1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (16:10 IST)

'हर हर शिव शंभू' गाणारी फरमानी नाझ कोण आहे? तिच्याविरुद्ध खरंच फतवा जारी झाला आहे का?

उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात राहणारी फरमानी नाज पेशाने गायिका आहे.ती म्हणते, "कोणत्याही हिंदू व्यक्तीने 'नात' ऐकलं तर तो काही मुस्लिम होत नाही आणि कोणत्याही मुस्लिमाने 'भजन' ऐकलं म्हणून तो हिंदू होत नाही. या उक्तीप्रमाणेच जर मी भजन गायलं तर मी हिंदू होत नाही." अलीकडेच 'हर हर शिव शंभू' हे भजन गायल्यामुळे फरमानी नाज चर्चेत आली आहे. तिच्याविरोधात फतवाही काढण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र, तिने फतव्याची गोष्ट नाकारली आहे.
 
ती सांगते, "फतवा वगैरे गोष्टी खोट्या आहेत. कोणत्याही मौलाना, उलेमांनी असं काहीच म्हटलेलं नाहीये. मी ज्या गावात राहते त्या गावात सर्वच मुस्लिम धर्मीय आहेत. जेव्हा कोणी आमच्या गावकऱ्यांना माझ्याविषयी विचारतं तेव्हा ते अभिमानाने सांगतात की, फरमानी आमच्या गावची आहे. आणि त्यांना हे माहिती आहे की, मी गाण्याबरोबरचं भजनही गाते."
 
सोशल मीडियावर असलेल्या एका अकाऊंटवर दावा करण्यात आला होता की, फरमानी नाज आता हिंदू धर्म स्वीकारणार आहे.
याविषयी तिला विचारलं असता ती म्हणते की, "मी पाहिलंय की, कोणीतरी माझ्या नावाने फेक आयडी बनवून मी हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचं ट्विट केलंय. यात माझे पूर्वजही हिंदू असल्याचं म्हटलंय. पण हे सगळं खोटं आहे. अशा लोकांविरोधात तक्रार व्हायला हवी. आणि अशा लोकांसाठी कठोर कायदे असावे."
 
ती पुढे म्हणते, "मी माझा धर्म का बदलू, सर्वच धर्म चांगले आहेत. मी एक कलाकार आहे. मी सर्वांना भजन आणि गाणी ऐकवते, म्हणूनच सर्वधर्मीय माझे श्रोते आहेत. मी मुस्लिम आहे आणि भजन गाते म्हणून ते मला ऐकतात असं काही नाहीये. त्यांना माझा आवाज आवडतो, म्हणूनच ते माझी गाणी ऐकतात. आम्ही गरीब लोक आहोत, गावातून इथपर्यंत आलो आहोत."
 
लग्न आणि आर्थिक संकट
ती पुढं सांगते की, 2018 मध्ये तिचं लग्न झालं. पण लग्नानंतर दोन-तीन महिन्यांतच नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले संबंध उघड झाले. त्या लग्नापासून तिला एक मुलगा झाला जो अवघ्या 3 वर्षांचा आहे.
 
पुढं बोलताना फरमाणीचा सूर काहीसा मंदावतो. ती सांगते "त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं नाक आणि तोंड जोडून होतं. तो जे काही खायचा ते त्याच्या नाकावाटे बाहेर यायचं. असा मुलगा पाहून लोकांनी मला टोमणे मारले की हा कसा मुलगा जन्माला घातलाय."
 
"त्यानंतर त्यांनी माझ्या मुलाच्या उपचारासाठी माझ्या घरून पैसे आणायला सांगितले. ते मला पैशांवरून जास्त त्रास देऊ लागले, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले. जून 2019 मध्ये मी ते घर सोडून माझ्या घरी आले. मी माझ्या पतीची वाट पाहिली पण तो काही आला नाही."
फरमानीचा आरोप आहे की तिच्या पतीने घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलंय.
 
ती म्हणते, "माझ्या माहेरीही गरीबी होती. माझा आणि माझ्या मुलाचा खर्च उचलू शकतील एवढीही माझ्या आईवडिलांची परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत एका आईने काय करावं."
 
फरमानी नाजच्या कुटुंबात तिचा भाऊ फरमान हा देखील गायक आहे. फरमानीसोबत तिचा भाऊही व्हीडिओमध्ये गाताना दिसतो. फरमानी सांगते की, माझ्या भावसोबतच मी गायला सुरुवात केली.
 
अशी बनली गायिका
फरमानी नाज सांगते की, तिने 2019 मध्ये गायला सुरुवात केली. तेव्हापासूनचं ती भजन, फिल्मी गाणी आणि नात गात आहे.
 
ती म्हणते, "माझा आवाज लहानपणापासूनच चांगला होता. माझ्या शाळेतले शिक्षक मला आणि माझ्या भावाला देशभक्तीपर गाणी आणि नज्म गायला लावायचे. त्यांना आमचा आवाज इतका आवडायचा की, मास्टरजींनी आमच्या पालकांना सांगितलं की मुलांचा आवाज चांगला आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या. पण गावात कुणीच लक्ष द्यायचं नाही. कसंतरी 8वी पर्यंत शिक्षण झालं आणि शाळा बंद झाली."
 
"माहेरी आल्यापासून मला एका गोष्टीचं सारखं टेन्शन यायचं ते म्हणजे माझ्या मुलाच्या उपचारांच कसं होणार? एके दिवशी राहुल कुमार नावाच्या युट्युबरने मला गाताना पाहून माझा व्हीडिओ बनवला आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर टाकला. तो व्हीडिओ व्हायरल झाला. 'हीर रांझा' चित्रपटातील 'मिलो ना तुम तो दिल घबराये...' हे गाणं मी गायलं होतं."
 
फरमानी सांगते की, कुमार सानूनेही तो व्हीडिओ ऐकला आणि तिला रियाझसाठी हार्मोनियम भेट म्हणून पाठवला.
मग गायनाच्या प्रॅक्टिसला सुरूवात झाली. तिच्या टीमने मिळून एक स्टुडिओ तयार केला आणि त्यांनी नज्म, गीत, भजन गायला सुरुवात केली.
 
फरमानीने संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. मात्र तिने 'इंडियन-आयडॉल'च्या 12 व्या सीझनमध्येसुद्धा हजेरी लावली होती.
 
ती सांगते की, "इंडियन-आयडॉलमध्ये मी बरेच राऊंड पार केले. मला गोल्डन तिकीटही मिळालं होतं. पण नंतर माझ्या मुलाची तब्येत बिघडली आणि मला परत यावं लागलं."
 
फरमानी नाजचे आज अनेक युट्यूब चॅनेल्स आहेत.
 
ती म्हणते, "आता मी युट्युब वरून पैसे कमावते. माझ्या कुटुंबात माझ्या आईवडिलांसह 5 जण आहेत. या सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे."
 
"आताचं आयुष्य पूर्वीपेक्षा खूप चांगलं आहे. आम्हाला चांगलं जेवण आणि चांगले कपडे घालायला मिळतात."
 
'कलेला धर्माशी जोडू नये'
ती म्हणते, "कलेचा धर्माशी काहीही संबंध नाही. मी भजन गायलं म्हणून मी हिंदू झाले असं नाहीये. माझ्या गाण्याचे श्रोते सर्वधर्मीय आहेत. मी घरी असले तर नमाज पढते, कुराण वाचते, रोजेही ठेवते."
"माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अशा गोष्टी घडू नयेत. आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. सर्वांनी एकोप्याने राहायला हवं. सर्वांनी एकता राखली पाहिजे. नज्म किंवा भजनावरून वाद घालणं योग्य नाही."
 
फरमानी शेवटी सांगते की, ती चित्रपटातील गाण्यांसोबतच भजन आणि नज्म गाणं सुरूच ठेवणार आहे.
 
ती म्हणते, "आम्ही मोहरम तसंच जन्माष्टमीसाठी कव्वाली आणि भजन असं दोन्ही तयार केलंय. मला आशा आहे की, लोकांना ते आवडेल."