Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 4 एप्रिल 2009 (11:23 IST)
कॉंग्रेसच्या दबावामुळेच पवार नरमले
भुवनेश्वरमधील तिसर्या आघाडीच्या सभेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विमान न मिळाल्याचे तांत्रिक कारण सांगत असले तरी या मेळाव्यात त्यांनी सहभागी होऊ नये यासाठी कॉंग्रेसचा दबाव कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
श्री. पवार भुवनेश्वरला गेल्यास महाराष्ट्रातील युतीबाबत आम्हाला 'गंभीर' विचार करावा लागेल, असे कॉंग्रेसने त्यांना स्पष्टपणे बजावल्याचे कळते. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबतची युती तोडली तरीही कॉंग्रेसला फारसा फरक पडणार नाही, असे पक्षातील सुत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीबरोबर युती करण्यास प्रदेश कॉंग्रेसचीही तयारी नव्हती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तर शेवटपर्यंत आम्ही ४८ जागा लढवू असे सांगत होते. पण केवळ सोनिया गांधींच्या समन्वयवादी भूमिकेमुळे पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर युती केली, असे सुत्रांचे म्हणणे आहे.
पवारांनी जागा वाटपातही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यात आता तिसर्या आघाडीशीही त्यांचे गुफ्तगू चालले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर युती करायची की नाही याबाबत बारकाईने विचार करेल, असेही पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.