पहिल्या टप्प्यातील १३ जागांसाठी २४३ उमेदवार
महाराष्ट्रात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणार्या तेरा जागांच्या निवडणुकीसाठी २४३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. या तेरामध्ये लक्ष वेधून घेणार्या प्रमुख उमेदवारांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. पटेल भंडारा-गोदिया मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे शिशुपाल पटले व कॉंग्रेसचे बंडखोर नाना पटोले आहेत. याशिवा यवतमाळमधून कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हरीभाऊ राठोड, नांदेडमधून मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर मैदानात उतरले आहेत. या सर्व मतदारसंघात नागपूर, रामटेक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, अकोला, वर्धा, चंद्रपूर या विदर्भातील व हिंगोली, नांदेड व परभणी या मराठवाड्यातील मतदारसंघांचा समावेश आहे. येथे १६ एप्रिलला मतदान होणार आहे.