रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2024 (09:29 IST)

बंडखोरी रोखण्यासाठी मनधरणी युतीत कसरत, फडणवीसांची टीम लागली कामाला

devendra fadnavis
महायुतीत तीन पक्ष एकत्रित आल्याने ब-याच ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यातल्या त्यात भाजपलाच याचा फटका बसत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेत्यांची नाराजी दूर करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे भाजपची दुसरी टीम बंडखोर नेत्यांची मनधरणी करीत आहे. हिंगोलीत रामदास पाटील यांच्यासह शिवाजी जाधव, श्याम भारती यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते आज हिंगोलीत आले होते. तसेच बुलडाण्यातही विजयराज शिंदे यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
हिंगोलीत भाजपने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले होते. त्यामुळे येथे हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली असताना भाजपच्या दबावामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली आणि तिथे आता बाबूराव कदम कोहळीकर यांना मैदानात उतरविले. परंतु तरीही भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माजी खासदार शिवाजी जाधव, श्याम भारती हेही नेते नाराज आहेत. त्याचा फटका शिंदे गटाच्या उमेदवाराला बसू शकतो.

त्यामुळे भाजपमधील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन आज हिंगोलीत दाखल झाले आणि त्यांनी येथील मिलिंद यंबल यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमधील नाराजांची मनधरणी केली. परंतु भाजपचे बंडखोर नेते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार श्रीकांत भारतीय दाखल झाले. उशिरापर्यंत त्यांच्यात चर्चा सुरूच होती.

Edited by -Ratnadeep Ranshoor