शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

फोर्ब्सची प्रतिष्ठीत कंपन्यांची यादी, ‘इन्फोसिस’ तिसरी

फोर्ब्सने जगातील प्रतिष्ठीत कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली आहे. यात  काही वर्षात पहिल्यांदाच ‘इन्फोसिस’ ही आयटी कंपनीला पहिल्या पाच प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये येण्याचा मान मिळाला आहे. यादीत या कंपनीने तिसरे स्थान पटकावले आहे. यामध्ये पहिल्या स्थानी ‘व्हिसा’ ही बँकिंग क्षेत्रातील आणि दुसऱ्या स्थानी ‘फेरारी’ या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.
 
भारतातील टॉपची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनंतर नेटफ्लिक्स, पेपल, मायक्रोसॉफ्ट, वॉल्ड डिस्ने, टोयोटा, मास्टर कार्ड आणि कॉस्ट्को या कंपन्या पहिल्या दहा प्रतिष्ठीत कंपन्यांमध्ये आहेत. तर टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस) या भारतीय आयटी कंपनीने गेल्या वर्षी ३५वे स्थान पटकावले होते. यंदा या कंपनीने २२व्या स्थानी झेप घेतली आहे.
 
जर्मन स्टॅटिस्टिक कंपनी स्टाटिस्टासोबत फोर्ब्सने जगातील २००० मोठ्या कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप २५० उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठित कंपन्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या कंपन्यांची निवड करताना वापरण्यात आलेल्या निकषांमध्ये कंपनीची विश्वासार्हता, सामाजीक आचरण, कंपन्यांची उत्पादने आणि सेवांची क्षमता आणि मालक म्हणून कंपनीची निष्पक्षता या बाबींचा विचार करण्यात आला आहे. जगातील ५० पेक्षा अधिक देशांमधून १५,००० कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये या यादीत पहिल्या २५० कंपन्यांमध्ये १२ भारतीय कंपन्यांचा समावेश होता.