वरूण यांच्यामागे भाजप ठाम- अडवानी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी आज आपला पक्ष वरूण गांधी यांच्या मागे ठाम उभा असल्याचे स्पष्ट केले. वरूण यांचे विधान मीडीयात आले तसेच असेल तरीही पक्ष त्यांना एकटे सोडणार नाही. त्यांच्या मागे ठाम उभा राहील, असे त्यांनी येथे सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ''सीडीतील आवाज आपला नाही, असे वरूण यांनी स्पष्ट केले आहे. पण हा आवाज त्यांचा असला तरी पक्ष त्यांना एकटे सोडणार नाही. वरूण यांनी विधान बदलावे आणि भविष्यात असे वक्तव्य करू नये एवढा सल्ला फक्त त्यांना पक्ष देईल. पण त्यांना वार्यावर सोडणार नाही,'' असे त्यांनी सांगितले. लाखो लोक असलेल्या पक्षात कुण्या एकाने असे वक्तव्य दिले म्हणून त्याला पक्षातून बाहेर काढण्यात येत नाही. भाजप त्यांच्या विचारांशी सहमत नाही, हे स्पष्टपणे त्यांना सांगितले जाते व भविष्यात असे वक्तव्य देऊ नये असा सल्ला त्यांना देण्यात येतो, असे सांगून, प्रत्येक वेळी हकालपट्टीचाच पर्याय अवलंबला तर कोणताही पक्ष अशा प्रकारे चालूच शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.