गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (22:18 IST)

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते ’सासरवाडी’ चे उद्घाटन

prajakta mali
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिकांच मन जिंकणारी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सासरवाडीत दाखल झाली. निमित्त होते “सासरवाडी” या आस्वादगृहाचे. नवी मुंबई, सीबीडी बेलापुर येथे सेक्टर ११ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’हया हटके महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचा आनंद देणाऱ्या नव्या आस्वादगृहाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘सासरवाडी’असे ठिकाण आहे की जिथे माहेरच्या व सासरच्या लोकांना सतत जावेसे वाटते. तिथे जावई मंडळीची चांगली बडदास्त ठेवली जाते, त्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जातात. मी मराठी खाद्यपदार्थांची, विशेष करून पिठलं भाकरीची चाहती आहे. या हॉटेलच्या संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ मिळवून हा चांगला प्रयोग केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक वाटते, अशा शब्दात प्राजक्ता माळीने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तर गेली दहा वर्षे असे मराठी चवीचे खास हॉटेल काढावे हे आपले स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद वाटत असल्याचे संचालिका अॅड.सोनाली धामणीकर यांनी सांगितले.
 
अॅड. सोनाली धामणीकर यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या नवी मुंबई, सीबीडी बेलापुर, सेक्टर ११, बालाजी भवनमध्ये असलेल्या या हॉटेलात एकावेळी ४० खवय्यांची आसनव्यवस्था असून महाराष्ट्रातील विविध भागातील पदार्थ मासवडी, पुरणपोळी, पिठलं भाकरी, श्रीखंड पुरी, भरली वांगी, फोडणीचे वरण, कटाची आमटी, मिसळ पाव, कोथिंबीर वडी, अळू वाडी, मिरचीचा ठेचा, माडग्याचे सूप, मोदक, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी असे विविध मराठी खाद्यपदार्थ इथे चाखता येतील. तसेच मासवडी रस्सा हे येथील वैशिष्ट्य आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवेल अशी आतील सजावट, घडीव दगडाचे तुळशी वृंदावन, भिंतीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीची कलाकृती, गावाकडील घरातील स्वयंपाक घरातील चित्राकृती इत्यादी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही सासरवाडी खाद्यरसिकांना नक्कीच आवडेल, असेही संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यावेळी म्हणाल्या.