तज्ञ समितीसमोर चर्चा झाली. या समितीच्या अध्यक्षपदी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर होते.
दीड हजार स्पर्धकांमधून या समितीने २० जणांची निवड केली. या २० स्पर्धकांना २४ फेब्रुवारी रोजी त्यांचे सौरचुलीचे मॉडेल सादर करण्यास सांगितले गेले. त्यातून अंतिम सहा स्पर्धकांची निवड केली गेली. या सहा स्पर्धकांना नवी दिल्ली येथे त्यांच्या सौरचुलीचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले गेले. २३ एप्रिल रोजी या सहा स्पर्धकांना दिवसाच्या वेळी तसेच सूर्यास्तानंतर त्यांच्या सौरचुलीवर विविध हिंदुस्थानी खाद्यपदार्थ बनवण्यास सांगितले गेले.